सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१२

ओ.बी.सी. आणि जैन धर्म

-महावीर सांगलीकर 


जैन धर्म आणि जैन समाज यांच्याबद्दल सगळीकडे प्रचंड गैरसमज आहेत. अनेकांना असे वाटते की जैन धर्म हा गुजराती-मारवाडी व्यापा-यांचा धर्म आहे. पण तसे कांही नसून जैन धर्म हा जनधर्म आहे.  जैन धर्मीयांची संख्या भारताच्या एकूण लोक संख्येत फारच कमी असली तरी हा धर्म भारताच्या वेग वेगळ्या भागात भारतीय समाजाच्या तळागाळात पसरलेला धर्म आहे. 

हिंदू समाजाप्रमाणेच जैन समाज हा देखील प्रामुख्याने शेतकरी, कारागीर जाती, आणि व्यापारी यांच्यापासून बनला आहे. याशिवाय अनेक आदिवासी व भटक्या-विमुक्त जाती-जमातीमध्ये जैन धर्म प्राचीन काला पासून रुजला आहे.  व्यापारी जैन समाज हा पटकन लक्षात येतो, पण इतर जैन हे सहसा लक्षात येत नाहीत.

शेतकरी, कारागीर व बलुतेदार जाती हा जैन समाजाचा एक महत्वाचा भाग आहे. यातील जाती  या इतर मागास वर्गीय जाती म्हणून ओळखल्या जातात.

'ओ.बी.सी. आणि जैन धर्म' या लेखाचा उद्देश जैन समाजातील या जातींचा परिचय करून देणे हा आहे.

इतिहास
कारागीर जातींचा आणि जैन धर्माचा संबंध अगदी प्राचीन काळापासून आलेला आहे. जैन साहित्यानुसार जैन धर्माचे शेवटचे तीर्थंकर वर्धमान महावीर यांचे अनेक शिष्य हे कारागीर जातीतील होते. महावीर हे विहार करताना अनेकदा आपल्या लोहार, कुंभार, विणकर शिष्यांकडे उतरत असत, त्यांच्या घरी जेवत असत याचे अनेक दाखले मिळतात. त्यांच्या शिष्यात माळी, शेतकरी हेही असत. सद्दालपुत्त हा कुंभार महावीरांच्या दहा प्रसिद्ध शिष्यांपैकी एक होता. तो आधी दैववादी होता, महावीरांनी त्याला दैववादापासून दूर नेले आणि पुरुषार्थी बनवले.

अनेक जैन शिलालेखात कारागीर जातीतील जैन धर्मानुयायींचे उल्लेख मिळतात. या बाबतीत मथुरा येथील शिलालेख महत्वाचे ठरतात. हे शिलालेख सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचे आहेत. या शिलालेखांमधून असे दिसते की त्या काळी लोहार, सोनार, गंधिक (अत्तर बनवणारे, अत्तार), माळी,  व त्यासारख्या जातींचे लोक जैन मंदिराच्या पूजा-प्रतिष्ठा वगैरे गोष्टीत सहभागी होत, मंदिरासाठी दान देत. (मथुरा शिलालेख ३१,४१,४२,४९, ५४,६२,६६,६७, जैन शिलालेख संग्रह भाग २).

पुढील शिलालेख पहा:
..........आर्य दिवीत यांच्या आदेशाने श्रमणकचा मुलगा शूर लोहार गोट्टीक  याने दान दिले.............(मथुरा शिलालेख ५४, जैन शिलालेख संग्रह भाग २).

हम्पी, विजयनगर येथील गणीगिट्टी बसदी या नावाने ओळखले जाणारे जैन मंदिर भारतातील प्रसिद्ध जैन मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर गणीगिट्टी या तेलीनीने बांधले होते. या मंदिरासाठी हरिहर दुसरा याचा मुख्य सेनापती इरुग, जो जैन धर्माचा अनुयायी होता, त्याने मदत केली होती.

कर्नाटकातील श्रवणबेळगोळ या ऐतिहासिक जैन ठिकाणी ६००हून अधिक शिलालेख आहेत. त्यातही तेली वगैरे जातींच्या जैन धर्मानुयायींचे उल्लेख आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात बाहुबली प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्रावरील सर्वात जुने मंदिर एका कोष्टी बाईने बांधले असा उल्लेख मिळतो. 

आजच्या जैन समाजात ओ.बी.सी. जाती 
आजही अनेक ओ.बी.सी. जातींमध्ये जैन धर्मानुयायी आहेत. कर्नाटकातील सगळ्याच स्थानिक जैन जातींना तिथल्या सरकारने ओ.बी.सी., तोही विशेष ओ.बी.सी. हा दर्जा दिला आहे. त्यात चतुर्थ (शेतकरी), पंचम, कासार/बोगार, चिप्पिगा (शिंपी), जैन गौडा, जैन बन्ट, जैन कुरुंब (धनगर) अशा अनेक जाती आहेत.

महाराष्ट्राबाबत बोलायचे तर मराठी जैन समाजात कासार आणि शिंपी मोठ्या प्रमाणात आहेत. त्याशिवाय विणकर-कोष्टी, भावसार, रंगारी, सुतार, धनगर, गवळी, कलार, न्हावी, परीट अशा अनेक जातींमध्ये तुरळक ते ब-या प्रमाणात जैन धर्म आढळतो. महाराष्ट्रातील १५ जैन जातींना ओबीसी दर्जा आहे असे जैन ओबीसी संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप फलाटणे यांनी सांगितले.

गुजरात मध्ये जैन धर्म तळागाळात पसरलेला असल्याने तेथील बहुतेक सगळ्या ओ.बी.सी. जातींमध्ये जैन धर्म आढळतो. त्यातही लेवा पाटीदार, धनगर, भावसार, कंदोई/हलवाई  या जातींमध्ये जैन धर्म मोठ्या प्रमाणावर आहे.  राजस्थान, हरयाणा, पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश या भागात जाट समाजात प्राचीन काळापासून जैन धर्माचे अस्तित्व आहे. याच भागातील गुर्जर आणि अहिर समाजातही जैन धर्मानुयायी मोठ्या प्रमाणावर आहेत. हे सर्व ओ.बी.सी. आहेत.

वरील राज्यांप्रमाणे भारताच्या इतर राज्यातही अनेक ओ.बी.सी. जातींमध्ये जैन धर्माचे अनुयायी आहेत. 

जैन समाजातील ओ.बी.सी. लोकसंख्या किमान ५०% असावी. भारतभरातील जैन साधूंमध्ये ओ.बी.सी. समाजात जन्मलेल्या साधुंची संख्या जास्त आहे. यातील अनेक साधूंनी क्रांतीकारक काम केलेले दिसते.


हेही वाचा:    
भारतीय इतिहासाची जैन साधने: भाग 1: जैन शिलालेख
मातंग समाज आणि जैन धर्म
राजपुतांच्या कांही कुळ्यांचे दक्खनी मूळ
बौद्ध धर्म, जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता
महाराष्ट्र आणि जैन धर्म

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular Posts

कृपया हे पेज लाईक करावे