सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

बुधवार, १८ जुलै, २०१२

जैन धर्माच्या प्रसारात ब्राह्मणांचे योगदान

-महावीर सांगलीकर

बौद्ध धर्माच्या प्रसारात ब्राह्मणांचे जसे मोठे योगदान आहे, तसेच ते जैन धर्माच्या प्रचार प्रसारातही आहे. पण बारकाईने पाहिल्यास महावीरपूर्वकालीन जैन धर्मात ब्राम्हणांना फारसे स्थान नव्हते असे दिसते, तर महावीरांच्या नंतर जे महान जैन आचार्य झाले त्यात ब्राम्हण आचार्यांबरोबरच इतर समाजातील आचार्यांची संख्या उल्लेखनीय आहे. याउलट बौद्ध धर्मात ब्राम्हणेतर महान साधूंची वानवा दिसते. असो.

जन्माने ब्राम्हण असलेल्या पण जैन धर्मात दीक्षित होवून या धर्माचा प्रचार-प्रसार करणा-या कांही प्रमुख आचार्यांचा परिचय मी येथे देत आहे:

इंद्रभूति गौतम: (इ.स. पूर्व ६वे शतक) इंद्रभूति गौतम हे भगवान महावीरांचे पहिले शिष्य होते. यांचा जन्म मगधेतील राजगृह जवळील एका खेड्यात गौतम गोत्रीय वैदिक ब्राम्हण घरात झाला होता. हे विविध विद्यांमध्ये पारंगत होते आणि ५०० विद्यार्थी असणारा आश्रम चालवत असत. भगवान महावीर वनातून राजगृहीला आल्यावर त्यांची ख्याती ऐकून इंद्रभूति गौतम महावीरांना भेटले, व वैदिक धर्माचा त्याग करून जैनत्वाची दीक्षा घेतली. त्यांच्या नंतर त्यांच्या ५०० शिष्यांनीही त्यांचे अनुकरण केले. इतकेच नव्हे, तर इंद्रभूति गौतम यांचे बंधू वायुभूति आणि अग्निभूति यांनीही भगवान महावीरांचे शिष्यत्व पत्करले. इंद्रभूति गौतम, वायुभूति आणि अग्निभूति हे तिघेही भगवान महावीरांचे गणधर, म्हणजे विशेष आणि प्रमुख शिष्य झाले.

भगवान महावीरांचे एकूण ११ गणधर होते आणि ते सगळे ब्राम्हण होते. या सर्वांनी भगवान महावीरांचे उपदेश संकलित केले, ते जैन आगम या नावाने ओळखले जातात. भगवान महावीरांचे वयाच्या ७२व्या वर्षी निर्वाण झाले. पण त्यांच्या आधीच या ११ गणधरांपैकी ९ जणांचे निर्वाण झाले होते.

सुधर्म स्वामी: (इ.स. पूर्व ६वे शतक) यांचा जन्म अग्नि वैश्यायन गोत्रीय वैदिक ब्राम्हण परिवारात झाला होता. हे देखील महावीरांचे गणधर होते. महावीरांच्या नंतर सुधर्म स्वामी यांनी जैन संघाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. जैन आगमांची रचना करण्यात सुधर्म स्वामींचे योगदान सर्वात मोठे आहे.

सुधर्म स्वामींच्या नंतर जैन संघाच्या प्रमुखपदी आचार्य सयंभव, आचार्य यशोभद्र स्वामी आणि आचार्य संभूत विजय हे आणखी तीन जैन आचार्य झाले, जे जन्माने ब्राम्हण होते.

आचार्य भद्रबाहु : (इ.स. पूर्व ४थे शतक) जैन इतिहासात आचार्य भद्रबाहु यांना विशेष प्रसिद्धी आही. हे सम्राट चंद्रगुप्ताचे धर्मगुरू होते. चंद्रगुप्ताने आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात आचार्य भद्रबाहु यांच्याकडे जैन मुनिदिक्षा घेतली. त्यानंतर हे दोघेही हजारो जैन साधूंसह दक्षिण भारतात आले व त्यांनी दक्षिण कर्नाटक आणि तमिळनाडू मध्ये जैन धर्माचा प्रचार केला. श्रवण बेळगोळ येथील चंद्रगिरी टेकडीवर या दोघांच्या समाध्या आहेत.

आचार्य स्थूलभद्र: (इ.स. पूर्व ४थे शतक) हे आचार्य भद्रबाहु यांचे शिष्य आणि मगध सम्राट धनानंद यांचा महामात्य शकडाल यांचे पुत्र होते. आचार्य स्थूलभद्र हे गौतम गोत्रीय ब्राम्हण होते आणि यांच्या घरात नंद घराण्याचे महामात्यपद परंपरेने मिळत असे. शकडाल यांच्या मृत्यूनंतर हे महामात्यपद स्थूलभद्र यांना मिळणार होते, पण ते न स्वीकारता स्थूलभद्र यांनी जैन मुनि दीक्षा घेतली व पुढे ते महान जैन आचार्य बनले.

