-दत्ता राशिनकर
मो. 901 131 6199
'सत ना गत' ही प्रसिद्ध लेखक राजन खान यांची 1999मध्ये प्रसिद्ध झालेली एक गाजलेली कादंबरी. आज या कादंबरीची आठवण यायचे कारण म्हणजे सध्या संपूर्ण देशात धुमाकूळ घालणा-या बलात्काराच्या घटना. असा एकही दिवस उजाडत नाही की ज्या दिवशी देशाच्या कुठल्या ना कुठल्या भागात बलात्काराची घटना घडली नाही. बलात्कार तर इतके भयानक की आपण माणूस आहोत याची प्रत्येकाला शरम वाटावी. वर्ष-सहा महिन्याच्या अर्भकापासून तर सात वर्षाच्या संध्याछायेत वावरणा-या महिलेपर्यंत सर्वांवर सर्रासपणे बलात्कार होत आहेत. या बलात्कारातील आरोपी जसे अल्पवयीन मुले आहेत तसेच विशीच्या पुढचे तरुण, म्हातारपणाकडे झुकलेले प्रौढ देखील आहेत. सर्वात शरमेची बाब म्हणजे ज्याच्या पायावर देशातील लक्षावधी 'भक्तगण' अक्षरश: लोळण घेतात असे 'बाबा' आणि 'बापू' पण आहेत.
या कादंबरीतील मध्यवर्ती पात्र असलेली नामी ही दामू घिसाडी नामक एका निरुद्योगी माणसाची बायको. मोहक चेह-याची, अंगापिंडानं भरलेली, पाहता क्षणी कुणाच्याही मनात लालसा उत्पन्न करणारी, पदरी दोन लहान मुलं. नवरा बठ्ठ्या, त्यामुळं घरात पैशाचा खडखडाट. अशावेळी जे घडायचं तेच घडतं. नामी शरीराची भूक शंकर नामक 'गरजू' कडून तर पैशाची भूक तिजोरीशेठ एका रंगेल म्हाता-या कडून भागवते.
आसोलेची कामसू नजर नामीवर न पडती तरच नवल. बेकायदेशीर वेश्या व्यवसाय करण्याच्या गुन्ह्याखाली तो भर रात्री तिला अटक करून पोलीस स्टेशन मध्ये नेतो आणि एका कोठडीत तिला डांबून तिच्यावर बलात्कार करतो. त्याच्याच खात्यातले त्याचे हित शत्रू ही बातमी पद्धत शीर पणे 'समाचार' नावाच्या एका लंगोटीपत्राचा संपादक असलेल्या शिंदेला सविस्तरपणे देतात. येथून पुढे मग वर्तमानपत्री धुरळा उडत रहातो, आसोलेला अनुकूल आणि प्रतिकूल असणा-या राजकारणी व पत्रकारांचे गावात दोन तट पडतात. कादंबरी निरनिराळी वळणे घेत रहाते.
मधल्या काळात जे कांही रामायण घडते त्याची मजा प्रत्यक्ष कादंबरी वाचल्याशिवाय कळणार नाही. राजन खान यांची प्रवाही आणि वेधक भाषा शैली, नागरी भाषेबरोबरच ग्रामीण भाषेवर असलेली त्यांची जबरदस्त पकड, ठायी ठायी केलेली विनोदाची पखरण यामुळे ही कादंबरी हातात घेतल्यावर संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेववत नाही.
सत ना गत
राजन खान
मॅजेस्टिक प्रकाशन
किंमत: 300 रुपये
हेही वाचा:
पुस्तक परीक्षण: दहशतवादाची रूपे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा