सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

Monday, December 17, 2012

भारतीय नौकानयन आणि आरमाराचा इतिहास

-महावीर सांगलीकर


भारतीय लोकांना नौकानयन ही गोष्ट फार प्राचीन काळापासून माहीत होती.  अगदी पाच हजार वर्षांपूर्वी सिंधू संस्कृतीतील लोकांचा आखाती देश आणि इजिप्तशी  समुद्रमार्गे व्यापार चालत असे. सिंधू संस्कृतीतील लोथल येथे असलेले बंदर हे जगातील सगळ्यात जुने बंदर मानले जाते. ज्या अर्थी समुद्र मार्गे व्यापार चालत असे त्या अर्थी जहाजांच्या संरक्षणाची व्यवस्था असणारच, पण त्याचे भक्कम पुरावे मिळत नाहीत.  त्यामुळे भारतीयांचे पहिले आरमार बाळगाण्याचा मौर्य साम्राज्याकडे जातो. 

चंद्रगुप्त मौर्याच्या  संरक्षण खात्याचे एकून सहा विभाग होते, त्यातील पहिलाच विभाग हा आरमारी विभाग होता. या विभागाचे ५ अधिकारी होते आणि ते आरमार प्रमुखाशी संलग्न रहात असत. या आरमाराचे मुख्य काम समुद्री सीमा, नद्यांची मुखे, नद्या आणि तळी यांच्यावर लक्ष ठेवणे हे असे. हे आरमार समुद्री चाच्यांचा बंदोबस्त करीत असे. हे आरमार श्रीलंकेपर्यंत तर जात असेच, पण अगदी इजिप्त, सिरीया इथेपर्यंतही पोहचत असे.  मौर्यांच्या आरमाराची बंदरे भारताच्या पूर्व आणि पश्चिम या दोन्ही किनारपट्टीवर होती.

मौर्यांच्या नौदलाचे उल्लेख अशोकाच्या शिलालेखामाध्येही आढळतात.

मौर्यांच्या नंतर सातवाहन राजांचे मोठे आरमार असल्याचे उल्लेख मिळतात. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याचा मुलगा पुलुमयी याचे शक्तीशाली आरमार होते.  पुलुमयीच्या  काळातील चलनी नाण्यांवर दोन शिडांच्या जहाजाचे चित्र असलेले दिसते. सातवाहन  काळात भारताचा व्यापार खाडीतले देश आणि अगदी इजिप्तशीही चालायचा.

सातवाहनांच्या नंतर दक्षिण भारतात होवून गेलेल्या पल्लव राजांचेही शक्तीशाली आरमार होते. पल्लव घराण्यातील नरसिंहवर्मन या राजाने श्रीलंकेवर आक्रमण करून तो देश ताब्यात घेतला होता. 

भारतीय आरमाराची ही  परंपरा पुढेही चालूच राहिली. चालुक्य, राष्ट्रकुट, चोल, शिलाहार या सगळ्यांच्या राजवटीत त्यांची-त्यांची आरमारे होती. चालुक्य सम्राट पुलकेशी दुसरा याच्या आरमारात किमान १०० जहाजे होती. त्याने ओरीसातील पुरी शहरावर समुद्रमार्गे आक्रमण केल्याचे उल्लेख मिळतात. पुलकेशी दुसरा याचा नातू विनायादित्य याने लंकेवर आक्रमण करून तेथील राजाला पराभूत केले होते. विनायादित्या प्रमाणेच राष्ट्रकुट सम्राट कृष्ण तिसरा यानेही लंकेवर हल्ला करून लंकेच्या उत्तर भागावर आपले राज्य स्थापन केले होते.

या सगळ्यांमध्ये दक्षिण भारतातील चोल साम्राज्याचे आरमार आकाराने मोठे, आधुनिक आणि आक्रमक होते. चोल साम्राज्याची स्थापना इ.स. पूर्व ३-या शतकात झाली असली तरी नवव्या  ते तेराव्या शतकात हे साम्राज्य फारच बलाढ्य झाले होते. चोलांच्या  आरमारात सुमारे १००० जहाजे होती. या आरमाराचे वैशिष्ठ्य असे की यात आजच्या नौदालासारखीच अधिकाराची पदे असत. नौदलाचा सर्वोच्च प्रमुख चक्रवर्ती म्हणजे चोल सम्राट असे. नौदलाचा प्रत्यक्ष प्रमुखाला जलाधीपती म्हणत. हे पद आजच्या Admiral पदासारखे असे. जलाधीपतीच्या खालोखाल नायगन हे पद असे, तो नौदलाचा विभागीय प्रमुख असे. त्यानंतर क्रमाने गणाधिपती (Rear Admiral), मण्डलाधीपती (Vice Admiral), कलपती (Captain of Navy), कापू (Weapons Officer), सीवाई (Engineering Officer), एथिमार (Captain of Marines) ही पदे होती.

चोलांच्या नौदलाचे लढाऊ विभागाशिवाय कस्टम वगैरे इतरही विभाग होते.

या आरमाराची भरीव कामगिरी म्हणजे समुद्र मार्गे कलिंगवर हल्ला, तसेच लंका, इंडोनेशिया, मलेशिया  आणि कंबोडिया हे देश ताब्यात घेवून तेथे चोलांचा अंमल स्थापन करणे. 

चोलांच्या  काळात  दक्षिण भारताचा समुद्रमार्गे होणारा व्यापार भरभराटीस आला होता. त्या काळात व्यापारी जहाजे चीन पर्यंत जात असत. निर्यात होणा-या वस्तूंमध्ये मसाल्याचे पदार्थ, कापड, मोती  आणि किमती रत्ने यांचा समावेश असे.

दहाव्या ते तेराव्या शतकात महाराष्ट्रावर राज्य केलेल्या शिलाहार राजांकडेही त्यांचे आरमार होते. शिलाहार राजा दुसरा भोज याने विजयदुर्ग हा समुद्री किल्ला बांधला होता. पण शिलाहारांनी समुद्रमार्गे  लष्करी मोहिमा काढल्याचे दिसत नाही. शिलाहारांच्या काळात समुद्रमार्गे खाडीतील देशांशी व्यापार चालत असे.

विजयनगर साम्राज्य (१३३-१६४६) हे दक्षिण भारतातील एक बलाढ्य साम्राज्य होते. या साम्राज्याच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण या तीनही सीमा समुद्राला भिडलेल्या होत्या. या साम्राज्याकडेही आरमार होते.  या साम्राज्यात ३०० बंदरे होती. आरमाराच्या प्रमुखाला नावीगडप्रभू हे पद होते.  कृष्ण देवरायाच्या काळात हानोवर तीम्मोजू हा विजयनगरच्या आरमाराचा प्रमुख होता.

पोर्तुगीजांचे भारतात आगमन झाल्यावर चौता राणी अब्बक्काने आपल्या आरमाराच्या सहाय्याने पोर्तुगीजांच्या नाकी नऊ आणले होते. तसेच तिला कालीकाताचा राजा झामोरीन याच्या जहाजांनी आरमारी मदत केली होती.

या इतिहासावरून असे दिसून येते की मनुस्मृतीतील सिंधुबंदी भारतीयांनी  झुगारून दिली होती, किंवा तिचे पालन ठराविक वर्गच करत होता. तसेच या इतिहासामुळे भारताने कधी कुणावर आक्रमण केले नाही हा कांही लोकांचा आवडता दावाही फोल ठरतो. 


हेही वाचा: 
पोर्तुगीजांना हरवणारी पराक्रमी अब्बक्का राणी
शिलाहार राजा भोज दुसरा आणि त्याने बांधलेले किल्ले
राजपुतांच्या कांही कुळ्यांचे दक्खनी मूळ

No comments:

माझे नवीन लेख मिळवण्यासाठी आपली इमेल नोंद करा..

शोध आणि बोध LATEST

कृपया हे पेज लाईक करावे