दत्ता राशिनकर, चिंचवड
मो. 901 131 6199
पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. आजच्या नव्या पिढीला भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा जो 'इतिहास' माहीत आहे, तो बस एवढाच. यापेक्षा जास्त खोलात जावून अधिक चिकित्सक पद्धतीने त्याचा अभ्यास करण्याची ना त्यांना गरज आहे ना आवड. त्यांच्या या उदासिनतेचा फायदा उठवत गेली पन्नास-साठ वर्षे सत्तेचा shortcut शोधणा-यांनी या तरुण पिढीच्या बुद्धीभेदाचा जो धंदा चालवला आहे, त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही.
ब्रिटीशांच्या सत्ताकाळातला भारत आजच्या भौगोलिक भारतापेक्षा वेगळा होता. आजचा पाकिस्तान आणि बांगला देश ही दोन्ही राष्ट्रे अखंड हिंदुस्तानात होती. हिंदुस्तान स्वतंत्र होण्यापूर्वी त्याचे दोन भाग झाले. भारत व पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश निर्माण झाले. (पुढे 1971 साली इंदिराजींच्या असामान्य राजकीय कौशल्यामुळे पाकिस्तान दोन देशात खंडित झाला). अखंड हिंदुस्तानची फाळणी झाली. ती का झाली? कशी झाली? या फाळणीला जबाबदार कोण? याचे जुजबी ज्ञान पण नव्या पिढीला नाही. त्यांच्या मनात एवढेच ठसवले जाते की 'इंग्रजांनी जाता जाता अखंड हिंदुस्तानची फाळणी केली आणि या फाळणीला गांधी, नेहरू आणि सरदार पटेल जबाबदार आहेत'. यातील ऐतिहासिक सत्य किती आणि सत्याचा अपलाप किती याचे उत्तर शोधायचे असेल तर यासाठी थंड डोक्याची आणि अभ्यासू वृत्तीने या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता आहे. ही गोष्ट सोपी नाही. आजपर्यंत अनेकांनी आपापल्या परीने या गोष्टीचा परामर्श घेतला आहे. परंतु अत्यंत साक्षेपी वृत्तीने या गोष्टीचा अभ्यास करणे फारच थोड्यांना साधले आहे. या थोड्यांमध्ये शेषराव मोरे हे नाव विशेषत्वाने घ्यावे लागेल. त्यांचे गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेले 'काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?' हे पुस्तक अभ्यासूंनी अवश्य वाचावे असे आहे.
केवळ ऐकीव आणि थातुर-मातुर ज्ञानावर एखाद्या महान घटनेची वासलात लावणे किती घातक असते याचा प्रत्यक्ष अनुभव मोरे यांनी त्यांचा 1988 साली प्रसिद्ध झालेल्या पहिल्याच ग्रंथातून घेतला आहे. 'फाळणी हे काँग्रेसचे पाप आहे आणि या फाळणीला गांधी व नेहरू हेच जबाबदार आहेत' हेच त्यांचे पण मत होते. पण त्यांनीच कबूल केल्याप्रमाणे त्यांचे हे मत भावनिक आणि अतार्किक स्वरूपाचे होते. ती चूक सुधारण्या साठी त्यांनी 'काँग्रेसने आणि गांधी जींनी अखंड भारत का नाकारला?' हा ग्रंथ सिद्ध केला आहे.
'भारत अखंड राहिला असता तर काय झाले असते?' याचे अगदी मर्मग्राही चित्रण मोरे यांनी आपल्या प्रस्तुत ग्रंथात केले आहे. अगदी एकच गोष्ट सामान्य वाचकांसाठी सांगायची झाली तर एक साधा प्रश्न त्यांनी आपल्या मनाला विचारून बघावा की भारत अखंड राहिला असता तर जनतेला आणि व भारतातील शेकडो संस्थानिकांना मान्य होईल अशा राज्य घटनेचे स्वरूप काय राहिले असते? सर्वसंमत राज्यघटना ही अखंड भारताची पूर्व अट राहिली असती. ती आजच्या भारतीय राज्यघटनेसारखी राहिली असती काय?
सक्तीने अखंड भारत ठेवला तर काय होईल यासंबंधी डॉ. आंबेडकरांनी 1940 साली म्हटले होते की, '(अखंड) भारत हा एक देश म्हणून ओळखला जाईल परंतु वास्तविकपणे त्यात हिंदुस्तान व पाकिस्तान हे दोन देश कृत्रिमपणे एकत्र बांधलेले असतील. विशेषत: ते द्विराष्ट्र सिद्धांताच्या तणावाखाली असतील. द्विराष्ट्रवाद हा ऐक्यभावनेच्या वाढीला वावच देणारा नाही. सक्तीच्या अखंडतेविरोधात केंव्हातरी जीवन-मरणाचा लढा सुरू होईल. …. जर एखाद्या समर्थ शक्तीमुळे फाळणी अशक्य बनली तर भारत हे एक रक्तहीन, आजारी, परिणामशून्य राज्य बनेल. ते जिवंत प्रेत, न पुरलेला मृत देह बनेल. (a living corpse, dead though not buried) अर्थात हे हिंदूंच्या दृष्टीने असेल'.
फाळणीचा समग्र इतिहास वाचकांपुढे उलगडून दाखवण्यासाठी लेखकाने जी शेकडो अवतरणे दिली आहेत, ती त्याच्या अभ्यासू वृत्तीची द्योतक आहेत. आपल्या विचारातील त्रुटी दिलदारपणे मान्य करून त्या सुधारण्यासाठी मोरे यांनी परिश्रम पूर्वक हा ग्रंथ लिहिला आहे. फाळणीचा इतिहास समजून घेण्यासाठी हा ग्रंथ वाचणे आवश्यक आहे, विशेषत: गांधी नेहरू द्वेषाची कावीळ झालेल्यांना तर ते फारच गरजेचे आहे.
काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?
लेखक: शेषराव मोरे
प्रकाशक: राजहंस प्रकाशन, पुणे
पाने 734 किंमत रु. 750
हेही वाचा:
दहशतवादाची रूपे
आणखी मराठी पुस्तके
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा