सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

Thursday, June 14, 2012

भारतातील मुलींची पहिली शाळा

-महावीर सांगलीकर


भारतातील मुलींची पहिली शाळा कोणी काढली? असा प्रश्न आपणास कोणी विचारला तर आपल्या डोळ्यापुढे सहजच महात्मा फुले यांचे नाव येते. त्यांनी ती कोणत्या साली काढली असे विचारले तर आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांना ते साल सांगता येत नाही.

महात्मा फुले यांनी पुणे येथे १८४८ साली मुलींची शाळा काढली. यासाठी त्यांना आपल्या बायकोला, सावित्री बाई फुले यांना शिकवून मग शिक्षिका बनवायला लागले. या त्यांच्या महान कामास ब्राम्हणांनी आणि बहुजनांनीही मोठा विरोध केला. (त्या काळात महात्मा फुले यांना बहुजनांनी किती मदत केली हा एक संशोधनाचा विषय आहे. महात्मा फुलेंबरोबर मातंग, मुस्लीम आणि इंग्रज हेच होते असे दिसते) . पण कोणाच्याही विरोधाला न जुमानता, न डगमगता महात्मा फुले आणि सावित्री बाई फुले यांनी मुलींना शिकवण्याचे आपले काम नेटाने पुढे चालू ठेवले. महात्मा फुले यांनी मुलींसाठी एकून तीन शाळा काढल्या होत्या, तसेच त्या काळातील अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी एक खास शाळा काढली होती.

असे असले तरी भारतातील मुलींच्या शिक्षणाची सुरवात करण्याचे काम ब्रिटीश आणि अमेरिकन मिशन -यांनी केले ही गोष्ट फारशा लोकांना माहीत नाही. इ.स. १८१० साली या मिशन -यांनी बंगाल प्रांतात मुलींची पहिली शाळा काढली. १८२७ पर्यंत मुलींच्या अशा शाळांची संख्या १२ पर्यंत गेली. विशेष म्हणजे या शाळांमध्ये मुस्लीम विद्यार्थीनींची संख्या उल्लेखनीय होती.

महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढण्याच्या अगोदर एक वर्ष, १८४७ साली, प्यारी चरण सरकार यांनी नवीन कृष्ण मित्र आणि काली कृष्ण मित्र यांच्या मदतीने बंगाल मधील बरसात येथे मुलींची शाळा सुरू केली. हा ब्राम्हण बहुल भाग होता व त्यांनी मुलींच्या शाळेला प्रचंड विरोध केला. प्यारी चरण सरकार यांना खुनाच्या धमक्या यायला लागल्या. अशा वेळी जॉन इलियट ड्रिंकवाटर बेथून हा स्त्री शिक्षणाचा पुरस्कर्ता इंग्रज अधिकारी पुढे आला व त्याने मित्र बंधू व सरकार यांना धीर दिला. १९४८ साली त्याने बरसात येथी मुलींच्या शाळेला भेट दिली. त्या शाळेमुळे जॉन बेथून इतका प्रभावीत झाला की पुढच्याच वर्षी त्याने कलकत्ता येथे मुलींसाठी एक शाळा सुरू केली.

प्यारी चरण सरकार यांनी १८४७ साली स्थापन केलेली मुलींची शाळा आजही चालू आहे व ती काली कृष्ण गर्ल्स हायस्कूल या नावाने ओळखली जाते.

इंग्रज व अमेरिकन मिशन-यांनी सुरू केलेल्या व कृष्ण बंधू, प्यारी चरण सरकार, महात्मा फुले-सावित्री बाई फुले यांनी पुढे नेलेल्या या कामास आलेले आणखी एक फळ म्हणजे बेगम रोकेया शकावत हुसेन यांनी मुस्लीम मुलींसाठी काढलेली शाळा. बेगम हुसेन यांनी १९०९ साली बिहारमधील भागलपूर येथे मुस्लीम मुलींसाठी शाळा सुरू केली. बेगम हुसेन हिच्या नव-याचे नुकतेच निधन झाले होते आणि त्या काळात मुलींनी शिक्षण घेणे मुस्लीम समाजाला मान्य नव्हते. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला शाळा बंद करायला आणि घर सोडून जायला भाग पाडले. तेंव्हा ही बाई आपली शाळा बंद करून कलकत्त्याला आली व तिथे तिने १९११ साली आपल्या नव-याच्या नावाने शकावत हुसेन मेमोरिअल गर्ल्स स्कूल ही शाळा काढली. बेगम रोकेयाला तिच्या भावाने लिहायला-वाचायला चोरून शिकवले होते व पुढे तिच्या नव-याने तिला इंग्रजी भाषा शिकवली होती. बेगम रोकेयाने महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे अनेक लेख व कथा लिहिल्या.

