सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

बुधवार, ७ नोव्हेंबर, २०१२

भारतीय इतिहासाची जैन साधने: भाग 1: जैन शिलालेख

-महावीर सांगलीकर

भारताचा राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहास लिहिताना इतिहास लेखनाच्या जैन साधनांकडे नेहमीच कानाडोळा केला जातो. विशाल अशा जैन साहित्यात, जैन शिलालेखांमध्ये असणारे महत्वाचे संदर्भ फारसे लक्षात घेतले जात नाहीत. प्राचीन जैन संदर्भांपेक्षा  अगदी अलीकडे लिहिले गेलेली हिंदू पुराणे, पोथ्या यांना व त्यातील  भाकडकथांना महत्व दिले जाते. वैदिक  ब्राम्हणांनी असे करणे स्वाभाविक आहे, कारण त्यात त्यांचा स्वार्थ आहे. पण  ब्राम्हणांनी खोटा इतिहास लिहिला अशी ओरड करत उठ-सुठ ब्राम्हणांना नावे ठेवणारे बहुजनवादी लेखकही इतिहास लेखन (?) करताना इतिहासाच्या जैन साधनांकडे साफ दुर्लक्ष करतात, आणि मुख्य करून ब्राम्हणी साधनांवरच अवलंबून रहातात. 

पण ज्यांना भारताचा खरा इतिहास जाणून घ्यायचा आहे, त्यावर संशोधन करायचे आहे, त्यांनी सगळ्या प्रकारच्या साधनांचा वापर केलाच पाहिजे. छ. शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला मोगल, आदिल शाह, इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज,  डच,  इटालियन या सर्वांची त्या काळातील या विषयाच्या संदर्भातील कागदपत्रे, पत्र व्यवहार या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. इतिहास लिहिताना कोणतेही साधन टाळता कामा नये, कारण कोठे काय सापडेल हे सांगता येत नाही. अनेकदा जैन ग्रंथांमध्ये नसलेली जैन धर्माच्या इतिहासाविषयी माहिती बौद्ध ग्रंथांमध्ये सापडते, तर क्षत्रियांचा इतिहास हिंदू ग्रंथांपेक्षा जैन ग्रंथांमध्ये जास्त सापडतो. 

भारतीय इतिहासाच्या जैन साधनांचा अभ्यास केल्यास निरपेक्ष इतिहासकारांना, बहुजनवादी इतिहासकारांना आणि ब्राम्हणवादी इतिहासकारांनाही वेगळीच कांहीतरी माहिती मिळेल.

भारतीय इतिहासाच्या जैन साधनांमध्ये पुढील साधने महत्वाची आहेत:
जैन शिलालेख
जैन साहित्य
जैन ताम्रपत्रे
जैन मूर्तीलेख 

कागदपत्रे आणि पत्रव्यवहार  
जैन जातींचा इतिहास 

या लेखमालेच्या पहिल्या भागात  मी भारतीय इतिहासाच्या जैन साधनांपैकी जैन शिलालेख या महत्वाच्या साधनाची ओळख करून देत आहे.  

जैन शिलालेख 
जैन शिलालेख म्हणजे काय? या प्रश्नाचे सोपे उत्तर पुढील प्रमाणे देता येईल:
1. जैन गुफा, जैन मंदिरे व इतर जैन ठिकाणी असणारे शिलालेख
2. जैन धर्माशी संबंधीत असणारे इतर ठिकाणाचे शिलालेख

भारतीय पुरातत्व खात्याने केलेल्या नोंदीनुसार भारतात सुमारे एक लाख शिलालेख आहेत. त्यापैकी सुमारे 57000 शिलालेख हे तमिळ भाषेत तर 30000 शिलालेख हे कन्नड भाषेत आहेत. तमिळ व कन्नड भाषेतील बहुतांश शिलालेख हे जैन गुफा व जैन मंदिरे यांच्याशी संबंधीत आहेत.  साधारण तशीच परिस्थिती इतर भाषांमधील शिलालेखांच्या बाबतीतही आहे.


तमिळ व कन्नड या दोन भाषांशिवाय मागधी, अर्धमागधी, शौरसेनी, मरहट्टी या प्राचीन प्राकृत भाषांमध्ये जैन शिलालेख विपुल प्रमाणात आहेत. नंतरच्या काळात ते संस्कृत भाषेतही आहेत. त्याही नंतर ते मराठी, गुजराती, हिंदी, तेलुगू  अशा अनेक भाषांमध्ये आहेत.

हे शिलालेख भारताच्या सर्व भागात पसरलेले आहेत, काश्मीर पासून तमिळनाडू पर्यंत, आणि गुजरात पासून आसाम पर्यंत.  तसेच हे शिलालेख किमान 2400 वर्षे इतक्या मोठ्या काळात कोरले गेले आहेत.

या शिलालेखांमधून भाषा, लिपी, धर्म, राज्यकर्ते, वंशावळी, व्यक्ती, घटना, अर्थव्यवस्था, वजन-मापे, जाती, समाज, समाजव्यवस्था, रीती रिवाज, सण, कालमापण, गावांची नावे, धातू, धान्यांचे प्रकार अशी अनेक  प्रकारची माहिती मिळते.  या माहितीचा उपयोग इतिहास संशोधकांना नक्कीच होवू शकतो.

 इतिहास संशोधनासाठी जैन शिलालेख किती महत्वाचे आहेत हे पुढील माहितीवरून लक्षात येईल:

1. भारतातील सगळ्यात जुना शिलालेख हा जैन शिलालेख आहे. तो राजस्थान मधील अजमेर शहराजवळच्या बडली या गावात सापडला. इसवी सन पूर्व 5व्या शतकातील हा शिलालेख प्राकृत भाषेत आणि ब्राम्ही लिपीत आहे. या शिलालेखावरून प्राचीन  भारतातील लेखन कला, ब्राम्ही लिपीचे आणि प्राकृत भाषेचे प्राचीन अस्तित्व, राजस्थान मध्ये 2500 वर्षांपूर्वी जैन धर्माचे अस्तित्व असण्याचा पुरावा अशा अनेक गोष्टींची माहिती मिळते. 

