सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

Thursday, August 29, 2013

कृष्ण कोण होता?

-महावीर सांगलीकर 

कृष्ण हे महाभारतातील सर्वात महत्वाचे पात्र आहे. महाभारताला  एक पवित्र धार्मिक ग्रंथ मानले जाते, पण प्रत्यक्षात ते अनेक दंतकथांचा एक संग्रह आहे. त्यामुळे महाभारताला एखाद्या धर्माचा ग्रंथ मानने चुकीचे आहे. शिवाय महाभारताची रचना शेकडो वर्षांच्या प्रदीर्घ काळात झाली आहे, त्याचाही एक इतिहास आहे. हा ग्रंथ महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या नंतर रचला गेला हे महाभारतातील अनेक उल्लेखांवरून सिद्ध करता येते.

महाभारत हा मुळात धार्मिक ग्रंथ नसला तरी पुढे वैदिकांनी त्यात आपला धर्म घुसवून त्याला एक धार्मिक ग्रंथ बनवण्याचा प्रयत्न केला.

महाभारताच्या सुरवातीच्या आवृत्तीत कृष्ण हे एक गौण पात्र होते, तर त्याचा भाऊ बलराम याला महत्व होते.

पुढे समाजात वैदिक धर्म मागे पडून जैन आणि बौद्ध या धर्मांना महत्व आले. महावीर आणि गौतम बुद्ध हे दोघेही अवैदिक होते. त्यांच्या धर्मांना शह देण्यासाठी वैदिकांना एका अवैदिक हिरोची गरज होती. असा हिरो त्यांनी कृष्णाच्या रुपात उभा केला. वैदिकांनी कृष्णाला पुढील काळात देव बनवला, त्याला विष्णूचा अवतारही बनवून टाकले. गुप्त राजांच्या काळात, जो वैदिकांचा उत्कर्ष काळ होता, चौथ्या शतकात गीता लिहिली गेली, त्या गीतेत वैदिकांना हवे असलेले तत्वज्ञान कृष्णाच्या तोंडून सांगण्यात आले. हा काळ  महावीर-बुद्ध यांच्या 1000 वर्षे नंतरचा आहे. बुद्ध-महावीर यांचे तत्वज्ञान हे अहिंसेचे होते, वैदिकांनी गीतेत हिंसेला प्रोत्साहन देणारे तत्वज्ञान मांडले.

याच काळात पुराणे लिहिण्याची सुरवात झाली. पुराणे ही तर विकृत लिखाणाचा कहर. त्यात अनेक अश्लिल  आणि भाकडकथा लिहून शिव वगैरे अवैदिक व्यक्तींना बदनाम करण्यात आले. राधेसारखे पात्र घुसडून कृष्णालाही बदनाम करण्यात आले.

कृष्ण अवैदिक होता
कृष्ण हा वैदिक नव्हता. कृष्णाचा जन्म यदुकुळात झाला होता. यदुंना वैदिक लोक आपले शत्रू मानत असत, कारण ते वैदिकांचे नियम पाळत नसत. कृष्णाने वैदिकांच्या इंद्र, वरुण या देवतांचा पराभव केला होता. कृष्ण हा काळा होता, ही गोष्टही तो वैदिक नव्हता हेच सांगते.

मग यदुंचा धर्म कोणता?  याबद्दल प्रख्यात इतिहासकार प्र. रा देशमुख आपल्या Indus Civilization, Rigved and Hindu Culture या ग्रंथात म्हणतात, "According to Vedic literature, Yadus were one of the Panch Jan (five groups of people), and were not eligible to become a King. Most of the Yadus were follower of Jainism. Vasudev, the father of Krishna was mostly a Jain. ..... It is not just a co-incidence that Where ever there were strong holds of Yadus, there we find some of the oldest remains of Jains."*

(वैदिक साहित्यानुसार यदु हे पंचजनांपैकी एक होते, आणि राजा होण्यास पात्र नव्हते. यदुंपैकी बहुतेक हे जैन धर्माचे अनुयायी होते. कृष्णाचे वडील वसुदेव हे जैन असण्याचीच जास्त शक्यता आहे. ...........यदुंच्या बालेकिल्ल्यांमध्ये जैनांचे सगळ्यात जुने अवशेष सापडतात हा कांही केवळ योगायोग नव्हे. )

* मथुरा, शौरीपूर, हस्तिनापुर हे जैनांची प्राचीन ठिकाणे आहेत.यदुंच्या इतिहासातही हीच ठिकाणे महत्वाची आहेत.

