सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

बुधवार, ४ सप्टेंबर, २०१३

नायक घराण्यातील राणी केळदी चेन्नम्मा

-महावीर सांगलीकर

कर्नाटकच्या इतिहासात अनेक महापराक्रमी राजे आणि राण्या होवून गेल्या. त्यांचे पराक्रम वाचले की आपण थक्क होतो.

कर्नाटकात चेन्नम्मा नावाच्या दोन राण्या होवून गेल्या. त्यापैकी पहिली केळदी चेन्नम्मा या नावाने तर दुसरी कित्तूर चेन्नम्मा या नावाने ओळखली जाते. केळदी चेन्नम्मा ही  किनारी कर्नाटकाच्या केळदी या राज्याची राणी होती, तर कित्तूर चेन्नम्मा ही उत्तर कर्नाटकातील कित्तूर या राज्याची राणी होती.

या लेखात  मी केळदी चेन्नम्माचा परिचय करून देत आहे.

केळदी हे राज्य आजच्या शिमोगा जिल्ह्यात होते. या राज्याची स्थापना  इ.स. 1499 साली झाली होती.  हे राज्यकर्ते घराणे नायक घराणे या नावाने ओळखले जाई. या घराण्यातील सोमशेखर नायक या राजाशी चेन्नम्माचे लग्न झाले.(इ.स. 1667). सोमशेखर नायक हा या घराण्यातील दहावा राजा होता. त्याचे राज्यकारभाराकडे नीट  लक्ष नव्हते. या लग्नानंतर दहा वर्षांनी इ.स. 1677 मध्ये विरोधी सरदारांनी सोमशेखर नायक याचा खून केला, पण त्यांना राज्य ताब्यात घेणे जमले नाही. राणी चेन्नम्मा सत्तेवर आली. सत्तेवर येताच तिने विरोधी सरदारांचा बंदोबस्त केला. कांही स्थानिक मांडलिक राजे वेगळे राज्य स्थापन करण्याच्या बेतात होते, त्यांचाही चेन्नम्माने बंदोबस्त केला.

या राणीला मूलबाळ नव्हते, त्यामुळे तिने आपल्या जवळच्या नात्यातील बसवप्पा नायक याला दत्तक घेतले.

औरंगजेबाबरोबर चेन्नम्माचे युद्ध 
केळदी चेन्नम्मा हिच्या आयुष्यातील एक महत्वाची घटना म्हणजे तिचे मोगल बादशाह औरंगजेब याच्याशी झालेले युद्ध.

त्या काळात बादशाह औरंगजेब मराठ्यांच्या विरोधात स्वत: उतरला होता. त्याने छत्रपती संभाजी महाराज यांचा अतिशय क्रूर पद्धतीने खून केला होता. छ. संभाजी महाराज यांच्यानंतर त्यांचे धाकटे बंधू राजाराम महाराज छत्रपती झाले.(इ.स. 1689). औरंगजेबाने आपला मोर्चा आता छ. राजाराम महाराजांकडे वळवला. महाराज रायगड येथे असताना औरंगजेबाच्या मोठ्या फौजेने रायगडाला वेढा घातला. धोका ओळखून महाराणी येसूबाई यांनी छ. राजाराम महाराज यांना प्रतापगडला पाठवले. तेथून त्यांनी तमिळनाडु तील जिंजी येथे जाण्याचे ठरवले. तिकडे जात असता वाटेत ते केळदी राज्यात थांबले.

राणी चेन्नम्माने छ. राजाराम महाराजांचे स्वागत केले. महाराजांनी तिला सगळ्या घडामोडी सांगून आणि जिंजीला जात असल्याचे सांगितले. दरम्यान बादशाह औरंगजेब छ. राजाराम महाराजांच्या मागावर होताच. महाराज केळदी राज्यात चेन्नमाचा अतिथी आहे हे कळताच त्याने छ. राजाराम महाराजांना ताब्यात देण्याचा निरोप राणीकडे पाठवला. चेन्नाम्माने असे करण्यास नकार दिला. तेंव्हा चिडलेल्या औरंगजेबाने केळदीवर आक्रमण केले. चेन्नम्मा आणि औरंगजेब यांच्या सैन्यात घनघोर युद्ध झाले.

या युद्धात चेन्नम्माने औरंगजेबाचा पराभव केला असे कन्नड साधने व लोक गीते म्हणतात, तर पोर्तुगीज साधने म्हणतात की औरंगजेबाने चेन्नामाचा पराभव केला. ते कांहीही असो, पण चेन्नाम्माच्या या हिम्मतीला दाद दिलीच पाहिजे. ती  औरंगजेबाला घाबरली नाही, आणि तिने छ. राजाराम महाराज यांच्याशी दगा फटका केला नाही. दरम्यान छ. राजाराम महाराज आपल्या आणि चेन्नम्माच्या निवडक सैनिकांसह सुरक्षितपणे जिंजीला पोहोचले. राणी चेन्नम्माचा एक मांडलिक राजा सदाशिव याने महाराजांना आर्थिक मदत केली.

त्यानंतर या धोरणी राणीने औरंगजेबाबरोबर फार काळ  लढणे आपल्याला जमणार नाही हे ओळखून त्याच्याशी तह केला.

केळदी चेन्नम्माचे धार्मिक धोरण 
केळदी चेन्नम्मा धार्मिक बाबतीत उदार धोरणाची होती. ती स्वत: वीर शैव लिंगायत होती, आणि तिचा इतर धर्मांविषयी दृष्टीकोनही उदार होता. तिच्या राज्यात वीरशैव लिंगायत यांच्याशिवाय जैन आणि वैष्णव प्रजा होती. तिने पोर्तुगीजांना आपल्या राज्यातानेक ठिकाणी चर्च बांधायला परवानगी दिली होती. 

तिचा दत्तक मुलगा बसवप्पा मोठा झाल्यावर या राणीने राज्यकारभार त्याच्याकडे सोपवला व आपले पुढील आयुष्य धार्मिक आणि सामाजिक कामात घालवले.

हेही वाचा:
पोर्तुगीजांना हरवणारी पराक्रमी अब्बक्का राणी
राजपुतांच्या कांही कुळ्यांचे दक्खनी मूळ
शिलाहार राजा भोज दुसरा आणि त्याने बांधलेले किल्ले 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular Posts

कृपया हे पेज लाईक करावे