सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

Sunday, September 8, 2013

मराठी नसलेले ग्रेट महाराष्ट्रीयन्स

 -महावीर सांगलीकर

मराठी आणि महाराष्ट्रीयन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ज्याची मायबोली मराठी तो मराठी अशी मराठीची सोपी व्याख्या आहे.  त्यामुळं जे मराठी भाषिक लोक महाराष्ट्राबाहेर पिढ्यान पिढ्या रहातात, ज्यांचा महाराष्ट्राशी कसलाच संबंध नाही ते देखील मराठी आहेत. दुसरीकडे, खुद्द महाराष्ट्रात किमान 30% टक्के लोक असे आहेत की ज्यांच्या अनेक पिढ्या महाराष्ट्रात गेल्या, मराठी त्यांची व्यवहार भाषा आहे, पण त्यांची मायबोली मराठी पेक्षा वेगळी आहे, आणि जे घरात त्यांची मायबोली आणि मराठी या दोन्ही भाषांचा वापर करतात.

पहिल्या प्रकारचे लोक मराठी असले तरी महाराष्ट्रीयन नाहीत. दुस-या प्रकारचे लोक द्विभाषिक असले आणि त्यांची एक भाषा मराठी असली तरी त्यांची आडनावं ही प्रस्थापित मराठी लोकांपेक्षा वेगळी असल्याने मराठीपणाचे ठेकेदार त्यांना परकं समजतात.  त्यामुळं ते लोकही स्वत:ला मराठी म्हणवून घेण्यापेक्षा गुजराती, मारवाडी,  तेलगु, कन्नड, पंजाबी  वगैरे म्हणवून घेतात. पण त्याचबरोबर ते स्वत:ला महाराष्ट्रीयन असेही म्हणवून घेतात.

असो. सांगायचा मुद्दा हा की महाराष्ट्रात रहाणारे ते सगळे महाराष्ट्रीयन आहेत आणि त्यांच्यात मराठी आणि अमराठी हे दोन मुख्य भेद आहेत.

मराठी नसलेल्या महाराष्ट्रीयन लोकांनी आधुनिक महाराष्ट्राच्या आणि भारताच्या उभारणीत मराठी महाराष्ट्रीयन लोकांपेक्षा नक्कीच मोठं  काम केलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राची औद्योगिक उभारणी ही अमराठी महाराष्ट्रीय लोकांनी केली आहे.  मराठी महाराष्ट्रीय लोक तिथं  कामगार किंवा फारतर मॅनेजर झाले. महाराष्ट्रातील छापील आणि इलेक्ट्रॉनिक मेडीयामध्ये संपादकीय विभागात, टी.व्ही. स्क्रीनवर मराठी महाराष्ट्रीयन्स दिसत असले तरी ही माध्यमं मुख्य करून अमराठी महाराष्ट्रीयन लोकांनी स्थापन केली आहेत.

पण अमराठी महाराष्ट्रीयनांचं कर्तृत्व एवढ्यापुरतंच मर्यादित नाही. राजकारणाचं सोडून द्या, पण बाकी  प्रत्येक क्षेत्रात वरच्या लेव्हलला अमराठी महाराष्ट्रीयनांचा दबदबा दिसतो, मग ते पोलीस दल असो, विज्ञान-तंत्रज्ञान असो, बॉलीवूड असो की उच्च शिक्षण क्षेत्र असो. मराठी महाराष्ट्रीयनांचा दबदबा राजकारण, मराठी साहित्य, कला, सिनेमा, नाटकं अशा गोष्टीपुरताच मर्यादित आहे. ते मुंबई महाराष्ट्रात असूनही आणि बॉलीवूड मुंबईत असूनही तिथं उत्तुंग झेप घेवू शकत नाहीत. याउलट बॉलीवूडमध्ये अनेक अमराठी महाराष्ट्रीयन्स आपला जम बसवून आहेत.

अमराठी महाराष्ट्रीयनांच्या ग्रेटनेसचं एक चकित करणारं उदाहारण देवून सध्या हा विषय इथेच संपवतो. हा विषय  लढाई आणि पराक्रम यांच्याशी संबंधीत आहे. हाच विषय निवडण्याचे कारण म्हणजे तो मराठीवाद्यांच्या आवडीचा विषय आहे.

