सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

Saturday, December 22, 2012

दुस-या महायुद्धात भारत© महावीर सांगलीकर


१९३९ साली दुसरे महायुद्ध सुरू झाले तेंव्हा त्यात ब्रिटीश भारताचे सुमारे दोन लाख सैनिक होते. १९४५ साली हे युद्ध संपले तेंव्हा भारतीय सैनिकांची संख्या तब्बल ३० लाखांवर पोहोचली होती. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय सैन्याने कोणत्याच मोहिमेत भाग घेतला नव्हता, आणि पुढेही घेतला नाही.(येथे भारतीय याचा अर्थ ब्रिटीश भारतीय असा आहे, त्यात आजच्या भारत, पाकिस्तान आणि बांगला देश या तीनही देशांचा समावेश होतो. तसेच यात नेपाळी गुरखा सैनिकही मोठ्या प्रमाणावर होते).


मित्र राष्ट्रांच्या विजयात भारतीय सैनिकांचा मोठा वाटा आहे. या सैनिकांनी युरोप, आफ्रिका आणि पूर्व आशियात अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला, आणि ब्रिटिशांना विजय मिळवून दिला. ब्रिटीश भारताच्या सुमारे ४००० सैनिकांना त्यांच्या पराक्रमासाठी  शौर्य पदके मिळाली. त्यातील ३१ सैनिकांना विक्टोरिया क्रॉस हे सर्वोच्च शौर्य पदक मिळाले. (भारत स्वतंत्र झाल्यावर या विक्टोरिया क्रॉस या पदकाचे रुपांतर परम वीर चक्रामध्ये करण्यात आले).

भारतीय सैनिक इथिओपियात इटालियन सैन्याशी, इजिप्त, लिबिया, ट्युनिशिया आणि खुद्द इटलीमध्ये इटालियन आणि जर्मन सैन्याशी लढले. पण भारतीय सैनिकांच्या लढाया मुख्य करून जपानी सैनिकांशी मलाया, सिंगापूर आणि ब्रम्हदेश येथे झाल्या. 

 इटलीमधील एका मोहिमेतील चकमकीत भारतीय सैनिक

या महायुद्धात ब्रिटीश भारताचे सुमारे ८७००० सैनिक ठार झाले. तसेच कित्येक लाख सैनिक गंभीर जखमी आणि अपंग झाले.  इथे लक्षात घेण्यासारखी महत्वाची गोष्ट ही आहे की भारत स्वतंत्र झाल्यावर भारताची जी युद्धे झाली, त्यात ठार झालेल्या भारतीय सैनिकांची एकूण संख्या सुमारे ११०००  इतकी आहे आणि ती दुस-या महायुद्धात ठार झालेल्या भारतीय सैनिकांच्या मानाने फारच कमी आहे.

याच काळात आझाद हिंद फौजेचे सुमारे ४५००० सैनिक नेताजी सुभाष  चंद्र  बोस यांचा नेतृत्वाखाली ब्रिटीशांच्या विरोधात लढत होते. हे सैनिक मुख्य करून बर्मा मध्ये लढले. कित्येक ठिकाणी आझाद हिंद फौज आणि ब्रिटीश भारतीय सैनिक यांच्यात लढाया झाल्या. आझाद हिंद फौजेला जपानचा पूर्ण पाठींबा आणि लष्करी सहाय्य होते. या फौजेतील सैनिक युद्धात आणि रोगराई पसरल्यामुळे मोठ्या प्रमाणात मारले गेले.

या महायुद्धाच्या काळात जर्मनीने जे ब्रिटिश भारतीय सैनिक जर्मनी व इटलीला शरण गेले होते त्यांचे एक सैन्य उभारले होते. त्यांना पुन्हा ट्रेनिंग देवून दोस्त राष्ट्रांविरुद्धच्या युरोपमधील विविध मोहिमांवर पाठवण्यात  आले होते.

दुस-या महायुद्धातील ज्युनिअर भारतीय अधिकारी झाले महानायक 
दुस-या महायुद्धात भाग घेतलेले ज्युनिअर भारतीय अधिकारी पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर भारताची शेजारी देशांशी जी युद्धे झाली तेंव्हा प्रमोशन मिळून वरच्या पदावर पोहोचले होते. दुस-या महायुद्धातील अनुभवांचा त्यांना चांगलाच फायदा झाला. त्यातील कांही अधिका-यांची वाचकांना माहिती करून देणे मला महत्वाचे वाटते.

जयंतो नाथ चौधरी 
जयंतो नाथ चौधरी दुस-या महायुद्धाच्या वेळी ब्रिटीश भारतीय सैन्यात कॅप्टन होते. ते उत्तर आफ्रिकेत सुदान, अबिसिनिया आणि सहाराचे वाळवंत या भागात लढले. त्यांच्या पराक्रमासाठी त्यांना Order of the British Empire हे शौर्य पदक मिळाले होते.  पुढे १९६५ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात हे भारताचे सरसेनापती होते. या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला.

अर्जन सिंग 
दुस-या महायुद्धाच्या काळात अर्जन सिंग  हे पायलट ऑफिसर होते. त्यांनी १९४४ साली ब्रिटीश-भारतीय विमान दलाने बर्मामधील जपानी सैन्यावर केलेल्या हल्ल्यात भाग घेतला होता. त्यावेळी केलेल्या पराक्रमाबद्दल अर्जन सिंग यांना विशेष शौर्य पदक मिळाले होते. पुढे १९६५ साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी अर्जन सिंग हे भारतीय विमान दलाचे प्रमुख होते. या युद्धात अर्जन सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय विमानदलाने मोलाची कामगिरी केली.  भारतीय विमानदलातील सर्वोच्च पद Marshal of the Air Force मिळवणारे ते एकमेव अधिकारी आहेत.

