सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

गुरुवार, ६ डिसेंबर, २०१२

चाणक्य कोण होता?

-महावीर सांगलीकर 

चाणक्य ही व्यक्ती खरेच होऊन गेली का? चाणक्य आणि कौटिल्य हे एकच होते की वेगवेगळ्या व्यक्ती होत्या? चाणक्याने चंद्रगुप्ताला राज्य स्थापन करण्यासाठी मदत केली हे कितपत खरे आहे? या सगळ्या प्रश्नांवर इतिहास संशोधकांमध्ये प्रचंड मतभेद आहेत.   

आज आपणास जो चाणक्य विविध प्रसारमाध्यमांतून सांगितला जातो तो मुद्राराक्षस या संस्कृत नाटकातील प्रमुख पात्र आहे. विशाखादत्त या  नाटककाराने हे  नाटक इसवी सनाच्या आठव्या  शतकात लिहिले. म्हणजे सम्राट चंद्रगुप्ताच्या नंतर सुमारे बाराशे वर्षांनंतर. त्यामुळे या नाटकातील घटना कितपत ख-या मानायच्या हा एक प्रश्नच आहे. आपण पाहतोच की केवळ साडेतीनशे वर्षांपूर्वीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कांही इतिहासकारांनी किती विकृत करून टाकला आहे. मग सुमारे तेवीसशे वर्षे जुन्या काळातील घटनांचे किती विकृतीकरण झाले असेल?

चाणक्य आणि कौटिल्य यांना एकच मानले जाते आणि कौटिल्याच्या अनेक गोष्टी चाणक्यनीती म्हणून ओळखल्या जातात. पण कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथाची भाषा आणि त्यातील वर्णने चंद्रगुप्त मौर्याच्या काळाशी जुळत नाहीत, तर नंतर झालेल्यागुप्त घराण्याच्या काळाशी जुळतात. याचाच अर्थ कौटिल्य ही व्यक्ति गुप्त घराण्याच्या काळात होवून गेली असा होतो. त्यामुळे चाणक्य आणि कौटिल्य या दोन वेग-वेगळ्या व्यक्ती आहेत, असे बहुतांश निरपेक्ष इतिहास संशोधक मानतात.

चाणक्य वैदिक नव्हता हे निश्चितपणे सांगता येते. कारण वैदिक परंपरेतील ग्रंथात चाणक्याच्या केवळ राजकीय जीवनाची माहिती आहे, तेथे चाणक्याचे आई-वडील, त्याचा जन्म, लहानपण, शिक्षण, लग्न आणि शेवटी मरण या बाबींची कांहीच माहिती नाही.

वैदिक परंपरेत चंद्रगुप्ताला शूद्र, इतकेच नव्हे तर दासीपुत्र म्हंटले आहे. चाणक्य जर वैदिक ब्राम्हण असता तर त्याने शुद्र चंद्रगुप्ताला राज्य स्थापन करण्यासाठी मुळीच मदत केली नसती. उलट विरोध केला असता. पण असे घडले नाही, याचा अर्थच चाणक्य वैदिक नव्हता हा आहे.

वैदिक चाणक्याचा मूळ आधार तिलोयपन्नती हा जैन ग्रंथ व महानामथेरो हा बौद्ध ग्रंथ आहे. तेथे मुख्य नायक चंद्रगुप्त हा आहे. चाणक्याला तेथे फारसे  महत्व नाही. पण पुढे वैदिकांनी चंद्रगुप्तापेक्षा चाणक्याला अवास्तव महत्व दिले.

अवैदिक मग ब्राम्हण 
प्राचीन भारतात बिहारमध्ये 'मग' नावाचे ब्राम्हण होते. चाणक्य हाही मग ब्राम्हण होता. हे मग ब्राम्हण अवैदिक ब्राम्हण होते. त्यांना व्रात्य ब्राम्हण असेही म्हणत. या मग ब्राम्हणांचा त्या भागात इतका प्रभाव होता की त्या भागाला मगध या नावाने ओळखले जावू लागले. (बिहार हे नाव अलीकडचे आहे.) व्रात्य उर्फ मग ब्राम्हण हे मुख्य करून जैन धर्मीय होते. चंद्रगुप्ताचे धर्मगुरू आचार्य भद्रबाहू, पुढील काळात झालेले चरक, आर्यभट्ट, वराहमिहिर, बाणभट्ट, वाग्भट्ट हेही मग ब्राम्हण होते.

चाणक्याचे पुढील काळात वैदिकीकरण झाले असे दिसते, तेही चाणक्याच्या काळानंतर शेकडो वर्षांनी. चंद्रगुप्ताच्या गुरुपदी कोणीतरी वैदिक ब्राम्हण दाखवण्याच्या वर्चस्ववादी हव्यासातून त्या अवैदिक ब्राम्हणाला वैदिक करून टाकण्यात आले. केवळ चाणक्यच नव्हे तर जैन, बौद्ध, शैव आदी परंपरांतील अनेक व्यक्तीना पुढे वैदिकांनी 'वैदिक ब्राम्हण' करून टाकले आहे. वैदिकमहात्म्य वाढवण्याचा हा एक प्रकार.

'मग' ब्राम्हणांचे वंशज असणारे भोजक आणि श्रीमाळी ब्राम्हण यांच्यात आजही जैन परंपरा दिसते. हे विशेषत: गुजरात व राजस्थान मध्ये जैन मंदिराचे पुजारी असतात. या समाजातून अनेक जैन साधू व महान आचार्य झाले आहेत.

