सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

रविवार, १ एप्रिल, २०१८

जैन-दर्शन: प्राचीन, पौर्वात्य पण प्रागतिक

-राजीव साने 


जे प्राचीन व पौर्वात्य ते प्रतिगामी समजणे हीसुध्दा महागल्लत आहे. हिंदू परंपरेत ‘सनातनी’पणा अल्पमतात असत आलेला आहे. वैदिक(यज्ञवादी), श्रमण(मुक्तीवादी) आणि द्वैती (भक्तीवादी) हे तीन मोठे संप्रदाय, त्यांचे उपपंथ व स्थानिक लोकधर्म या साऱ्यांचा; समन्वयी ‘गोपाळकाला’ म्हणजे हिंदूधर्म होय. हिंदूंमधील परिवर्तनशीलतेचा एक दार्शनिक मूलस्रोत, सर्वात प्राचीन अशा जैन दर्शनात, थक्क करून सोडण्याइतका प्रखर आढळतो.

दर्शन म्हणजे एका जीवनदृष्टीनुसार जीवाचे, जगताचे व (असल्यास) जगदीशाचे स्वरूप कसे? त्यानुसार जीवाचे सार्थक कशात आहे? याबद्दलचे एक सुसंगतपणे सिध्द केलेले मत(बौध्द-मत, सांख्य-मत इत्यादी) होय. दर्शनातले तत्त्वचिंतन काहीही असले (किंवा नसले) तरी ‘धर्म’ जाचक ठरतो आणि धर्मीयांची ‘जमात’ बनणे त्याहूनही जाचक ठरते, याची मला स्पष्ट कल्पना आहे. म्हणूनच विधायक धर्मचिकित्सेसाठी प्रथम, रूढ आचारविचार बाजूला ठेवून, त्या त्या दर्शनाने, मानवासाठी स्वतःला घडविण्याबाबत काय पोटेन्शियल देऊ केलेले आहे, हे अगोदर समजावून घेतले पाहिजे व समजावून दिले पाहिजे.
सामान्यतः बहुतेक दार्शनिकांची भूमिका, ‘अंतिम सत्य’ हे एकच एक असले पाहिजे आणि तसे असेल तर, आपापले दर्शन सोडून इतरांनी सांगितलेली ‘अंतिम सत्ये’ चूक असली पाहिजेत, अशीच असत आलेली आहे. त्यामुळे तत्त्वज्ञानाच्या मैदानात, इतरांचे खंडन करून त्यांना बाद करणे व आपणच अंतिम विजेते ठरणे, ह्या दृष्टीने युक्तिवाद केले जातात. जैनांची अहिंसा ही या मैदानापासूनच सुरू होते. अंतिम सत्य हेच मुळात एकच एक नसून ती अनेक असू शकतात, असे जैन मानतात व या मूलगामी वेगळेपणाला ‘अनेकांतवाद’ असे संबोधले जाते. इतर दर्शनांना वर्ज्य ठरवून आपले दर्शन ‘शुध्द’ राखणे असे जैनांनी केले नाही. उलट त्यांनी, आपल्या दर्शनात ‘एक आंशिकदृष्टी’( जिला ते नय असे म्हणतात) म्हणून, इतर दर्शनांतील ग्राह्य भाग समाविष्ट करून घेऊन, आपले दर्शन समृध्द करत नेले. तसेच इतरांना, ‘तुम्हीही एकांगीपणा सोडा व समृध्द व्हा’, असे आवाहन केले. हे धोरण फारच विधायक आहे. इतरांचे अनुयायी हे ‘पाखंडी व म्हणूनच मारण्यास योग्य’ ही सर्व आंतरधर्मीय युध्दांमागील धारणा जैनांनी मुदलातच फिजूल ठरविली आहे.

विरोधांची नांदणूक, मर्यादित ज्ञान-दावे
जीवनात सातत्य आणि नाविन्य हे दोन्ही आढळते. टिकून राहते तेच खरे व बदलते ते खोटे असे का म्हणा? उदाहरणार्थ वेदांती नित्यवादी असल्याने, जे अढळ राहते ते सत्य आणि जे बदलते ते भासमान, मानतात. याउलट बौध्द हे क्षणवादी आहेत. ते “दर क्षणी सारेच नष्ट होते. पण पुढच्या क्षणीच्या उत्पत्तीत आधीच्याशी साम्य असते, म्हणून सातत्य भासते” असे मानतात. अर्थातच दोघेही एकमेकांना चुकीचे मानतात. याविरोधाकडे जैन कसे पहातात? तर, “ एकच एक सद्वस्तु म्हणून पाहिले (संग्रहनय) की नित्य दिसते तर याउलट ‘आत्ता जे जसे वाटते आहे तसे’ म्हणून पाहिले(ॠजुसूत्रनय) की अनित्य दिसते व दोन्ही खरेच असते.”

ज्ञानाला मर्यादा आहेत, त्यामुळे विधाने जपून केली पाहिजेत, अशीही जैनांची भूमिका आहे. “हो! हे हे असे असे आहे.” अशी विनाअट (अनकंडीशनल) विधाने करण्यापेक्षा, एकापरीने “हो”, दुसऱ्या परीने “नाही” आणि तिसऱ्या परीने “सांगता येत नाही” अशी अटीनिशी (कंडीशनल) विधाने केली पाहिजेत, या जैनांच्या आवाहनाला ‘स्यादवाद’ असे नाव आहे. यावर “ह्यांचे काहीच निश्चित नसते” अशी टीका होते. पण खरेतर ‘कोणत्या परीने’ ह्याचा नेमका निर्देश करून मग विधान करणे हे जास्त अचूक असते.

