सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

Thursday, January 25, 2018

सम्राट अशोक आणि त्याचे बौद्ध धर्मांतर


-महावीर सांगलीकर

सम्राट अशोक हा मौर्य घराण्यातील तिसरा सम्राट. तो मौर्य घराण्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याचा नातू आणि सम्राट बिंदुसाराचा मुलगा होता. अशोकाने शेजारच्या कलिंग देशावर आक्रमण केले. त्या युद्धात दोन्ही बाजूंचे लाखो सैनिक मारले गेले. त्यामुळे अशोकाला हिंसेचा प्रचंड तिटकारा आला आणि त्याने बौद्ध धर्म स्वीकारला असे मानले जाते.

पण कलिंगच्या युद्धाचा तिटकारा येऊन अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला ही माहिती केवळ बौध्द ग्रंथातच येते. याला अनुषंगिक असे इतर ऐतिहासिक पुरावे नाहीत.

अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला हे सांगताना तो त्या अगोदर कोणता धर्म पाळत असे हे मात्र सांगितले जात नाही. अनेकांचा असा समज होवू शकतो की त्याने हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला. पण अशोकाच्या वेळी हिंदू नावाचा धर्मच अस्तित्वात नव्हता. मगध साम्राज्यातील त्यावेळचे धर्म म्हणजे जैन, बौद्ध, आजीवक, वैदिक वगैरे. अशोक अगोदर वैदिक असण्याचा प्रश्नच येत नाही, कारण मौर्य घराण्यातील एकाही सम्राटाने वैदिक धर्माला आपल्या वैयक्तिक जीवनात थारा दिल्याचे दिसत नाही. त्यामुळे बौद्ध धर्म स्वीकारण्याअगोदर अशोक जैन किंवा आजीवक या दोनपैकी एका धर्माचा अनुयायी होता असेच म्हणावे लागते.

पण माझे वरील मत अशोक हा राजा होवून गेला या मतानुसार आहे. प्रत्यक्षात अशोक नावाचा राजा होवून गेला आणि त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता याला बौद्ध साहित्याशिवाय दुसरा आधार नाही. ज्यांना अशोकाचे शिलालेख म्हंटले जाते, त्यापैकी एकाही शिलालेखात अशोक हे नाव येत नाही. त्या शिलालेखांनुसार ज्याने हे शिलालेख लिहिले त्या राजाचे नाव ‘देवानाम पियं पियदस्सी’ असे येते. आता जो धर्म देवच मानत नाही त्या धर्माचा अनुयायी स्वत:ला 'देवानाम पियं' असे कशाला म्हणवून घेईल? तरीही जे लोक पियदस्सीलाच अशोक मानतात, त्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की पियदस्सीच्या एकाही शिलालेखावरून त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता असे सिद्ध करता येत नाही.

शिवाय अशोकाचे म्हणून मानले जाणारे सगळेच शिलालेख एकाच काळातील व एकाच व्यक्तीने लिहिलेले आहेत असे मानायला आधुनिक इतिहासकार तयार नाहीत.

समकालीन आणि नंतरच्या जैन आणि वैदिक साहित्यात, तसेच समकालीन परदेशी प्रवाशांच्या प्रवास वर्णनात अशोकाचा उल्लेख येत नाही. अशोकाची कथा सर्वात आधी अशोकवदन या दुसऱ्या शतकात म्हणजे ‘मानलेल्या अशोकाच्या मानलेल्या काळाच्या’ 500वर्षानंतर लिहिलेल्या बौद्ध ग्रंथात येते. त्यानंतर ती 4थ्या शतकातील महावंश आणि 5व्या शतकातील दीपवंश या बौद्ध ग्रंथात येते.  हे ग्रंथ समकालीन नसल्याने आणि त्यातील माहितीला बाह्य पुरावे नसल्याने त्यावर विश्वास ठेवता येत नाही.

अशोकानंतर सम्राट पदावर त्याचा नातू संप्रति हा आला. अशोकाला पद्मावती नावाची एक जैन राणी होती, तर तिष्यरक्षिता नावाची बौद्ध राणी होती. अशोकाला पद्मावतीपासून झालेला कुणाल नावाचा मुलगा होता. त्याला तिष्यरक्षिताने कपटाने आंधळा बनवला होता. अशोकानंतर कुणालाचा मुलगा संप्रति हा मगधेचा सम्राट झाला. हा जैनधर्मीय होता आणि त्याने जैन धर्माचा प्रचार केला याचे अनेक समकालीन पुरावे आहेत. आता गम्मत बघा! अशोकाचे आजोबा सम्राट चंद्रगुप्त हे जैन होते, नातू संप्रति हाही जैन होता. अशोकाने आपला वारस बौद्ध राणीपासून झालेल्या मुलाला न नेमता जैन राणीपासून झालेल्या कुणाल या मुलाच्या संप्रति या मुलाला नेमला हे कसे काय? अशोकाचे मानले गेलेल्या शिलालेखांमध्ये बौद्ध धम्म ऐवजी नुसताच धम्म हा मोघम शब्द का वापरला आहे? या शिलालेखांमध्ये धर्म, तत्वज्ञान या विषयी जे उल्लेख आहेत, ते बौद्ध धर्मापेक्षा जैन धर्माला जवळचे का आहेत?

माझ्यासारख्या अभ्यासकांना हे उलटे-सुलटे पडणारे गहन प्रश्न आहेत. त्याची उत्तरे व्यक्तिपूजा, धार्मिक अस्मिता यांना बळी पडलेले लोक देऊ शकत नाहीत. वाचकांनीच ठरवायचे आहे की काय खरे असावे आणि काय खोटे असावे!


No comments:

माझे नवीन लेख मिळवण्यासाठी आपली इमेल नोंद करा..

शोध आणि बोध LATEST

कृपया हे पेज लाईक करावे