सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

Thursday, September 6, 2012

सैनिक आणि देशप्रेम: सैनिक का लढतात?

-महावीर सांगलीकर

आपल्या येथे अनेक लोकांचा असा समज असतो की सैन्यात भरती होणारे तरुण हे देशसेवेसाठी सैन्यात जातात. त्यांच्यात देशप्रेमाची भावना इतर लोकांपेक्षा जास्त असते वगैरे. पण हे कितपत खरे आहे?

या संदर्भात १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धातील भारताच्या विजयाचे शिल्पकार त्यावेळचे भारताचे सरसेनापती फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांचे मत महत्वाचे आहे. त्या युद्धातील विजयानंतर एका इंग्रजी नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत माणेकशा म्हणतात: आम्ही देशासाठी नव्हे तर पोटासाठी लढतो.

माणेकशा यांच्यासारखे अनुभवी आणि महान सेनापती असे म्हणतात याला नक्कीच कांहीतरी अर्थ आहे. नाहीतरी आपल्याकडे सैन्य पोटावर चालते अशी एक म्हण आहेच.

सैन्यात भरती होणारे लोक देशप्रेमामुळे, देशाच्या रक्षणासाठी किंवा देशसेवेसाठी नव्हे तर केवळ एक पेशा म्हणून तेथे भरती होत असतात, हे अनेक उदाहरणे देवून स्पष्ट करता येईल. पहिले उदाहरण म्हणजे गुरखा सैनिकांचे. गुरखा समाजात लष्करात भरती होण्याची परंपरा आहे. मुळचे नेपाळी असणारे हे गुरखा लोक नेपाळ, भारत आणि इंग्लंडच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात भरती होत असतात. अलीकडे ते अमेरिकेच्या सैन्यातही दाखल होत आहेत. लढणे हा त्यांचा पेशा आहे. त्यांच्या या पेशाचा देशप्रेमाशी किंवा देशासाठी लढण्याशी कांहीही संबंध नाही. नेपाळ, भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या एका करारानुसार नेपाळी नागरिक असणा-या गुरख्यांना भारताच्या किंवा इंग्लंडच्या सैन्यात भरती होता येते.

गुरखा सैनिक हे अत्यंत पराक्रमी असतात. त्यांच्या या पराक्रमाचा ते कोणत्या देशाकडून लढतात याच्याशी कसलाच संबंध नाही. भारतावर इंग्रजांचे राज्य असताना इंग्रजांच्या भारतीय सैन्यात व्हिक्टोरिया क्रॉस हे वैयक्तिक पराक्रमाचे सर्वोच्च पदक सगळ्यात जास्त वेळा गुरखा सैनिकांनी पटकावले आहे. व्हिक्टोरिया क्रॉस हे पदक भारत स्वतंत्र झाल्यावर परमवीर चक्र या नावाने देण्यात येवू लागले. स्वतंत्र भारताच्या इतिहासात देखील सगळ्यात जास्त परमवीर चक्रे गुरखा सैनिकांनीच मिळवली आहेत. गुरखा सैनिकांनी मिळवलेल्या इतर पदकांची तर गणनाच करता येणार नाही. भारतीय किंवा ब्रिटीश नसताना हे गुरखा सैनिक या देशांच्या सैन्यात भरती होतात, लढतात, याचे कारण तो त्यांचा पेशा आहे हेच आहे.

अलीकडे इंग्लंड आणि अमेरिकेच्या सैन्यात गुरखा तरुणांप्रमाणेच भारतातील शीख, जाट या लढाऊ समाजातील तरुणही मोठ्या प्रमाणावर भरती होवू लागले आहेत.

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेमध्ये जे सैनिक होते, ते मुळात ब्रिटीशांच्या सैन्यातील सैनिक होते. जपान व जर्मनी यांच्या विरोधात इंग्रजांच्या बाजूने लढताना पराभूत झाल्याने जे भारतीय सैनिक जपानी किंवा जर्मन सैनिकांना शरण गेले, ते हे सैनिक पुढे सुभाष बाबूंच्या सैन्यात भरती झाले. अगोदर हे सैनिक आझाद हिंद फौजेत जायला तयार नव्हतेच. पुढे आझाद हिंद फौजेने ब्रम्हदेशाच्या सीमेवरून भारतावर आक्रमण केले, तेंव्हा राग-रंग पाहून फौजेतील अनेक सैनिक ब्रिटीश-भारतीय सैन्याला जावून मिळाले. असे का व्हावे? ही आपल्या विषयाच्या संदर्भात विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

सैन्यात भरती होणे हा पेशा असतो ही गोष्ट सर्वच सैनिकांना लागू होते. शेतकरी लोकांची पोटे भरावीत म्हणून शेती करत नाहीत, शिक्षक देशाची भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षक होत नसतात, डॉक्टर रुग्णांची सेवा करायला मिळावी म्हणून लाखो रुपये खर्च करून डॉक्टर होत नसतात आणि कायद्याचे रक्षण करायला मिळावे म्हणून कोणी पोलीस अथवा वकील होत नसतात. अगदी तसेच सैनिकांचे आहे. भारतीय सैन्यात भरती व्हायला बरीच मोठी लाच द्यावी लागते असे भरतीसाठी जाणा-या अनेक तरुणांनी मला सांगितले. अनेक तरुण पैसे देवून सैन्यात भरती होत असतात. आता अशी लाच देवून देशासाठी मरायला जायची हौस एखाद्याला कशी काय असू शकते?