प्र. रा.  देशमुख पुढे लिहितात, "वैदिक लोक कृष्णाला नंतरच्या काळात भजू लागले, पण ते केवळ जैन धर्माच्या प्रभावामुळेच. कृष्ण भक्तीत मांसाहार आणि दारू यांना स्थान नसते, आणि शाकाहार ही कांही वैदिक संस्कृती नव्हे ".

कृष्ण आणि जैन धर्म
कृष्ण हा वैदिक नव्हता, त्यामुळे त्याचा धर्म श्रमण धर्मांपैकी एक कोणता तरी असणार, हे नक्की. प्राचीन भारतात जैन आणि बौद्ध हे श्रमणांचे मुख्य धर्म होते. त्यापैकी बौद्ध धर्म गौतम बुद्धाने इ.स. पूर्व सहाव्या शतकात स्थापन केला. पण कृष्णाचा अंदाजित काळ हा इ.स. पूर्व एक हजार वर्षे मानला जातो. त्यामुळे कृष्ण बौद्ध असण्याची शक्यता उरत नाही. शिवाय बौद्ध साहित्यात कृष्णाला मान्यता नाही. या उलट महावीरांच्या आधीही जैन धर्म अस्तित्वात होता, तो वैदिक धर्माच्याही आधीचा धर्म आहे  आणि त्याची मुळे  सिंधू संस्कृतीत आहेत,  हे अनेक भारतीय व युरोपिअन इतिहासकारांनी दाखवून दिले आहे, आणि जैन साहित्यात अगदी प्राचीन काळापासून कृष्ण ही एक महत्वाची व्यक्ती आहे.

जैन साहित्यात कृष्णाला मानाचे स्थान आहे. तो तीर्थंकर अरिठ्ठनेमी (नेमीनाथ) यांचा चुलतभाऊ आहे. जैन साहित्यात कृष्ण हा अर्धचक्रवर्ती आहे, तसेच तो जैन धर्मातील प्राचीन अशा त्रेसष्ठ महापुरुषांपैकी एक आहे. विशेष म्हणजे या त्रेसष्ठ महापुरुषांमध्ये यदुंच्या एकाच घरातले चार लोक आहेत, ते म्हणजे कृष्णाचे वडील वसुदेव, भाऊ बलराम, चुलत भाऊ अरिठ्ठनेमी (नेमीनाथ) आणि स्वत: कृष्ण.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कृष्णाचे वडील वसुदेव यांनाही जैन साहित्यात महत्वाचे स्थान आहे. इतके की  'वासुदेव हिन्डी' हा प्राचीन जैन ग्रंथ पूर्णपणे वसूदेव यांच्यावर लिहिला गेला आहे.

महाभारतात घोर अंगिरस यांच्याकडून कृष्णाला आध्यात्मिक ज्ञान मिळाले असा उल्लेख आहे. हे घोर अंगिरस म्हणजे अरिठ्ठनेमी असावेत असे वाटते. जैन साहित्यात कृष्णाचा सर्वात जुना उल्लेख आणि विस्तृत्व चरित्र अंतगडदसाओ या आगम ग्रंथात, शिवाय त्रिषष्ठी शलाका पुरुष या ग्रंथातही येते. कृष्णाचे चरित्र सांगणारे इतरही अनेक ग्रंथ आहेत.

संदर्भ:
Indus Civilization, Rigved and Hindu Culture by P.R. Deshmukh
त्रि षष्ठी शलाका पुरुष : आचार्य शिलांक
हिंदू धर्माचे शैव रहस्य: संजय सोनवणी 

हेही वाचा:
ज्यांचा-त्यांचा राम आणि रामायण
चाणक्य कोण होता?
वारकरी संप्रदायाचे मूळ कोठे आहे?
चाणक्य कोण होता?

3 comments:

AASHAY said...

