सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

Thursday, November 2, 2017

बदल स्वीकारायला उशीर कशाला?

-महावीर सांगलीकर 

काळ बदलला की आचार, विचार, रूढी, परंपरा, वेशभूषा, रितीरीवाज, संस्कृती, भाषा वगैरे गोष्टी बदलत असतात. इतकेच नाही तर नैतिकता-अनैतिकता यांची व्याख्याही बदलत असते. पूर्वी जे योग्य मानले जात होते ते आजच्या काळात योग्य असेलच असे नाही. आज जे योग्य वाटते ते पुढच्या काळात योग्य असेलच असे नाही. तसेच आजच्याच काळात आपल्याला जे योग्य वाटते ते दुसऱ्याना योग्य वाटत असेलच असे नाही, कारण प्रत्येक समाज घटकाची संस्कृती आणि संस्कार, विचार, गरजा वेगवेगळ्या असतात. एकाच समाजातल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये एकाच गोष्टीबद्दल वेगवेगळी मते असू शकतात.

याची कांही जिवंत उदाहरणे देता येतील. थायलंड या देशातील बौद्ध लोक बहुतांशाने शाकाहारी आहेत. पण ते अंड्याला शाकाहार मानतात, आणि गणपतीला अंड्याचा नैवेद्य देतात. (इथे आणखी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भारतातील नवबौद्धांना गणपती चालत नाही, पण थायलंडमधल्या बौद्धांना तो चालतो). भारतात अंड्याला शाकाहार मानले जात नाही. भारतात कोणी गणपतीला अंड्याचा नैवेद्य दाखवला तर दंगलच होईल. दुसरं उदाहरण म्हणजे भारतातले जैन लोक दुधाला शाकाहार मानतात, पण युरोप-अमेरिकेतले अभारतीय जैन लोक दूध हा प्राणिज पदार्थ असल्याने त्याला शाकाहार मानत नाहीत.
आणखी एक उदाहरण म्हणजे पूर्वी स्त्रियांनी नोकऱ्या करणे फारसे कुणाला मान्य नव्हते. आज तसे नाही. पूर्वी स्त्रियांना मित्र असणे तर राहू द्याच, त्यांनी घराबाहेरील एखाद्या पुरुषाशी बोलणे ही लोकांच्या पचनी न पडणारी गोष्ट होती. आज स्त्रियांना सहकारी, मित्र असणे याला  फारसा विरोध होत नाही. 

स्थळ-काळानुसार बदल हे होताच असतात. शहाणे लोक असे होणारे बदल चटकन स्वीकारतात आणि पुढे जातात. शहाणे नसणारे लोक मात्र बदलांना विरोध करत रहातात आणि मागे पडत जातात. पण गम्मत म्हणजे या शहाण्या नसणाऱ्या लोकांची पुढची पिढी बदल स्वीकारते. त्या अवधीत शहाण्या लोकांची पुढची पिढी कितीतरी पुढे निघून गेलेली असते.

बदल घडवून आणणारे, पुढे काय होणार आहे याची आत्ताच चाहूल घेऊन त्याप्रमाणे वागणारे, बदल खूप उशीरा स्वीकारणारे, बदलांना विरोध करणारे, बदल मुळीच न स्वीकारणारे.... यापैकी आपल्याला काय व्हायचं आहे हे आपणच ठरवायचं आहे! 

No comments:

माझे नवीन लेख मिळवण्यासाठी आपली इमेल नोंद करा..

शोध आणि बोध LATEST

कृपया हे पेज लाईक करावे