सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.
संत नामदेव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संत नामदेव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २४ जून, २०१२

वारकरी संप्रदायाचे मूळ कोठे आहे?

-महावीर सांगलीकर

सध्या कांही लोकांकडून वारकरी संप्रदाय आणि बौद्ध धर्म यांचा ओढून ताणून संबंध जोडण्याचा प्रकार चालू आहे. विठ्ठलाला बुद्ध ठरवणे, संत तुकारामांवर बौद्ध धर्माचा कसा प्रभाव होता हे दाखवण्याचा खटाटोप करणे इत्यादी गोष्टी होत आहेत. यामागे सत्यशोधन नसून कांही राजकीय, सामाजिक व आर्थिकही गणिते आहेत. (आर्थिक गणिते विशेषत: लेखक-प्रकाशक यांना लागू पडतात). असो.

आज वारकरी संप्रदाय प्रामुख्याने मराठा, कुणबी, माळी, अलुतेदार-बलुतेदार जाती यांच्यात दिसतो. या सगळ्या समाजात तेराव्या शतकापर्यंत आणि त्यानंतरही जैन धर्माचे अस्तित्व होते हे अनेक शिलालेखीय व साहित्यिक पुराव्यावरून सिद्ध करता येते. पण या जातींपैकी कुठल्याच जातीत बौद्ध धर्म अस्तित्वात होता याचा कसलाच पुरावा नाही. वारकरी संप्रदायावर बौद्ध धर्माचा कसलाच प्रभाव नाही, उलट हा संप्रदाय जैन धर्माचे झालेले रुपांतर आहे. वारकरी संप्रदायातील अनेक गोष्टी या जैन धर्माशी मेळ खातात, बौद्ध धर्माशी नाही. कसे ते पहा:

* जैन धर्म आत्म्याचे अस्तित्व मानतो, तसेच वारकरी संप्रदायात देखील आत्म्याचे अस्तित्व मानले गेले आहे. याउलट बौद्ध धर्म आत्म्याचे अस्तित्व अजिबातच नाकारतो. आत्म्याचे अस्तित्व न मानणा-या बौद्ध धर्मात वारकरी संप्रदायाचे मूळ असू शकत नाही.

* जैन धर्मात मोक्ष ही संकल्पना आहे, तशीच ती वारकरी संप्रदायातही आहे. बौद्ध धर्मात मोक्षाची वेगळी संकल्पना आहे आणि तिथे तिला निर्वाण म्हंटले जाते. मोक्ष ही संकल्पना वारकरी संप्रदायात जैन धर्मातूनच आली आहे. ती जर बौद्ध धर्मातून आली असती तर तिला निर्वाण असे म्हंटले गेले असते, मोक्ष नव्हे.

* जैन धर्मात मंदिरे आणि मूर्तीपूजा आहे. वारकरी संप्रदाय देखील मूर्ती व मंदिरे यांना मानतो. याउलट भारतातील  बौद्ध धर्मात पूजा हा प्रकार नाही, पण जैन धर्मात प्राचीन काळापासून आहे. किंबहुना पूजा ह्या प्रकाराचे मूळ जैन धर्मातच आहे, कारण वैदिक धर्मात यज्ञ हा प्रकार असायचा, तेथे पूजा नव्हती. अर्थातच वारकरी संप्रदायात पूजा करण्याची प्रथा जैन धर्मातून आली आहे.

* जैन धर्मात शाकाहाराला अतिशय महत्व आहे, तसेच शाकाहाराचे महत्व वारकरी संप्रदायातही आहे. याउलट बौद्ध धर्मात शाकाहाराला महत्व नाही. गौतम बुद्ध यांनी दुस-याने मारलेल्या जनावराचे मांस खायला हरकत नाही असे सांगितले आहे. पण वारकरी तर कट्टर शाकाहारी. याचाच अर्थ असा की वारक-यांचा शाकाहार जैन धर्मातून आला आहे, तेथे बौद्ध धर्माचा कसलाच संबंध नाही.

* जैन धर्मात उपवासाला अतिशय महत्व आहे, तसेच महत्व वारकरी संप्रदायात देखील आहे. याउलट गौतम बुद्ध यांनी उपवासाचा निषेध केला आहे. त्यामुळे उपवास करण्याची प्रथा वारकरी संप्रदायात बौद्ध धर्मातून नव्हे तर जैन धर्मातून आली आहे.

* जैन धर्म व वारकरी संप्रदाय या दोन्हीत चातुर्मासाला महत्व आहे. प्राचीन काळी बौद्ध धर्मात चातुर्मास पाळला जात असला तरी तेथे त्याला जैन धर्माइतके महत्व नव्हते. म्हणजे चातुर्मास मानण्याची प्रथा वारकरी संप्रदायात जैन धर्मातूनच येवू शकते, बौद्ध धर्मातून नव्हे.

* अनेक ओ.बी.सी. व बलुतेदार जातीत परंपरेने जैन धर्माचे पालन करणारे लोक दिसतात. उदाहरणार्थ शिंपी, कासार, कोष्टी, सुतार, गुरव, परीट, न्हावी वगैरे. परंतु अशा एकाही जातीत बौद्ध धर्माचे पारंपारिक अनुयायी दिसत नाहीत. महाराष्ट्रात एकाच जातीत जैन, वारकरी आणि महानुभाव अनुयायी असल्याचे दिसते, पण अशा जातीत बौद्ध धर्माचे अनुयायी का नसतात, याचाही या संदर्भात विचार करायला पाहिजे. 

याशिवाय वारकरी घालत असलेले साधे पांढरे कपडे, पायी यात्रा करणे वगैरे गोष्टी जैन धर्माचे अवशेष (Remains) आहेत.

अगदी अलीकडेपर्यंत या संप्रदायात गंभीर आजारी पडल्यास अन्न-पाणी यांचा त्याग करून मरण पत्करण्याची प्रथा होती. ही प्रथा सरळ सरळ जैन धर्मात असलेल्या सल्लेखना किंवा संथारा या प्रथेचा वारकरी संप्रदायावरील प्रभाव होता. बौद्ध धर्मात अशी प्रथा फारशी नव्हती, जी होती ती फक्त प्राचीन काळातच होती.

वारकरी संप्रदाय महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि तेलंगणा या भागात पसरलेला आहे. या संप्रदायाची सुरवात १३व्या शतकात झाली. याच भागात साधारण याच काळापर्यंत जैन धर्माचे अस्तित्व होते, पण तिथे या काळात बौद्ध धर्म अजिबात अस्तित्वात नव्हता. किंबहुना सातव्या-आठव्या शतकापर्यंत या भागातून बौद्ध धर्म पूर्णपणे संपला होता. याउलट जैन धर्म शिलाहारांच्या राजवटीपर्यंत म्हणजे तेराव्या शतकापर्यंत इथे टिकून होता. आता वारकरी संप्रदायाचा जन्म जेंव्हा झाला तेंव्हा अस्तित्वात नसलेल्या बौद्ध धर्माचा प्रभाव त्या संप्रदायावर कसा काय पडणार?

केवळ तुकाराम महाराज भंडा-याच्या डोंगरावरील बौद्ध गुफेत जायचे यावरून त्यांच्यावर किंवा वारकरी संप्रदायावर बौद्ध धर्माचा प्रभाव होता असे म्हणणे चुकीचे आहे. त्या गुफेत जाण्याचा त्यांचा हेतू चिंतन-मननासाठी एकांत मिळवणे हाच असू शकतो.

एकोणीसाव्या शतकातील एडवर्ड थॉमस हे इतिहास संशोधक आणि रॉयल एशियाटिक सोसायटीचे फेलो होते. आपल्या The Early Faith of Asoka या ग्रंथात त्यांनी अशी तक्रार केली आहे की इतिहास संशोधकांनी जैन धर्माकडे दुर्लक्ष करून बौद्ध आणि ब्राम्हणी धर्माला अवाजवी महत्व दिले आहे. आपल्या या ग्रंथात त्यांनी डॉक्टर स्टीवनसन या संशोधकाची मते देत सांगितले आहे की पंढरपूरच्या विठोबाची मूळ मूर्ती ही जैन तीर्थंकर नेमीनाथ यांची मूर्ती होती. पुढील काळात पंढरपूरचे मंदिर ब्राम्हणांच्या ताब्यात गेले आणि त्यांनी हळूहळू मूळ मूर्तीचे आपल्या स्वार्थासाठी रुपांतर केले.

विठ्ठलाचे मंदिर आज ब्राम्हणांच्या ताब्यात असले तरी या मंदिराची कायदेशीर वहिवाट अगदी अलीकडेपर्यंत विठ्ठलदास या जैन घराण्याकडे होती.

याचा अर्थ असा होतो की विठ्ठल, वारकरी संप्रदाय, जैन धर्म यांचा जवळचा संबंध आहे.

या मंदिराचे रुपांतर कसे कसे होत गेले या विषयावर तात्या केशव चोपडे यांनी पंढरपूरचा विठोबा हे पुस्तक लिहिले होते. हे दुर्मिळ पुस्तक माझ्याकडे असून लवकरच मी ते इंटरनेटवर अपलोड करत आहे.

हेही वाचा:   
संत तुकाराम आणि जैन धर्म
बौद्ध धर्म, जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता
भारतीय इतिहासाची जैन साधने: भाग 1: जैन शिलालेख
 बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला?

Popular Posts

कृपया हे पेज लाईक करावे