सैन्यात भरती होणारे तरुण साधारण १८-१९ वर्षे या वयाचे असतात. ते जास्त करून खेडेगावातील असतात. गरीब घरातील आणि अल्पशिक्षित असतात. जर ते धडधाकट असतील तर सैन्यात भरती होणे हा त्यांच्यासाठी रोजगाराचा एक उत्तम पर्याय असतो, म्हणूनच ते सैन्यात भरती होतात.

मग सैनिक का लढतात?
मग असा प्रश्न पडतो की सैनिक का लढतात? तेही जीवावर इतके उदार होवून? याचे पहिले उत्तर असे की जसे बहुतांश लोक आपापल्या पेशाशी प्रामाणिक असतात, तसेच सैनिकही त्यांच्या पेशाशी प्रामाणिक असतात. लढणे हा त्यांच्या कामाचा मुख्य भाग असतो. शिवाय लढाईच्या वेळी लढण्याशिवाय त्यांच्यापुढे दुसरा मार्गही नसतो. मारा किंवा मरा हे दोनच पर्याय त्यांच्यापुढे असतात. शत्रूला मारले नाही तर आपण मरतो , शरण गेले तर घरी परत जायची शाश्वती नाही आणि पळून जायचा प्रयत्न केला तर आपलेच साथीदार आपल्याला गोळ्या घालतील या गोष्टीची प्रत्येक सैनिकाला जाणीव असते. शिवाय पळून जाणे, शत्रूला पाठ दाखवणे ही तर सैनिकांच्या दृष्टीने मोठ्या नामुष्कीची, अपमानाची गोष्ट. अशी नामुष्की पत्करण्यापेक्षा मरण पत्करणे चांगले अशीच प्रत्येक सैनिकाची मानसिकता असते.

याशिवाय युद्धकाळात भरीव कामगिरी करणा-या सैनिकांचा विविध पदके देवून सन्मान केला जातो. एखादी रिबन छातीवर चढते, किंवा अधिका-याकडून किमान शाबासकी तर मिळते. हे सगळे कौतुक त्या सैनिकाच्या पथकातील साथीदारांसामोरच होत असते, आणि असे छोटेसे कौतुक आपल्या सुद्धा वाट्याला यावे म्हणून प्रत्येक सैनिक झटत असतो.

सैनिकांना जी शपथ दिली जाते तीत त्यांच्या निष्ठा अगोदर आपल्या वरचे अधिकारी, मग आपली कंपनी, त्यानंतर आपली रेजिमेंट आणि सर्वात शेवटी देशाला वाहिलेली असते. यातही सैनिकी हा पेशा आहे हेच दिसून येते.

याचा अर्थ असा नव्हे की सैनिकांना देशप्रेम नसते. पण त्या देशप्रेमाचा आणि सैन्यात भरती होण्याचा, जीवावर उदार होवून लढण्याचा कांही संबंध नसतो. प्रत्येकजण आपापल्या आवडीप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे आपला पेशा निवडत असतो. कांही जणांना सैनिक व्हावे असे वाटते. तसे ते होतात. कारण सैनिकी पेशा त्यांना आवडत असतो.

1 comment:

DnyaneshParab said...

छान लेख आहे , छान विचार आहेत

जगातील कोठल्याही राष्ट्रांच्या सैनिकांमध्ये शिस्त असते, त्यांच्यात नियोजन असते, त्यांनी त्यांच्या वरिष्ठांची आज्ञा सदैव पाळायची असते. ते सैनिक राष्ट्रप्रेमी/देशप्रेमी असतात हे मान्य आहे. पण सर्वात महत्वाचे म्हणजे ते त्यांच्या नोकरीशी(Profession शी) बरयाच वेळा प्रामाणिक असतात. एखाद्यावेळी सैनिकच किंवा त्यांचा ठराविक गट बंड /उठाव करतो, ही देखील जागतिक इतिहासातील वस्तुस्थिती आहे.

पण मला काही जर वेगळे सांगावयाचे आहे. भारतीय सैनिक जे पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर सतत भारताचे रक्षण करत असतात, युद्धात अप्रतिम विजयी कामगिरी करतात किंवा कोठल्याही नैसर्गिक किंवा मानवग्रस्त(जातीय दंगल) आपत्तीत राष्ट्राची मदत करत असतात ते अतुलनीय आहे.

पण यांच्याविषयी आदर ठेवून असे म्हणावेसे वाटते की काही राज्यांमध्ये विशेषतः उत्तरपूर्व भारतातील राज्यांमध्ये काही भारतीय सैनिकांच्या (सर्व न्हवे…. ) तेथील सर्व सामान्य नागरिकांवरील अत्याचारांच्या कहाण्यासुद्धा प्रसिद्ध झाल्या आहेत. कारण राष्ट्र म्हणजे समाजातील सर्वच घटक असतात आणि ते समान दर्जाचे असतात. त्यामुळे कोणीही कोणावर अन्याय करता कामा नये हे महत्वाचे सूत्र आहे.

माझे नवीन लेख मिळवण्यासाठी आपली इमेल नोंद करा..

शोध आणि बोध LATEST

कृपया हे पेज लाईक करावे