सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

Saturday, August 24, 2013

रुपयाची घसरगुंडी की डॉलरची भाववाढ?

-महावीर सांगलीकर
  

आपल्या येथे अनेकांना हरेक गोष्टीकडे नकारघंटी नजरेने बघण्याची सवय झाली आहे. सध्या रुपयाच्या तथाकथित घसरगुंडीकडेही तशाच वाईट नजरेने बघितले जात आहे. मुळात ही डॉलरची भाववाढ आहे, त्यामुळे रुपयाची घसरगुंडी झाली असे म्हणण्यापेक्षा डॉलरची किंमत वाढली असे म्हणायाला पाहिजे, नाहीतर मग एखाद्या भाजीचे भाव वाढले तर देखील रुपयाची घसरगुंडी झाली असे म्हणायला पाहिजे.

नक्कारी लोकांच्या भाषेत जरी रुपया कोसळला असे मानले तरी त्याचा अर्थ आपली अर्थव्यवस्था कोसळली असा होत नाही. डॉलर किंवा इतर परकीय चलनांच्या दरांवरून अर्थ व्यवस्था किती चांगली किंवा वाईट आहे हे ठरत नसते.

डॉलरचे भाव वाढल्याने महागाई वाढणार हे खरे आहे, पण यामुळे अनेक फायदेही होणार आहेत. पहिला फायदा म्हणजे आता भारतीय वस्तू/सेवा परदेशात विकणे खूप फायदेशीर ठरणार आहे. म्हणजे समजा की डॉलरची किंमत पन्नास रुपये असताना एक डॉलरची वस्तू अथवा सेवा निर्यात केली की पन्नास रुपये मिळत होते, पण आता डॉलरचा भाव सत्तर रुपये झाल्यास त्याच वस्तूस सत्तर रुपये मिळणार आहेत. यामुळे भारतीय उद्योजक आणि व्यापारी जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करू शकणार आहेत. निर्यात प्रचंड प्रमाणात वाढणार आहे.

चीनने आपल्या युआन या चलनाचे मुद्दामहून अवमुल्यन केले, त्यामुळेच त्यांच्या वस्तू जगभर स्वस्तात मिळत असतात. भारतही हीच शक्कल लढवत आहे असे दिसते. त्यामुळे अजून कांही दिवसात डॉलरचा दर सत्तर रुपये किंवा त्याहून जास्त झाला तर नवल नाही.

डॉलरचे भाव वाढण्याचा दुसरा फायदा म्हणजे चैनीच्या वस्तूंच्या, सोन्या-चांदीच्या आयातीला आळा बसणार आहे.  त्यामुळे गरजेच्या वस्तूंच्या आयातीला डॉलर सहज उपलब्ध होणार आहेत. शिवाय डॉलरऐवजी इतर चलनातले व्यवहार वाढणार आहेत.

कोणत्याही चलनाचे भाव मुख्य करून मागणी आणि पुरवठा यावर ठरत असतो. डॉलरची मागणी वाढल्याने आता युरोपीय देशांसह जगभर डॉलरचा भाव वाढला आहे. असे असताना घसरगुंडी वगैरे नकारघंटी शब्द वापरून, डॉलरच्या भाववाढीचा बाऊ करून आधीच निगेटिव्ह असणा-या लोकांना घाबरवून सोडणे बरे नव्हे.

No comments:

माझे नवीन लेख मिळवण्यासाठी आपली इमेल नोंद करा..

शोध आणि बोध LATEST

कृपया हे पेज लाईक करावे