4 comments:

shrawan deore said...

'समाजवाद' ही मार्क्सची संकल्पना नाही. 'स्वप्नाळू समाजवादाच्या स्वरुपात ती आधीच अस्तित्वात होती. मार्क्सने तीला शास्रशूद्ध स्वरुप देउन जगभर अमलात आणण्याचा मार्ग मोकळा केला म्हणून समाजवादाचे श्रेय मार्क्सला दिले जाते.
मुलींची शाळा काढ्णे, ही एक गोष्ट
ती चालविन्यासाठी संघर्ष करणे, ही दुसरी गोष्ट. परंतू---
समाजव्यवस्थेचा, त्यातील शोषणाचा शास्रीय अभ्यारस करुन कायमस्वरुपी उपाय म्हणून मुलींची शाळा काढणे ही वेगळीच गोष्ट!!
तात्यासाहेब महात्मा जोतीराव व सावित्रीमाई फुले हेच 'ही' वेगळी गोष्ट करु शकलेत म्हणून मुलींची शाळा काढण्याचे श्रेय या महान फुले दांपत्याकडे जाते.
महत्वाची सूचना- मान्यवर प्यारी चरण सरकार व बेगम रोकेया सखावत हुसेन यांच्याबद्दल नितांत आदर कायम ठेवून ही प्रतिक्रीया लिहीली आहे, ती तशीच वाचावी.

Anonymous said...

Sangalikar sir ,manya ahe baryach lokani mulichya shikshanasathi prayatna kele pan ,maharshi dondo keshav karve pan yek hote tyache nav koni ghet nahi ,kadachit brahmin asalya mule

Anonymous said...

या काळात युरोप व अमेरिकेतील स्त्रीशिक्षणाची परिस्थिती फारशी वेगळी नसावी. कदाचित मिशनर्‍यांनी भारतात येऊन मुलींची शाळा उघडणे हा एक 'सामाजिक प्रयोग' असू शकतो. या प्रयोग करण्यासाठी युरोप वा अमेरिकेपेक्षा भारत हे सोयीस्कर स्थान असू शकते. अधिक संशोधन व्हावे.

J. Ganeshan said...

सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा काढन्यापूर्वी दोन वर्षे मुंबईमध्ये जगन्नाथ शंकरशेठ यांनी मुलींसाठी शाळा काढलेली होती या शाळेत सर्व जातीजमातीच्या मुलीना प्रवेश होता गेल्या २५० वर्षात मुंबईमध्ये अलौकिक चारित्र्याची व कर्तुत्वाची जी माणसे होवून गेली त्या सर्व मंडळीमध्ये जगन्नाथ शंकरशेठ यांचेइतका प्रचंड माणूस कोणीही दाखवता येणार नाही १८३२ साली(तेव्हा ज्योतिबा फुले चार वर्षाचे होते ) त्यांनी Bombay Education Society काढली आणि पुढे Elephestan college काढले १८४५ साली students literrary and scientific society ची स्थापना केली आणि स्वतःच्या घरात मुलींची शाळा काढली हि शाळा काढल्याबद्दल लोकांनी त्यांना सळो कि पळो करून टाकले Grant Medical College काढले हि फक्त नानांची शैक्षणिक क्षेत्रातील कामे या व्यतिरिक्त प्रचंड कामे केली पहिली रेल्वे सुरु करण्यात त्यांचा खूप मोठा सहभाग होता Municipal Act पास करून घेवून BOMBAY Municipal council ची स्थापना केली पहिले Grand jury मध्ये त्यांचा समावेश होता Royal Asiatic Society चे जे प्रचंड ग्रंथालय आहे त्याच्या निर्मितीत त्यांचा मोठा सहभाग होता
परंतु महापुरुशात गणना होण्यासाठी केवळ प्रचंड कर्तुत्व असून भागत नाही त्याबरोबर ब्राह्मणद्वेष करता आला पाहिजे ते गुण (ते स्वतः ब्राह्मणेतर होते तरीही )नसल्याने त्यांची गणना महापुरुशात होत नाही किंवा मुंबई विद्यापीठ वैगेरेला त्यांचे नाव देत नाहीत

माझे नवीन लेख मिळवण्यासाठी आपली इमेल नोंद करा..

शोध आणि बोध LATEST

कृपया हे पेज लाईक करावे