सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

Friday, April 19, 2013

ज्यांचा-त्यांचा राम आणि रामायण

 -महावीर सांगलीकर


भारतीय जनमानसावर ज्यांनी हजारो वर्षे राज्य केले आणि आजही ज्यांचा लौकिक आहे अशा व्यक्तिंमध्ये राम ही एक प्रमुख व्यक्ती आहे. रामाचा प्रभाव एवढा मोठा की मूळ रामायण वाल्मिकी ऋषि यांनी लिहिले असले (अर्थात त्याबद्दल मतभेद आहेत ) तरी जैन, बौद्ध आणि इतर अनेक परंपरांमध्येही रामाची कथा आहे.  त्याबरोबरच  रामाची ही कथा भारताच्या काना-कोप-यातील आदिवासी समाजात परंपरेने गेली हजारो वर्षे सांगितली जाते. भारतातील सगळ्या प्रमुख भाषांमध्ये  रामायणे  लिहिली गेली.  इतकेच नव्हे तर हे रामायण भारताच्या सीमा ओलांडून ब्रम्हदेश, कंबोडिया, इंडोनेशिया, थायलंड आणि अगदी फिलिपाइन्सपर्यंत पोहोचले. आज वेगवेगळ्या परंपरांशी संबंधीत रामायणाची शेकडो संस्करणे आहेत.


ही वेगवेगळी रामायणे वेगवेगळ्या दृष्टीकोणातून लिहिली गेली. इतकेच नव्हे तर मूळ मानल्या गेलेल्या वाल्मिकी रामायणातही कांही लोकांनी आपाल्याला अनुकूल अशी भर टाकली.

इथे मी वाल्मिकी रामायण आणि जैन-बौद्ध रामायणे यांचा थोडक्यात उहापोह करणार आहे.

वाल्मिकी रामायण
वाल्मिकी रामायणाची कथा साधारणपणे आपल्याला माहीत असते, कारण शालेय शिक्षणात, मुलांच्या पुस्तकात, कथा-कादंब-यांमध्ये, सिनेमा-टी.व्ही.मध्ये, मेडियामध्ये  हेच रामायण असते. पण खुद्द वाल्मिकी रामायणातील अनेक गोष्टी या प्रक्षिप्त आहेत. इतकेच नाही तर रामायणातील एकूण सात कांडापैकी बालकांड आणि उत्तरकांड हे दोन भाग मूळ वाल्मिकी रामायणात नव्हती, ती नंतर जोडली गेली.

प्रसिद्ध इतिहास संशोधक डी. डी. कोसंबी, एच.डी. सांकलिया यांच्या मते वाल्मिकी रामायण हे इसवी सन पूर्व तिस-या-चौथ्या शतकात लिहिले गेले. प्रख्यात  इतिहासकार डॉक्टर सुरेंद्र कुमार शर्मा यांनी रामायणातील जनक राजा हा बुद्धोत्तर असल्याचे दाखवून दिले आहे.  त्यामुळे वाल्मिकी रामायण हे महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या नंतरचे ठरते. वाल्मिकी रामायणाचे लेखन महावीर-गौतम बुद्ध यांच्या नंतर झाले याचा आणखी एक पुरावा म्हणजे यातील अयोध्या कांडात, जे जुने मानले जाते, गौतम बुद्धाचा उल्लेख आहे. (यथा हि चोर: स तथा हि बुद्धस्तथागतं नास्तिक मात्र विद्धि  . . .  वाल्मिकी रामायण अयोध्या कांड सर्ग १०९   श्लोक ३४ ). अर्थात हा श्लोक प्रक्षिप्त असू शकतो. वाल्मिकी रामायण संस्कृत भाषेत असणे हे त्याची निर्मिती बुद्धोतर काळात झाली हेच सुचवते. रामाचे सूर्यवंशी असणे ही गोष्ट देखील तो 'नंतर'चा असणे दाखवते कारण प्राचीन भारतातील राजघराणी ही चंद्रवंशी (सोमवंशी) होती, सूर्यवंशी घराणी नंतरच्या काळात भारतात आली.

