सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

Thursday, July 11, 2013

पुस्तक परिचय: उंदीरनामा

-महावीर सांगलीकर

उंदीरनामा हे छोटेसे पुस्तक म्हणजे उंदरांची उत्पत्ती, संस्कृती, धर्म, स्वभाव, इतिहास यांचे खुमासदार विडंबन आहे. हे पुस्तक कोण्या बोकाजीराव या फारशा ऐकिवात नसलेल्या लेखकाने लिहिलेले आहे. पुस्तकात लेखकाविषयी जी माहिती देण्यात आलेली आहे, त्यानुसार बोकाजीराव हे  वाघाची मावशी म्हणून प्रसिद्ध असणा-या नामवंत लेखिका मनीताई बोके यांचे लाडके सुपुत्र आहेत.  या मनिताई बोके यांचे नावही फारसे कोणाला माहीत नाही. सदर लेखक हा रानटी उंदरांचा शिकारी आणि नेहमी जंगलात रहाणारा असल्याने, आणि पुस्तकाचा विषय हा जंगल आणि त्यातील प्राणी हा असल्याने तेथील लेखकांची माहिती आम्हा मराठी मानव वाचकांना कळणे तसे अवघडच आहे.

उंदीरनामा या पुस्तकात लेखकाने उंदरांच्या प्रत्येक गोष्टीचे विडंबन केले आहे. पुस्तकात मजेशीर घटना, भाष्ये यांची रेलचेल आहे. वानगीदाखल पुढील मजकूर बघा:

........वाघाचा सुगावा तर लागला, पण त्याने एका उंदरीनिशी लग्न केल्याने त्याची पार शेळी झाली असल्याचे कळले.... उंदरांचे काळे उंदीर आणि पांढरे उंदीर असे दोन प्रकार आहेत. पांढरे उंदीर इराण मधून भारतात आले.....उंदरांच्या खानावळीत 'एक शेंगदाणा दोघात खाऊ नये' अशी पाटी अवश्य दिसते....उंदीर गोगलगायीला आपली माता मानतात.... एखाद्या उंदरास आपल्या प्रेयसीकडून प्रेम पत्र आले तर तो आनंदात तरंगण्या ऐवजी त्या प्रेम पत्रातील शुद्ध लेखनाच्या चुका काढता बसतो...वगैरे

उंदरांच्या चिंकृत भाषेविषयीच्या प्रेमाची टर उडवताना लेखक म्हणतो:
उंदरांची मूळ भाषा चिंकृत ही आहे. जगातील सर्व भाषा चिंकृत पासून तयार झाल्या असे उंदरांना मनापासून वाटते. चिमण्या चिवचिव करतात, पाली चुकचुकतात, डुकरे चिं चिं करतात, सुतार पक्षी चक चक करतो, हत्ती चित्कारतात, माणसे चिडतात याचा अर्थ या सर्वांच्या भाषा चिंकृत पासून तयार झाल्या आहेत हे शेंबडा उंदीरही सांगू शकतो. 

या पुस्तकात उंदरांनी मांजरांच्या विरोधात केलेल्या बंडाचे वर्णन मुळातच वाचण्यासारखे आहे. त्यातील हा मजकूर विडंबनाचा एक उत्कृष्ट नमुना आहे:

या बंडाला सत्तावनचे बंड म्हणतात. असे का म्हणतात याविषयी उंदीर इतिहास संशोधकांमध्ये मतभेद आहेत. काहींच्या मते या बंडात सत्तावन्न उंदरांनी भाग घेतला म्हणून याला सत्तावनचे बंड म्हणतात, दुस-या मतानुसार वनाची सत्ता कुणाची यासाठी हे बंड झाले. 

लेखकाने या संशोधनात्मक पुस्तकाच्या शेवटी 20 संदर्भ ग्रंथांची जी यादी दिली आहे तीही मजेशीर आहे. त्यातील कांही नावे पहा:

उंदीर परकीय आहेत काय? ले. मी.बी. इराणी, नयन घारे, ध्रुव गोरे  
वैदिक काळातील उंदरांचे विज्ञानाला योगदान: उन्दरोपंत शास्त्री
उंदरांना आणखी किती झोडपणार: मूषकेंद्र गोरे

उंदीर का झोडपले जातात? ले. नागोजी राव 
European Origin of Indian Rats: Dr. Undra Chuhosky Mushakov

पुस्तकातील अनेक विनोद हे 'सूक्ष्म' विनोद आहेत.

हे पुस्तक जंगली वाचकांना फारच आवडलेले दिसते हे पुस्तकात असलेल्या नामवंत वाचकांच्या प्रतिक्रियांवरून दिसून येते.

एकूणच हे पुस्तक आत्ता पर्यंत लिहिल्या गेलेल्या उंदीरविरोधी पुस्तकांहून एकदमच वेगळे आहे, आणि प्रत्येक उंदीर विरोधी वाचकाने आणि प्रत्येक उंदरानेदेखील वाचलेच पाहिजे असे आहे.

उंदीरनामा
लेखक: बोकाजी राव
प्रकाशक: जिजाई प्रकाशन
५८४ नारायण पेठ, कन्या शाळा बस स्टोप
जिजापूर, पुणे ४११ ०३०
फोन: २०-२४४७६५३९
पाने ४८, किंमत २० रुपये

माझे नवीन लेख मिळवण्यासाठी आपली इमेल नोंद करा..

शोध आणि बोध LATEST