सांगलीकर सर, मी तुमचे लेख वाचतो. तुमच्या राजकीय आणि सामाजिक लिखाणामुळे प्रभावित देखील होतो. परंतु वरती महाभारताचा काळ हा बुद्ध आणि महावीर ह्यांच्या नंतरचा आहे ह्या विधानावर मात्र मी हरकत घेऊ इच्छितो! ह्याचे कारण माझे अप्रत्यक्ष रित्या महाभारत ग्रंथावर होणारे काम. महाभारतात एका खगोलीय घटनेचा उल्लेख आहे. ती घटना अशी सांगते:
युद्धाच्या एक दिवस आधी व्यास धृतराष्ट्राला सांगतो की सप्तर्षी ह्या समूहातील 'अरुंधती' ही वशिष्टाच्या पुढे चालू लागली आहे. ( अरुंधती आणि वशिष्ट हे सप्तर्षी ह्या समूहातील जोड तारे आहेत). आज आकाशाकडे पाहिले तर वशिष्ट हा अरुंधतीच्या पुढे चालतो ( पूर्व-पश्चिम ह्या दिशेनुसार) इतके दिवस ह्या निरीक्षणाबद्दल अमान्यता होती. तशी ती असलीच पाहिजे कारण असे तारे एकमेकांच्या पुढे जात नाहीत.
परंतु अमेरिकेत श्री. निलेश ओंक म्हणून एक गृहस्थ राहतात ज्यांनी NASA चे आधुनिक software वापरून ह्या निरीक्षणाची चाचणी केली आणि त्यांना असे आढळले आहे की ही घटना घडली होती. इ.स.पू १३००० ते इ.स.पू ४३८० ह्या वर्षांच्या दरम्यान. पुढे अधिक चाचण्या करून त्यांनी महाभारत युद्धाचा काळ इ.स .पू ५५६१ हा शोधला आहे. महाभारतात कृष्णाच्या मृत्यूचे वर्णन आहे त्यात देखील ग्रहणांचे खगोलीय निरीक्षण आहे. त्यानुसार कृष्णाचा मृत्यू इ.स.पू ५५२५ एवढा येतो. ( इथे देखील NASA ची गणिते वापरली गेली आहेत). मी ओंक ह्यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद करतोय.
मी हे जे काही लिहिलंय ते संपूर्ण विज्ञाननिष्ठ आहे ह्याची मला खात्री आहे. आणि म्हणूनच लिहिलंय. कारण भोंदूपणा आणि भाकडकथा ह्यावर माझा देखील विश्वास नाही. :)

DnyaneshParab said...

सर, संपूर्ण सहमत - "गुप्त राजांच्या काळात, जो वैदिकांचा उत्कर्ष काळ होता, चौथ्या शतकात गीता लिहिली गेली, त्या गीतेत वैदिकांना हवे असलेले तत्वज्ञान कृष्णाच्या तोंडून सांगण्यात आले. हा काळ महावीर-बुद्ध यांच्या 1000 वर्षे नंतरचा आहे. बुद्ध-महावीर यांचे तत्वज्ञान हे अहिंसेचे होते, वैदिकांनी गीतेत हिंसेला प्रोत्साहन देणारे तत्वज्ञान मांडले."

"जैन साहित्यात कृष्णाला मानाचे स्थान आहे. तो तीर्थंकर अरिठ्ठनेमी (नेमीनाथ) यांचा चुलतभाऊ आहे. जैन साहित्यात कृष्ण हा अर्धचक्रवर्ती आहे, तसेच तो जैन धर्मातील प्राचीन अशा त्रेसष्ठ महापुरुषांपैकी एक आहे. विशेष म्हणजे या त्रेसष्ठ महापुरुषांमध्ये यदुंच्या एकाच घरातले चार लोक आहेत, ते म्हणजे कृष्णाचे वडील वसुदेव, भाऊ बलराम, चुलत भाऊ अरिठ्ठनेमी (नेमीनाथ) आणि स्वत: कृष्ण."

"दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कृष्णाचे वडील वसुदेव यांनाही जैन साहित्यात महत्वाचे स्थान आहे. इतके की 'वासुदेव हिन्डी' हा प्राचीन जैन ग्रंथ पूर्णपणे वसूदेव यांच्यावर लिहिला गेला आहे."

सध्या श्रीकृष्णाच्या अस्तित्वाविषयी अजूनही काही माहिती जैन धर्म ग्रंथ/साहित्यात उपलब्ध आहे. योगायोगाने ती माहिती मी वाचली आहे. पण त्याविषयी येथे चर्चा नको. उगाचच काही लोकांच्या भावना दुखाविल्या जातील.

amol shinde said...

jain dharm ha ahinsecha pujari aahe. tyanche sarv tatvdnyan ahinsevar aahe. mag shrikrushn ahinsavadi hota ka?

माझे नवीन लेख मिळवण्यासाठी आपली इमेल नोंद करा..

शोध आणि बोध LATEST

कृपया हे पेज लाईक करावे