ते कांहीही असले तरी साहित्याच्या दृष्टीने वाल्मिकी रामायण हे मानवी प्रतिभेचा उत्कृष्ठ आविष्कार आहे.

जैन रामायण
जैन परंपरेत राम, लक्ष्मण आणि रावण हे तिघेही ६३ शलाका पुरुषांपैकी तिघेजण आहेत. त्यामुळे जैन साहित्यात रामकथेला महत्व येणे सहाजिकच आहे.

जैन रामायणाची अनेक संस्करणे आहेत. सर्वात जुने जैन रामायण हे आचार्य विमलसुरी यांनी लिहिलेले पऊमचरयु हे आहे (इ.स. ३रे शतक ). हे रामायण महाराष्ट्री भाषेत आहे. वाल्मिकी रामायणातील प्रक्षिप्त, चमत्कारिक  आणि न पटणा-या गोष्टी, घटना काढून टाकून आचार्य विमलसुरी यांनी हे वास्तव रामायण लिहिले. 

पुढे आचार्य संघदासगणी यांनी वसुदेव हिंडी या ग्रंथात, आचार्य गुणभद्र यांनी उत्तर पुराणात, आचार्य हेमचंद्र यांनी त्रिशष्टी शलाका पुरुष या ग्रंथात रामाची कथा विस्ताराने लिहिली आहे.

जैन रामकथेची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे ती रामकथेने नव्हे तर रावणाच्या कथेने सुरू होते, या कथेत राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचा जन्म निसर्ग नियमाने झाला असून त्यामागे कोणा ऋषिने दशरथाच्या राण्यांना पुत्रप्राप्तीसाठी फळ देणे वगैरे प्रकार नाही. येथे रावणाला दहा तोंडे नसून एकच तोंड आहे. मारुती आणि त्याचे साथीदार वानर नसून प्रगत मानव आहेत, त्यामुळे त्यांना शेपट्या वगैरे प्रकार नाहीत. मारुती रामाचा दास किंवा भक्त नसून मित्र आहे.

विशेष म्हणजे रावणाशी झालेल्या युद्धात त्याला रामाने मारले नसून लक्ष्मणाने मारले. जैन रामायणात सीतेविषयी धोब्याने रामाकडे चहाडी करणे ही गोष्ट नाही आणि सीतेची अग्निपरीक्षा, निष्कासन हा प्रकारही नाही.  शम्बुकाची कथा आहे, पण तो शूद्र असून तप करतो म्हणून रामाने त्याला मारणे हा प्रकारही नाही, तर त्या तपस्व्याला भेटायला गेलेल्या लक्ष्मणाकडून तो चुकून मारला जातो अशी कथा आहे.

इतर कोणत्याही परंपरेत  नसणारे एक अधिकचे पात्र जैन रामायणात आहे, ते म्हणजे भामंडल. हा भामंडल सीतेचा भाऊ आहे. 

बौद्ध रामायण
बौद्ध रामायण हे दशरथ जातक  या नावाने  ओळखले जाते. बौद्ध रामायणही मानवी पातळीवरचे आहे. या रामायणातही राम आणि त्याच्या भावांचा जन्म निसर्ग नियमाने झाला आहे.  या रामायणात सीतेची अग्नीपरीक्षा, निष्कासन या गोष्टी नाहीत.  बौद्ध रामायणात सीता ही दशरथाची मुलगी अर्थातच रामाची  बहिण आहे. दशरथ हा वाराणसीचा राजा आहे. (अयोध्येचा नव्हे )

बौद्ध रामायणातील कथेनुसार दशरथ राम, लक्ष्मण, सीता यांना त्यांच्या सावत्र आईपासून वाचवण्यासाठी हिमालयात पाठवतो (दक्षिणेत नव्हे ).  कांही वर्षांनी राम, लक्ष्मण, सीता वाराणसीला परत येतात. मग तेथे राम आणि सीता यांचे लग्न होते. दशरथ जातकात लंकेचा उल्लेख नाही, तसेच रावणाचाही नाही.

वाल्मिकी रामायणाचे मूळ दशरथ जातकात आहे असे अनेक इतिहासकारांचे मत आहे.