2. महाराष्ट्रातील  पहिला शिलालेख हा एक जैन शिलालेख आहे. तो पुणे जिल्ह्यातील कामशेत जवळील एका जैन गुफेत आहे. प्राकृत भाषेत व ब्राम्ही लिपीत असणा -या या शिलालेखाचा काल इसवी सन पूर्व दुसरे शतक हा आहे. या शिलालेखावरून वरून सातवहान राजांच्या अगोदरही महाराष्ट्रात जैन धर्माचे अस्तित्व होते, किमान जैन साधू या भागात विहार करत हे दिसते.

3. मराठी भाषेतील सगळ्यात जुना शिलालेख हाही एक जैन शिलालेख आहे. तो कर्नाटकातील हसन जिल्ह्यात श्रवणबेळगोळ येथील इंद्रगिरी पहाडावर आहे. इसवी सन 983 मध्ये कोरण्यात आलेल्या या शिलालेखामुळे मराठी भाषेचे मध्ययुगपूर्व अस्तित्व, महाराष्ट्राबाहेर असणारे मराठी भाषेचे महत्व, नागरी लिपी अशा अनेक गोष्टींचा उलगडा होतो.  विशेष म्हणजे श्रवणबेळगोळ सुमारे सहाशे शिलालेख आहेत, त्यात मराठी भाषेत वरील शिलालेखाशिवाय इतरही कांही शिलालेख आहेत.

4. ओरिसातील हाथी गुंफा या जैन गुफेत असणारा सम्राट खारवेल याचा 85 ओळींचा शिलालेख भारतीय इतिहासाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. इसवी  सन पूर्व दुस-या शतकातील या शिलालेखामुळे  खारवेलच्या काळातील अनेक राजकीय घडामोडींवर प्रकाश पडतो. यात खारवेलने मगधेवर हल्ला करून पुष्य मित्र शुंग या राजाला शिकवलेला धडा, पुष्यमित्राचे खारवेलला शरण येणे, पश्चिम भारतावर हल्ला करू पाहणारा दमित्रस हा ग्रीक राजा खारवेलच्या प्रती-आक्रमणाच्या योजनेमुळे परत जाणे, खारवेलने आयोजित केलेले जैन साधू संमेलन, त्याने राज्यातील पाणी पुरवठा व्यवस्थेसाठी बांधलेले धरण, या देशाचा 'भारत' असा उल्लेख अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो.

5. ऐहोळे, जिल्हा विजापूर, कर्नाटक येथील जैन मंदिरातील शिलालेख चालुक्य सम्राट दुसरा पुलकेशी याचे सम्राट हर्षवर्धन याच्याशी झालेले युद्ध, त्यात हर्षवर्धनाचा झालेला पराभव, त्यानंतर दोघात तह होवून गोदावरी ही नदी दोघांच्या राज्यांची सीमा ठरणे अशा अनेक गोष्टींची माहिती देतो.

6.  अंजनेरी येथील जैन गुफेतील शिलालेखामुळे देवगिरी यादव राजांचा मूळ पुरुष दृढप्रहार याची माहिती मिळते.

 यावरून जैन शिलालेखांमध्ये इतिहास विषयक महत्वाची माहिती दडलेली आहे हे दिसून येते.

जैन शिलालेखांचे संकलन
महत्वाच्या जैन शिलालेखांचे संकलन भारतीय ज्ञानपीठाने 'जैन शिलालेख संग्रह' या नावाने चार भागात प्रकाशित केले आहे. या संकलनांचे संपादन डॉक्टर आ.न. उपाध्ये, डॉक्टर हिरालाल जैन, डॉक्टर विद्याधर जोहरापूरकर अशा आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विद्वानांनी केले आहे. हे संकलन केवळ संकलन नसून त्यात शिलालेखांचे हिंदी व इंग्रजी भाषांतर, संपादकांचे भाष्य, शिलालेखांची पार्श्वभूमी या गोष्टीही आल्या आहेत. याशिवाय डॉक्टर पी. बी. देसाई यांचे Jainism in South India and some Jaina Inscriptions हे पुस्तक मुख्यत्वे कर्नाटकातील जैन शिलालेखांची विस्तृत्व माहिती देते. हे पुस्तक कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव  आणि उत्तर कर्नाटकातील इतर अनेक राजघराण्यांच्या इतिहासाच्या अभ्यासकांना उपयोगी आहे.

वरील पुस्तकांशिवाय या विषयावर अनेक पुस्तके आहेत.  पण अजूनही  बहुतांश जैन शिलालेख हे अभ्यासावाचून पडून आहेत. त्यांचा अभ्यास झाल्यास त्यामध्ये खूप कांही मिळू शकते.

हेही वाचा:  
राजपुतांच्या कांही कुळ्यांचे दक्खनी मूळ
मातंग समाज आणि जैन धर्म
शिलाहार राजा भोज दुसरा आणि त्याने बांधलेले किल्ले
वीरगळ, जैनाचा धोंडा आणि असाही इतिहास

1 टिप्पणी:

Ramanahale@gmail.com म्हणाले...

सर तुमचे सर्व लेख उत्कृष्ट असतात
पण सध्या जैन समाजाला ज्याप्रमाणे dominate केल्या जाते त्याचा विचार करणे गरजेचे आहे.

Popular Posts

कृपया हे पेज लाईक करावे