सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

Monday, July 1, 2013

पुस्तक परीक्षण: सर्व प्रश्न अनिवार्य

-दत्ता राशिनकर
मो. न. 901 131 6199

विद्यार्थ्याने केलेले ज्ञानार्जन गुणांच्या कसोटीला कितपत उतरते हे जाणून घ्यायचा एक राजमार्ग म्हणून परीक्षा पद्धतीची निर्मिती झाली असावी. कुठल्याही नवीन पद्धतीचे स्वरूप सुरवातीला निर्मळ झ-या सारखे असते, पण कालांतराने त्यात अनेक ओढ्या-नाल्यांचे पाणी येऊन मिसळते आणि त्या निर्मळ  झ-याचे बघता-बघता गटारात रुपांतर होते. परीक्षा पद्धतीच्या बाबतीतही नेमके तेच घडले आहे. आजची परीक्षा विद्यार्थ्याच्या बुद्धीची नव्हे तर त्याच्या हस्तलाघवाची कसोटी बघणारी झाली आहे. अर्थात त्यामध्ये इतर अनेक घटक सामील असतातच, उदाहरणार्थ शाळेचं तथाकथित यश, पालकाची पाल्याविषयी अवाजवी अपेक्षा, सत्ताधा-यांचा मुजोरपणा, पैशाचे चोरटे वा उघड व्यवहार इत्यादी.

या सगळ्या गोष्टींवर झगझगीत प्रकाशझोत टाकणारी रमेश इंगळे उत्रादकरांची 'सर्व प्रश्न अनिवार्य' ही कादंबरी वाचल्यावर कादंबरीतल्या सकपाळ सरांप्रमाणेच वाचकांच्या मेंदूला देखील झिणझिण्या  आल्याशिवाय राहात नाही. कादंबरीतील सिद्धेश्वर सकपाळ आणि शेषराव घुबे हे एकाच शाळेतील प्राथमिक शिक्षक. शेषराव घुबे सकपाळ सरांपेक्षा दहा वर्षांनी लहान, पण त्यांनी शिक्षण क्षेत्रातील जे अनुभव घेतले, जी वास्तवता अनुभवली तिला तोड नाही.

एक काळ असा होता की परीक्षा जवळ आली की विद्यार्थी खाणंपिणं विसरून झपाटल्याप्रमाणे अभ्यास करायचे. पण आज परीक्षेत पास होण्याचा अत्यंत जवळचा मार्ग त्यांनी शोधून काढला आहे, तो म्हणजे कॉपीचा. या कॉपीचे देखील अनेक प्रकार आहेत, शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर, ओढणीवर, तसेच कागदांच्या कपट्यावर अत्यंत बारीक हस्ताक्षरात लिहिलेली उत्तरं, गाईडची पाने फाडून ती अंगावरच्या  कपड्यात वेगवेगळ्या ठिकाणी दडवून ठेवणे वगैरे.

हे झाले विद्यार्थ्यांनी स्वत: अनुसारायाचे मार्ग. त्याशिवाय पर्यवेक्षक, मुख्याध्यापक, गावातली टगी मुलं, एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष शिक्षणाधिकारी, मंत्री देखील या 'पुण्यकर्मा'ला आपापल्या परीने हातभार लावत असतात. या कॉपी प्रकरणातील 'चंफूल'च्या सहाय्याने उत्तर लिहिणारा विद्यार्थी, देवीचं वडगाव येथील दहावी-बारावीची अजब परीक्षा, स्कॉलरशिपच्या परीक्षेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी निष्ठावान सकपाळ सरांचा घेतलेला बळी, कॉपीचे कागद खावून पोट भरणारी भवानीमाता ही गाय, हे धामाल पण अंती तितकेच मन उदास आणि उद्विग्न करणारे किस्से मुळातूनच वाचायला पाहिजेत.

परीक्षेतल्या प्रश्नाप्रमाणेच जीवनातील सर्व प्रश्न अनिवार्यच असतात. ते आपापल्या वकुबाप्रमाणे प्रामाणिकपणे सोडवणे अनिवार्य असतं, त्या गोष्टीला shortcut नसतो, परंतू तो शोधण्याच्या माणसाच्या जन्मजात प्रवृत्तीमुळे तो अनेक अपप्रवृत्तींना जन्म देत असतो. परीक्षेतली कॉपी काय आणि सामाजिक जीवनातली कॉपी/चोरटे व्यवहार काय, दोन्हींची जातकुळी एकाच आहे. भ्रष्टाचाराचं मूळ एकदम सामाजिक जीवनात शोधायला जाण्याअगोदर समाज सुधारणावाद्यांनी त्यांच्या चिंतनाची सुरवात विद्यार्थ्यांच्या या कॉपीच्या दुष्प्रवृत्तीपासून केली तर त्याचा जास्त उपयोग होईल.

उत्रादकरांची 'निशाणी डावा अंगठा' ही कादंबरी तुफान गाजली. त्यांची प्रस्तुत कादंबरी देखील तिच्यातल्या धगाधगीत वास्तवामुळे वाचकाला खिळवून आणि थिजवून ताकते. प्रसन्न भाषाशैली, व-हाडी भाषेचा ठसका आणि अनोखी नजाकत, विनोदाचा शिडकावा, क्विनाईनची  कडूशार गोळी शुगरकोटेड करून ती वाचकांच्या गळी उतरवण्याचं त्याचं कमालीचं कौशल्य या गोष्टींमुळे ही कादंबरी केवळ वाचनीयच नाही तर संग्राह्यदेखील झाली आहे.

सर्व प्रश्न अनिवार्य
लेखक:  रमेश इंगळे उत्रादकर
प्रकाशक: शब्द प्रकाशन
पाने: 260
किंमत: रु.  275

हेही वाचा:
पुस्तक परीक्षण: दहशतवादाची रूपे

No comments:

माझे नवीन लेख मिळवण्यासाठी आपली इमेल नोंद करा..

शोध आणि बोध LATEST

कृपया हे पेज लाईक करावे