शिशुनाग-नंद-मौर्य घराण्यातील जैन परंपरा 
भारताचा लिखित इतिहास शिशुनाग वंशापासून सुरू होतो.हे शिशुनाग घराणे मगधेवर राजगृही येथून राज्य करत असे. हे घराणे मूळचे वाराणसी येथील होते. जैन धर्माचे २३वे तीर्थंकर पार्श्वनाथ ज्या  उरग (नाग) घराण्यात जन्मले होते  त्याच घराण्याची शाखा असणारे हे शिशुनाग घराणे नेहमीच जैन धर्मीय राहिले आहे. शिशुनाग घराण्यातील श्रेणिक बिम्बिसार हा सम्राट भगवान महावीरांचा पट्टशिष्य होता. श्रेणिक बिंबिसाराची राणी चेलना ही भगवान महावीर यांची सख्खी मावशी होती.

चाणक्याचा संबंध मौर्य  घराण्याशी आहे. हे मौर्य घराणे चंद्रगुप्त मौर्य याने स्थापन केले. चंद्रगुप्त मौर्याची सविस्तर माहिती सर्वात आधी जैन ग्रंथांमध्येच येते.  या घराण्यात जैन परंपरा होती याची अनेक उदाहरणे देता येतील. शिशुनागांच्या नंतर मगधेवर नंद घराण्याचे राज्य आले. मौर्य घराण्यापूर्वी मगधेत सत्तेवर असणा-या नंद घराण्यात देखील जैन परंपरा होती. नंद घराण्याचा महामात्य  हा परंपरेने एका जैन-ब्राम्हण  घराण्यातील असे. नंद घराण्याचा शेवटचा सम्राट धनानंद याचा महामात्य शकटाल हा त्याच जैन-ब्राम्हण घराण्यातील  होता. तसेच धनानंदाचा एक हुशार अमात्य राक्षस हाही एक जैन ब्राम्हण होता. चंद्रगुप्ताने  धनानंदाचा पराभव केल्यावर धनानंदाचा अमात्य राक्षस याचीच नेमणूक चंद्रगुप्ताच्या अमात्यपदी करण्यात आली. अमात्य राक्षस हे पद घ्यायला राजी नव्हता, पण चाणक्याच्या प्रयत्नामुळे शेवटी त्याने हे पद स्वीकारले.

ग्रीकांचा राजदूत मेगास्थेनिस याने लिहिलेल्या इंडिका या ग्रंथात चंद्रगुप्ताच्या दरबारात जैन साधूंचा वावर होता असे लिहिले आहे.

जैन परंपरेतील प्राचीन  ग्रंथात चाणक्याचे आई-वडील, त्याचा जन्म, लहानपण, शिक्षण, लग्न आणि शेवटी मरण या सगळ्या गोष्टींची सविस्तर चर्चा केली गेली आहे. (अधिक माहितीसाठी जयकृष्णन नायर यांचा The Birth And Death of Chanakya! हा लेख वाचावा ) .


हेही वाचा:  
भारतीयांचा इतिहासबोध
भारतीय इतिहासाची जैन साधने: भाग 1: जैन शिलालेख
राजपुतांच्या कांही कुळ्यांचे दक्खनी मूळ
शिलाहार राजा भोज दुसरा आणि त्याने बांधलेले किल्ले

३ टिप्पण्या:

सागर भंडारे म्हणाले...

महावीरजी... चंद्रगुप्त मौर्याच्या काळात ग्रीक वकील मॅगेस्थेनिस हा २ वर्षे त्याच्या दरबारी राजधानी पाटलिपुत्र येथे होता. त्याच्या इंडिका या ग्रंथात त्याने चंद्रगुप्त मौर्याच्या अनेक सेनाधिकार्‍यांचा, शासन यंत्रणा चालवणार्‍या मंत्रिमंडळातील लोकांचा सविस्तर उल्लेख केला आहे. सुमारे सव्वादोन हजार वर्षांपूर्वी तत्कालीन साक्षीदार असलेल्या खुद्द मॅगेस्थेनिसच्या संपूर्ण ग्रंथात चाणक्य, कौटिल्य, कौटिलिय अर्थशास्त्र ही नावे कुठेही येत नाहीत व चाणक्याबद्दलचे कोणतेही उल्लेख आढळून येत नाहीत. एवढेच काय तर ज्या चाणक्याच्या अर्थसास्त्रावर मौर्य साम्राज्याचा डोलारा आधारीत होता असे चित्र आपल्यापुढे उभे करणार्‍या संशोधकांना वा इतिहासकारांना 'चाणक्याचे उल्लेख सम्राट अशोकाच्या शिलालेखात का नाहीत? एवढा साधा प्रश्नही पडत नाही ... आता यावर काय बोलावे?

Kapil Patil म्हणाले...

महावीरजी, आपला ब्लॉग आवडला. आर्य चाणक्य यांच्या जैन कुळाचा आपला शोध पटणारा आहे. स्वतः चंद्रगुप्त मोर्य यांनी जैन धर्म स्वीकारला होता. गादी मुलाकडे सोपवून ते जैन साधू झाले होते. श्रवण बेलगुल येथेच त्यांनी आपली जीवनयात्रा प्रायोपेशन करून संपवली. त्यावर थोडं अधिक संशोधन आवश्यक आहे. - कपिल पाटील
http://kapilpatilmumbai.blogspot.in/

गौरव जैन म्हणाले...

आपके लेख अगर हिंदी में भी प्रकाशित हो तो हिंदी भाषियो के दिए सुलभ रहेगा
सादर शुद्धात्म वन्दन
जय जिनेन्द्र

Popular Posts

कृपया हे पेज लाईक करावे