 थायलंड, कंबोडिया, इंडोनेशिय आदी देशांमध्ये जे रामायण आहे, ते अर्थातच बौद्ध धर्मामुळे तेथे गेले.

रामाच्या नावाने राजकारण 
भारतीय जनता पार्टी या हिंदुत्ववादी राजकीय पक्षाने रामाच्या लोकप्रियतेचा गैरवापर सामान्य हिंदूच्या भावना मुस्लिमांविरुद्ध भडकवण्यासाठी केला.  लालकृष्ण आडवाणी  या  राजकीय नेत्याने अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी  रथयात्रा काढली, बाबरी मशीद पाडली आणि भारतात मुस्लिम दहशतवादाला जन्म दिला. विशेष म्हणजे हे लालकृष्ण आडवाणी  नास्तिक, देव-धर्म न माणारे आहेत. त्यांचा एक जावई मुस्लिम आहे.

भारताच्या आधुनिक इतिहासात ही जशी वाईट गोष्ट घडली, तशीच दुसरी वाईट गोष्ट म्हणजे बहुजनवाद्यांनी रामाला सातत्याने बदनाम करण्याची चाल खेळली. रामायण हा इतिहास नसून एक महाकाव्य आहे, त्यात लिहिलेल्या बहुतांश गोष्टी या काल्पनिक  असण्याचीच जास्त शक्यता आहे हे लक्षात न घेता किंवा त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत बहुजनवाद्यांनी रामाला आणि त्याच बरोबर हिंदू धर्माला टार्गेट करण्याचा सपाटा लावला. रामायणातील शंबूक वध, सीतेचे निष्कासन, रामाच्या जन्माची कथा आदी ज्या गोष्टींवर बहुजनवाद्यांचा आक्षेप असतो, त्या गोष्टीच मुळी प्रक्षिप्त आहेत हे लक्षात न घेता रामावर तोंडसुख घेणे हा निव्वळ मूर्खपणा आहे.

बहुजनवाद्यांचा ओढा बौद्ध धर्माकडे असतो. बौद्धांचे स्वत:चे रामायण आहे. असे असताना बौद्ध रामायणातील राम कसा आहे हे बघण्यापेक्षा वाल्मिकी रामायणातील प्रक्षिप्त भागातील रामावर टीका करण्याचे बहुजनवाद्यांना कारणच काय आहे? बौद्ध रामायणात राम आणि सीता हे भाऊ बहिण आहेत आणि त्यांचे एकमेकांशी लग्न होते, त्याबद्दल रामाच्या  बहुजनवादी  टीकाकारांचे काय मत आहे?

रामावर सातत्याने, तीही घाणेरड्या भाषेत टीका करून हे बहुजनवादी स्वत:च्याच पायावर कु-हाड मारून घेत आहेत, कारण ते करत असलेली टीका आणि टीका करण्याची पद्धत त्यांना सामान्य हिंदू समाजापासून दिवसेंदिवस दूर सारत आहे.

हेही वाचा:  
भगवान महावीर यांचे चातुर्मास आणि विहार
भारतीयांचा इतिहासबोध

3 comments:

. said...

Ramses was king from egypt who rescuded his wives from demon crossing nile river.

pravin said...

Ram was for real.Ramayan mentions 4 tusked elephants discovered by todays scientists.Rama had 4 wisdom teeth on both sides.Ancient people used to have it.For god sake don't just be biased or anti hindu .Read Vastav Ramayan to get your facts right.

Krish said...

थायलंड, कंबोडिया, इंडोनेशिय आदी देशांमध्ये जे रामायण आहे, ते अर्थातच बौद्ध धर्मामुळे तेथे गेले.
>> Um? No.. Hinduism predates Buddism in Thailand where Vishnu was chief god of Angkorwat temple. buddism came later.Thai ramayana is more closer to Valmiki ramayana not to buddist ramayana. kindly clear this mistake.
Second Yatha hi choratatha hi buddha verse does not talk about Buddha a person but quality of someone whos buddhi went to astray . namaa and Visheshana are different.

माझे नवीन लेख मिळवण्यासाठी आपली इमेल नोंद करा..

शोध आणि बोध LATEST

कृपया हे पेज लाईक करावे