सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

बुधवार, ३ जुलै, २०१३

पुस्तक परिचय:वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणा

-मधुकर जाधव  ८४१२८३१०२५


नुकतीच अंधश्रद्धाविरोधी (जादूटोणाविरोधी ) विधेयकाला राज्यमंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. मा. मुख्यमंत्र्यांनी  येत्या पावसाळी अधिवेशनात हे  विधेयक विधानसभेत व विधानपरिषदेत मंजूर करून घेवून त्याचे कायद्यात रुपांतर केले जाईल, असे सांगितले आहे.त्यामुळे लवकरच हा कायदा होईल अशी शक्यता आहे.परंतु, सदरचे विधेयक गेली १४-१५ वर्षे चर्चेत आहे.आमच्या श्रद्धेला,धर्माला धोका निर्माण होतो, आमच्या देवांची पूजा-भक्ती करणेही या कायद्यामुळे गुन्हा ठरेल अशा कारणांच्या आडून प्रचंड विरोध होत आहे. कायद्याचे समर्थक व विरोधक यांचा अंधश्रद्धांना विरोध आहेच, पण श्रद्धा कोणती आणि अंधश्रद्धा कोणती यावरच मुलभूत मतभेद आहेत. या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे देव, धर्म, पूजा, भक्ती, श्रद्धा यांनाच
बंदी येईल असे या प्रस्तावित कायद्यात काहीही नाही. तरीही विरोधकांना असे का वाटते, हे समजून घेण्यासाठी ‘वैज्ञानिक दृष्टिकोण व जादूटोणा’ हे सुप्रसिद्ध लेखक,संशोधक,विचारवंत आणि व्याख्याते प्रा.अशोक राणा यांचे  छोटेखानी पुस्तक महत्वाचे आहे. बुद्धिप्रामाण्यवादी विवेकशील समाजनिर्मिती व्हावी यासाठी समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणे गरजेचे आहे. सदरचे  पुस्तक वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित
होण्याच्या दृष्टीने वाचनीय आहे.

कोणत्याही क्षणी, कशाही स्थितीत,  कोणत्याही ठिकाणी व कुणालाही ज्याचा पडताळा घेता येतो तेच सत्य मानावे. सत्य हे सार्वत्रिक असते.व्यक्तिगत अनुभवांना आपण सत्य  मानू  शकत नाही. त्यांची गणना भ्रम आणि आभासात होऊ शकते.पण हाच अनुभव सर्वांना व सर्वस्थितीत येत असेल तर  मात्र तो सत्य असू शकतो. या वस्तुस्थितीचा स्विकार करणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बनणे होय. इतक्या साध्या सोप्या पद्धतीने व्याख्या केलेली आहे. कोणतीही घटना घडण्यामागे काहीतरी कारण असतेच म्हणजे कार्यकारणभाव. हा कार्यकारणभाव आणि वै.दृष्टिकोन आदिम काळापासून कसा विकसित होत गेला व त्याला विरोध कोणाकडून होत आहे हे थोडक्यात मांडण्यात लेखक यशस्वी ठरलेले आहेत. लोकसंख्यावाढ, कर्मकांड, सामाजिक शोषण या व यासारख्या अनेक समस्यासोडविण्यासाठी वैज्ञानिक कसोट्यांचाच स्विकार करायला पाहिजे हे मत पटण्यासारखे आहे.
          
‘तंत्राचा प्रभाव’या लेखात प्राचीन स्त्रीप्रधान गणसमाजाचे आर्य आक्रमकांनी केलेले  विघटन, वर्णव्यवस्था, जाती, उच्चनिचतेची उतरंड ती टिकवून रहावीत यासाठी धर्मशास्त्रांची निर्मिती यामुळे स्त्री व काही
लोकसमूह यांना कायमचे बहिष्कृत करणारे तत्वज्ञान तयार करण्यात आले. याउलट स्त्री व गावकुसाबाहेरील समाज यांना मानाचे स्थान ही तंत्र मार्गाची भारताला मोठी देणगी ठरली. तंत्रामार्गाने  भारतीय अक्षररेखन, स्थापत्यशास्त्र, शिल्पकला इ. विविध जीवनोपयोगी कलाकौशल्यांच्या विकासात फार मोठा हातभार लावलेला आहे, ही माहिती मुळापासूनच वाचावी. उदा. हेमाडपंथी मंदिरे असा ज्यांचा उल्लेख केला जातो, त्यांच्या निर्मितीचे शास्त्र तंत्रमार्गाने तयार केले आहे. तंत्रमार्गाने  कला व साहित्य यातही मोलाची भर घातली आहे.
भारतीय इतिहासातील कामगिरी मुळापासूनच वाचावी. तंत्रामार्गाने आपले धार्मिक व सांस्कृतिक जीवन व्यापून टाकले आहे. समतेचा संदेश दिला आहे. तरीही तंत्र-मंत्र-यंत्र यात कोणतेही सामर्थ्य नसते, म्हणून आजच्या युगात ते  टाळावे लागतील. लेखकाचे हे मत व मांडणी वै.दृष्टिकोन विकासास पूरक आहे.

 ‘जादूटोणा’ या लेखात जागच्या जागी बसून कुणाचाही बरेवाईट करण्याची शक्ती म्हणजे जादूटोणा ते इतर व्याख्या सांगून समाजशास्त्रज्ञांचे मत दिले आहे. एखाद्याचे भले व्हावे म्हणून पांढरी तर वाईट व्हावे म्हणून
काळी जादू, मूठ मारणे, भानामती, अथर्ववेदातील मंत्र, कर्मकांड, यातुधान, मायावी, ऋत इ.चा आढावा घेवून या सर्व गोष्टी आपल्या धर्माच्या पर्यायाने संस्कृतीच्या अविभाज्य अंग असल्याचे  सुचविले आहे.चुकीच्या समजावर आधारित असल्याने जादूटोणा टाळला पाहिजे ही मांडणी योग्य आहे.

अंधश्रद्धांना विरोध करणार्यांनी हे समजून घेणे अत्यावश्यक आहे. पिढ्यानपिढ्या परंपरेने या गोष्टी भारतीय जनमानसाच्या अंगात मुरल्याने अंधश्रद्धांना विरोध म्हणजे श्रद्धांना विरोध  असा चुकीचा समज होतो तो दूर केला पाहिजे. यासाठी सदरचे पुस्तक ‘वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणा’ हे नक्कीच वाचनीय व चिंतनीय आहे.

पुस्तक: वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणा
लेखक: प्रा.अशोक राणा
प्रकाशक:किशोर कडू
जिजाई प्रकाशन, पुणे.
पाने: ३२
किंमत:१५/-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular Posts

कृपया हे पेज लाईक करावे