स्वातंत्र्यानंतर भारताची इतर देशांशी युद्धे जी झाली, त्यातील सर्वोच्च पराक्रमाबद्दल आत्तापर्यंत 21 सैनिकांना/अधिकाऱ्यांना परमवीर चक्र हे पदक देण्यात आले. त्यापैकी 4 पदकं ही महाराष्ट्रीयनांच्या वाट्याला आली. विशेष म्हणजे हे चारही जण सामान्य सैनिक नव्हते तर ज्युनिअर अधिकारी होते. या चारपैकी एक होते सेकंड  लेफ्टनंट राम राघोबा राणे. उरलेले तीन होते कोण होते बरे? त्यांची नावेही मराठीवाद्यांना माहीत नसतील, आणि  माहीत असली तरी ते महाराष्ट्रीय होते याचा त्यांना गंध असणे शक्य नाही. असो. तर ते होते लेफ्टनंट कर्नल अर्देशीर तारापोर, सेकंड  लेफ्टनंट अरुण खेत्रपाल आणि मेजर रामस्वामी परमेश्वरन.

यातील अर्देशीर तारापोर यांचा जन्म मुंबईत झाला होता. त्यांचे पूर्वज रतनजी हे छ. शिवाजी महाराजांचे सरदार होते आणि त्यांनी केलेल्या पराक्रमाबद्दल महाराजांनी त्यांना 300 गावे इनाम दिली होती. अर्देशीर तारापोर यांनी 1965 साली झालेल्या भारत पाक युद्धाच्या वेळी चाविंडा येथे झालेल्या रणगाड्यांच्या युद्धात भारतीय रणगाडा दलाचे नेतृत्व केले होते. ही  जगातील रणगाड्यांच्या लढाईतील एक भीषण लढाई मानली जाते. शत्रूच्या रणगाड्यांना आणि तोफखान्याला न जुमानता अर्देशीर तारापोर यांनी जखमी होवूनही शत्रूची ठाणी काबीज केली. या लढाईत अर्देशीर तारापोर यांच्यामुळं भारतीय सैनिकांना पाकिस्तानचे 60 रणगाडे नष्ट करता आले. पण तारापोर यांच्या रणगाड्यावर शत्रूचा गोळा येऊन पडल्याने त्याने  पेट घेतला आणि आणि तारापोर त्यात  ठार झाले.

सेकंड  लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांचा जन्म पुणे येथे 1950मध्ये झाला होता. 1965 च्या युद्धात जसा पराक्रम अर्देशीर तारापोर यांनी केला तसाच पराक्रम 1971च्या युद्धात अरुण खेत्रपाल यांनी केला.  खेत्रपाल यांच्या रणगाडा दलानं  पाकिस्तानात घुसून पाकिस्तानचे अनेक रणगाडे नष्ट केले. त्या कारवाईत मध्येच खेत्रपाल यांचा कमांडर कामी आला तेंव्हा खेत्रपाल यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शत्रूवर भीषण हल्ला चढवला आणि शत्रूचं ठाणं ताब्यात घेतले. पण तारापोर यांच्या रणगाड्या प्रमाणेच खेत्रपाल यांच्या रणगाड्यानंही  अचानक पेट घेतला. त्यात खेत्रपाल ठार झाले. पण मरता-मरताही त्यांनी शत्रूचा उरलेला एकमेव रणगाडाही उडवलाच.

मेजर रामस्वामी परमेश्वरन यांचा जन्म मुंबई येथे 1946 साली झाला. Short Service Commission या योजनेखाली ते भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये 1972 साली ज्युनिअर ऑफिसर म्हणून रुजू झाले.  पुढं त्यांना त्यांच्या तुकडीसह शांतीसेनेतून श्रीलंकेत पाठवण्यात आलं. तिथं  एके ठिकाणी बंडखोरांनी त्यांच्या तुकडीला घेरलं. मेजर परमेश्वरन यांनी शांत डोक्यानं बंडखोरांना चकित करत त्यांच्यावर हल्ला केला. एका बंडखोरानं त्यांच्या छातीवर गोळ्या झाडल्या, पण परमेश्वरन यांनी त्याच्या हातातील बंदूक हिसकावून घेत त्याच बंदुकीनं  बंडखोरास ठार केले. नंतर जखमी अवस्थेतही आपल्या सैनिकांना आदेश देत बंडखोरांचा पराभव केला. पण त्यानंतर मेजर परमेश्वरन वारले.

मराठीवादी लोक मेजर राम राघोबा राणे यांचं नाव देखील फारसे घेत नाहीत  मग त्यांनी तारापोर, खेत्रपाल, परमेश्वरन यांची नावं अजिबात घेत नाहीत हे  त्यांच्या स्वभावाला धरूनच आहे.

 हेही वाचा:
सैनिक आणि देशप्रेम: सैनिक का लढतात?
दुस-या महायुद्धात भारत
मराठी माणूस म्हणजे नेमका कोण रे भाऊ?

No comments:

माझे नवीन लेख मिळवण्यासाठी आपली इमेल नोंद करा..

शोध आणि बोध LATEST

कृपया हे पेज लाईक करावे