सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

Thursday, January 16, 2014

अंगविज्जा: देहबोली आणि अंगलक्षणावरील प्राचीन ग्रंथ

-महावीर सांगलीकर

अंगविज्जा हा देहबोली आणि अंगलक्षणशास्त्र या विषयावरील अदभूत प्राचीन ग्रंथ ग्रंथ आहे. अंगविज्जा म्हणजे अंगविद्या होय. हा ग्रंथ इसवी सनाच्या चौथ्या शतकातील असून तो मरहट्टी उर्फ महाराष्ट्री प्राकृत भाषेत आहे. सदर ग्रंथात साठ अध्याय असून नऊ हजार श्लोक आहेत. या विषयावरील हा सर्वात मोठा ग्रंथ आहे. ग्रंथामध्ये ग्रंथकर्त्याचे नाव लिहिलेले नाही.

हा ग्रंथ ग्रह, नक्षत्र, तारे यांच्या स्थानावरून,  जन्म कुंडलीवरून फलादेश करत नाही, तर माणसाच्या सहज हालचाली, त्याची शारीरिक वैशिष्ट्ये,  त्याचे रहाणीमान वगैरे गोष्टींवरून त्याचे 'वाचन' करतो. प्रश्न विचारणारी व्यक्ति प्रश्न विचारताना कोणत्या अवस्थेत प्रश्न विचारते, त्यावेळी ती तिच्या कोण कोणत्या अवयवांना स्पर्श करते, ती प्रश्न उभे राहून विचारते की बसून विचारते, प्रश्न विचारताना ती हसते की रडते, त्यावेळी ती विनयी आहे का अविनयी, तिचे चालणे, बोलणे, तिने नेसलेली वस्त्रे, आभूषणे, त्या व्यक्तीबरोबर आणखी कोण आले आहे अशा अनेक बाबींचे निरीक्षण करून या शास्त्राचा ज्ञाता फलादेश देतो.या ग्रंथात मनुष्याचे बसने, उभे रहाणे, ठेका धरणे, हसणे, रडणे, जांभई देणे वगैरे शेकडो क्रियांचे वर्णन केले आहे.  मनुष्याच्या अंगाचे 270 प्रकार/लक्षणे  दिली आहेत. बसण्याचे 32, टेकण्याचे 17, उभे रहाण्याचे 28, बघण्याचे 10, हसण्याचे 14, नमस्कार करण्याचे 16 प्रकार सांगितले आहेत. याशिवाय येण्याचे (आगमन) 16, रडण्याचे 20, जांभईचे 7, आलिंगनाचे 14, चुंबनाचे 16 प्रकार सांगितले आहेत.

पण या ग्रंथाचे महत्व केवळ फलादेशापुरतेच मर्यादित नाही, तर या ग्रंथात इतिहास, आयुर्वेद, शेती, प्राणीशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, भाषाशास्त्र, नानकशास्त्र, संस्कृती, वाणिज्य  वगैरे अनेक विषयांच्या संशोधकांना उपयोगी असे हजारो संदर्भ आहेत. विविध प्रकारची नाणी, धातू, मापे, आयुधे, आभूषणे, लोक, देव-देवता, प्राणी, वनस्पती, ऋतू, वाहने, खाद्यपदार्थ, वस्त्रे, व्यवसाय, राजकीय आणि प्रशासनिक पदे आणि इतर अनेक गोष्टींचे  विस्ताराने केलेले वर्णन त्याकाळातील समाजजीवन समजून घ्यायला उपयोगी पडतात. त्याचप्रमाणे हा ग्रंथ डॉक्टर्स, वकील, न्यायाधीश, पोलीस, दिग्दर्शक, नाटककार, लेखक यांनाही माणसांचे निरीक्षण करण्यासाठी आणि निष्कर्ष काढण्यासाठी उपयोगी पडू शकतो.

अंगलक्षण शास्त्र हे प्राचीन काळात समाजात प्रचलित होते. पण लिखित रूपाने त्याची एकत्रित माहिती देणारा हा एकमेव ग्रंथ आजपर्यंत शिल्लक राहिला आहे. हा ग्रंथ विशाल जैन साहित्याचा एक छोटासा भाग आहे. मूळ ग्रंथ चौथ्या शतकाच्या आसपास गुप्त-कुशाण काळात लिहिला गेला व पुढे 15 शतके त्याच्या हस्त लिखित प्रती निघत राहिल्या. त्या जैन शास्त्र भांडारात सुरक्षित राहिल्या. अलीकडे 1957 साली प्राकृत टेक्स्ट सोसायटीने हा ग्रंथ छापील स्वरूपात प्रकाशित केला. त्यासाठी 7 वेगवेगळ्या हस्तलिखित प्रतींचा वापर करण्यात आला. मुनि पुण्यविजय यांनी संपादित केलेला हा ग्रंथ भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना अर्पण करण्यात आला. या ग्रंथाची दुसरी आवृत्ती इ.स. 2000मध्ये प्रकाशित झाली आहे. मोठ्या आकाराची सुमारे 500 पाने असलेला हा ग्रंथ संबधीत विषयांच्या अभ्यासकांच्या संग्रही असायलाच पाहिजे.  ग्रंथास हिंदी व इंग्रजी प्रस्तावना देण्यात आली आहे, पण मूळ मजकूर मूळ प्राकृत भाषेतच देण्यात आला आहे. त्याचा हिंदी व इंग्रजी अनुवाद होणे गरजेचे आहे, पण असा अनुवाद करणे ही फारच अवघड गोष्ट आहे. कारण अनुवादकास प्राकृत भाषा तर यायलाच पाहिजे, पण त्याच बरोबर या ग्रंथात दिलेल्या शेकडो विषयांचे सामान्यज्ञानही असायला पाहिजे.

माझे पणजोबा त्यांच्याकडे येणा-या लोकांच्या देहबोलीवरून ते कशासाठी, कोणता प्रश्न घेवून आले आहेत ते ओळखत. त्या माणसाने प्रश्न विचारण्या अगोदरच ते त्याला उत्तर देत आणि तो समाधानाने दारातूनच परत फिरे. त्यांच्याकडे हे ज्ञान कोठून आले कुणास ठाऊक. त्या काळात, म्हणजे साधारण 1920 च्या दरम्यान त्यांची स्वत:ची 'पर्सनल लायब्ररी' होती.

अंगलक्षण आणि देहबोली या विषयावर आधुनिक काळात बरेच संशोधन झाले आहे.

शेरलॉक होम्सच्या कथांमध्ये ब-याच वेळा देहबोली आणि अंगलक्षण यावरून माणसाचे वाचन करण्याची पद्धत अवलंबलेली दिसते.

अंगलक्षण शास्त्र हा माझ्याही आवडीचा विषय आहे.या विषयाचा मी बराच अभ्यास केला आहे, आणि त्यामुळे मी माणसे ओळखायला चांगलेच शिकलो आहे.हेही वाचा:
शुन्याचा शोध आणि जैन गणित 
भारतीय नौकानयन आणि आरमाराचा इतिहास
भारतीय इतिहासाची जैन साधने: भाग 1: जैन शिलालेख

1 comment:

ajay jadhav said...

हा ग्रंथ माझ्यासारख्या मानसशास्त्राच्या अभ्यासकाला फारच माहितीपूर्ण ठरेल, यात शंका नाही..

माझे नवीन लेख मिळवण्यासाठी आपली इमेल नोंद करा..

शोध आणि बोध LATEST

कृपया हे पेज लाईक करावे