सॅम माणेकशा
सॅम माणेकशा हे दुस-या महायुद्धाच्या काळात १९४२ साली कॅप्टन होते. त्यांनी बर्मामध्ये जपानी सैनिकांच्या एका तुकडीवर आपल्या तुकडीसह हल्ला केला. त्यावेळी त्यांनी केलेल्या  पराक्रमासाठी त्यांना मिलिटरी क्रॉस हे शौर्य पदक देण्यात आले. या लढाईत माणेकशा यांच्या फुफुसात आणि पोटात नऊ गोळ्या घुसल्या होत्या.  माणेकशा यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी त्यांच्या जगण्याची आशा सोडून दिली होती, पण माणेकशा जीवनाची लढाई देखील हरले नाहीत.

पुढे १९६९ साली माणेकशा भारताचे सर सेनापती झाले. १९७१ साली भारत-पाकिस्तान युद्ध झाले. हे युद्ध भारताने माणेकशा यांच्या कुशल नेतृत्वामुळे आणि त्यांनी युद्धासाठी अचूक काळ निवडल्याने अगदी थोडक्या काळात जिंकले. त्यांच्या महान कामगिरीबद्दल त्यांना फिल्ड मार्शल हा सर्वोच्च खिताब देण्यात आला. हा खिताब आत्ता पर्यंत दोनच सेनाधिका-यांना देण्यात आला आहे.

जगजित सिंग अरोडा
जगजित सिंग अरोडा हे १९३९ साली ब्रिटीश-भारतीय सैन्यात सेकंड लेफ़्टनंट म्हणून रुजू झाले. त्यांनी  बर्मामध्ये जपानी आक्रमणाच्या विरोधात झालेल्या लढाईत भाग घेतला होता.

१९७१ साली भारत पाकिस्तानच्या युद्धाच्या काळात जगजित सिंग अरोडा पूर्व विभागाचे मुख्य जनरल कमांडिंग ऑफिसर होते. बांगला देशच्या मुक्ती वाहिनीला ट्रेनिंग देण्यात त्यांचे मोठे योगदान होते. अरोडा यांच्या कुशल नेतृत्वाखाली पूर्व विभागातील भारतीय सैन्याने अनेक मोहिम यशस्वी केल्या आणि पाकिस्तानी सैन्याला शरण येण्यास भाग पाडले. १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानच्या पूर्व विभागाचे प्रमुख लेफ़्टनंट जनरल अमीर नियाझी आपल्या ९३००० सैनिकांसह जगजित सिंग अरोडा यांना शरण आले. 

जे.एफ.आर. जेकब 
जे.एफ.आर. जेकब १९४२ साली ब्रिटीश भारतीय सैन्यात रुजू झाले. सुरवातीला त्यांची नेमणूक इराकवर जर्मनीच्या संभाव्य हल्ल्याला तोंड देण्याच्या तयारीत असलेल्या भारतीय सैन्यात ज्युनिअर ऑफिसर म्हणून करण्यात आली. नंतर त्यांना उत्तर आफ्रिकेत भारतीय तोफखान्यात पाठवण्यात आले. १९४३ ते १९४५ या काळात ते बर्मामध्ये जपानी सैनिकांच्या विरोधात लढले.

१९७१ साली भारत पाकिस्तानच्या युद्धाच्या काळात ते पूर्व विभागात मेजर जनरल होते. या युद्धाच्या वेळी भारतावर युनो, अमेरिका आणि अनेक देशांचा प्रचंड दबाव होता. त्यांचा हस्तक्षेप होण्यापूर्वीच हे युद्ध झटपट संपवणे ही भारताची गरज होती. त्याची प्रत्यक्ष जबाबदारी जेकब यांच्यावर होती. जेकब यांनी १७ दिवसात युद्ध संपवण्याच्या दृष्टीने मोहिमांची आखणी केली, आणि प्रत्यक्षात फक्त १३ दिवसात पाकिस्तानचा संपूर्ण पराभव करून युद्ध संपवले.

दुस-या महायुद्धात जगातील बहुतेक सगळे महत्वाचे देश ओढले गेले होते. या भयानक महायुद्धात कोट्यावधी सैनिक आणि नागरीक मारले गेले. या युद्धात भारतीय सैनिकांनी निभावलेल्या महत्वाच्या भूमिकेची फारशी चर्चा होत असलेले दिसत नाही. खरे म्हणजे केवळ भारतीय सैनिक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते म्हणूनच इंग्लंडला या युद्धात तग धरता आला आणि शेवटी दोस्त राष्ट्रांच्या सहाय्याने विजयही मिळवता आला. 

हेही वाचा: 
भारतीय नौकानयन आणि आरमाराचा इतिहास
पोर्तुगीजांना हरवणारी पराक्रमी अब्बक्का राणी
सैनिक आणि देशप्रेम


No comments:

माझे नवीन लेख मिळवण्यासाठी आपली इमेल नोंद करा..

शोध आणि बोध LATEST

कृपया हे पेज लाईक करावे