आचार्य सुहस्ति: (इ.स. पूर्व ३रे शतक) आचार्य सुहस्ति यांचा जन्म वसिष्ठ गोत्रीय ब्राम्हण घराण्यात झाला होता. हे मौर्य सम्राट संप्रति (सम्राट अशोकाचा नातू) याचे धर्मगुरू होते. यांच्या मार्गदर्शनाखाली सम्राट संप्रतिने संपूर्ण पश्चिम भारतात जैन धर्माचा प्रचार केला.

उमास्वाती: (इ.स. ३रे शतक) उमास्वाती यांनी तत्वार्थ सूत्र हा प्रसिद्ध जैन ग्रंथ लिहिला. यात जैन तत्वज्ञानाचे विवेचन आहे. हा ग्रंथ आजही जैन समाजात लोक प्रिय आहे. उमास्वातींना उमास्वामी या नावानेही ओळखले जाते. हे जन्माने ब्राम्हण होते.

मानतुंग: (इ.स. ७ वे शतक) मानतुंग हे सम्राट हर्षवर्धनाच्या काळातील एक महान जैन आचार्य होते. हे जन्माने ब्राम्हण होते.

आचार्य हरिभद्र सुरी: हे आठव्या शतकातील एक महान जैन आचार्य होते. जन्माने ब्राम्हण होते, पण पुढे जैन दीक्षा घेतली. त्यांनी प्राकृत व संस्कृत या दोन भाषांमध्ये १००हून अधिक ग्रंथ लिहिले. त्यात रामायण व महाभारतातील भाकड कथांची टर उडवणारा धूर्ताख्यान हा ग्रंथ, तसेच समराईच्च कहा, सन्मति प्रकरण हे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत.

जिनसेन: (इ.स. ९वे शतक) दाक्षिणात्य जैन धर्मात आचार्य जिनसेन यांना विशेष स्थान आहे. हे राष्ट्रकूट सम्राट अमोघावर्ष यांचे धर्मगुरू होते. जिनसेनांचा जन्म एका कर्नाटकी ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांनी दक्षिण भारतात लाखो शेतक-यांना व उत्तर भारतात लाखो राजपुतांना जैन बनवले.

महावीराचार्य: महावीराचार्य हे देखील सम्राट अमोघवर्षाच्या काळात होवून गेले. हे महान गणिती होते. प्राचीन जगातील पहिल्या पाच महान गणितींमध्ये त्यांचे नाव येते. त्यांनी १०च्या २४व्या घातापर्यंतच्या आकड्यांना नावे दिली (एक, दश..... महाक्षोभ वगैरे), लघुत्तम साधारण विभाजक (ल.सा.वि.) काढण्याचे सूत्र शोधले, बीज गणितातील अनेक सूत्रे शोधली, निगेटिव संख्येला खरे वर्ग मूळ असू शकत नाही हा सिद्धांत मांडला, परम्यूटेशन कॉम्बीनेशनची सूत्रे शोधली. त्यांनी गणित सार संग्रह हा गणितावरील ग्रंथ लिहिला. यांचा जन्म एका कर्नाटकी ब्राम्हण कुटुंबात झाला होता.

आचार्य सुशील मुनि : आचार्य सुशील मुनी यांचा जन्म १९२६ मध्ये एका पंजाबी ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांनी जैन मुनिदिक्षा घेवून अमेरिका व इतर अनेक देशात जैन धर्माचा प्रचार केला. अमेरिकेत 'सिध्दाचलम' येथे त्यांनी जैन आश्रम चालू केला.

याशिवाय आचार्य अकलंक, कन्नड महाकवी पंप, पंडित रविकीर्ती अशी अनेक नावे घेता येतील.

आधुनिक काळात अनेक ब्राम्हण विद्वांनांनी पाचीन जैन साहित्याच्या आणि इतिहासाच्या संशोधनात आपले योगदान दिले आहे. त्यात महाराष्ट्रातील रामकृष्ण गोपाळ भांडारकर, शांताराम भालचंद्र देव, श्रीधर श्रोत्री, ब्रम्हानंद देशपांडे, नलिनी जोशी, विजय धारूरकर यांची नावे उल्लेखनीय आहेत.

हेही वाचा:
बौद्ध धर्मातील ब्राम्हण

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

चांगली माहीती दिली आहे. फक्त एक चूक दुरूस्त करावी ही विनंती. ल.सा.वि. म्हणजे लघुतम साधारण विभाज्य आहे. विभाजक हा नेहमी महत्तम साधारण असतो.

chetan म्हणाले...

चांगली माहिती आहे.. सर्वंकष समाजासाठी, प्रबोधन करणार्या ,परकिय आक्रमकांच्या विरुद्ध लढा दिलेल्या जैन समाजातिल महानुभावांची माहिती द्यावी

Popular Posts

कृपया हे पेज लाईक करावे