उदाहरणार्थ इंद्रधनुष्य हे प्रतिमा म्हणून असते पण वस्तू म्हणून नसते(फक्त तुषार व उन्ह असते). एखादे शस्त्र जर फक्त दिवाणखान्यात टांगण्यापुरतेच असेल तर ते एक शोभेची वस्तु बनते. उलट एखादी जड शोभेची वस्तु फेकून मारली तर ती शस्त्र बनते . “तो खाखरला” ते खोकला आल्याने की खवचटपणे? सांगता येणार नाही! पण हेच ‘त्याला’ सांगता येईलही! आहेही आणि नाहीही या रचनेमुळे विरोधी तत्त्वे आपापल्या परीने एकत्र नांदू शकतात.

या भूमिकेचा जैन दर्शनाला झालेला सर्वात मोठा फायदा म्हणजे,चित्(जाणीव) आणि जड(निसर्ग) हे दोनही खरे आणि परस्परप्रवेशी(इंटरपेनिट्रेटिंग) मानणे हा आहे. जैन हे जाणीववान एन्टिटीला ‘जीव’ म्हणतात. निसर्गाला ‘अजीव’ म्हणतात. जीव जितका प्राथमिक किंवा खालच्या पातळीवरचा, तितक्या प्रमाणात त्याच्या जाणीवेत घुसखोरी करून, निसर्गाने त्याचा कबजा घेतलेला असतो. निसर्गाच्या घुसखोरीला व प्रभाव पाडण्याला जैन ‘आस्रव’ म्हणतात. जाणीवेने आपली स्वायत्तता गमावलेली असणे आणि ती कंडीशन्ड असणे याला ते ‘बंध’ म्हणतात. पण तरीही जाणीवेला काहीसे स्वायत्त अस्तित्व उरतेच. निसर्गाने कब्जा घेण्याला, कंडीशनिंगला, जाणीवेकडून होणारा विरोध वा प्रतिबंध, याला जैन ‘संवर’ असे म्हणतात. जाणीव जेव्हा, ही घुसखोरी नुसती थांबवत नाही, तर अगोदर झालेले कंडीशनिंग निरसून टाकते, त्या क्रियेला जैन ‘निर्जरा’ असे म्हणतात. जेव्हा कंडीशनिंगचा पुरता निचरा होऊन जाणीवेची स्वायत्तता पूर्णपणे कमावली जाते, त्या स्थितीला जैन ‘अपवर्ग’ असे म्हणतात. अशा तऱ्हेने चित् व जड यातील द्वंद्वात्मक संयोगाचे, जैनांनी सात टप्पे मानले आहेत. जीव, अजीव, आस्रव, बंध, संवर, निर्जरा, आणि अपवर्ग हे ते सात टप्पे होत. याउलट, वेदांती जडाला/निसर्गाला मिथ्या ठरवतात तर चार्वाक किंवा आधुनिक जडवादी हे जाणीवेला! मात्र या दोहोंतील संबंध उलगडायला दोघेही अक्षम होऊन बसतात.

आत्मा हाच भोक्ता आणि कर्तादेखील
जैन वेदप्रामाण्य मानत नाहीत व ईश्वरही मानत नाहीत पण आत्मा मानतात. प्रत्येक जीवाचा आत्मा हा विलग (सेपरेट) तर आहेच पण तो अनन्य (युनिक) ही आहे. त्याचे अनन्यत्व हे प्राथमिक अवस्थेपासून ते ‘परमावस्थे’तसुध्दा टिकते.

काही दर्शने विशुध्द आत्मा मानतात. मग त्यांना एक विचित्र भूमिका घ्यावी लागते. आपल्याला भासतो ते `आपण’, म्हणजे ‘खरे आपण’ नाही! पण आपल्याला प्रत्ययाला न येणारा विशुध्द आत्मा म्हणजे ‘खरे आपण’! मात्र जैनात ‘खरे आपण’ व ‘खोटे आपण’ असली काही भानगड नाही. ‘खरे आपण’च, विकारी आणि विकारक, फरक पडणारे व फरक पाडणारेसुध्दा म्हणजेच भोक्ताही आणि कर्ताही आहोत.(‘अप्पा कट्टा विकट्टाय’ असे सूत्र आहे.) म्हणजेच व्यवहारतः आपण जसे असतो तसाच जैन-आत्मा आहे! आपण जितके बध्द म्हणजे कंडीशन्ड असू, तितक्या प्रमाणात आपल्या भोगामुळे येणारी आपली प्रतिक्रिया, ही यांत्रिक असेल. स्टिम्युलसनुसार साचेबंद रिस्पॉन्स, बस्स! पण स्टिम्युलसपासून रिस्पॉन्स निर्माण होणे, हे जर जाणीवेच्या द्वारे झाले तर, जाणीवेतील निर्णयाने वेगळा रिस्पॉन्स येण्याची शक्यता खुली होते. रिस्पॉन्स ही नुसती क्रिया न उरता ‘कृती’ बनते.

जाणीवेची स्वायत्तता कमावणे म्हणजे बंध निवारण होय. बौद्धांचे ध्येय दुःखनिवारण हे आहे, तर जैनांचे ध्येय, बंधनिवारण हे आहे. तसेच जैन स्थितीशीलतेला ‘अधर्म’ आणि गतीशीलतेला ‘धर्म’ असे संबोधतात. जैनदर्शनात मुक्तीला महत्त्व जरूर आहे. पण ही मुक्ती ‘जगापासून’ची नाही. जगातच उत्कर्ष साधायचा आहे.

ज्ञान, सुख, कर्तृत्व आणि अनन्यता
परमावस्था या गोष्टीला जैन ‘मोक्ष’ म्हणत नाहीत तर ‘अनोखी’ म्हणून ‘अपवर्ग’ म्हणतात. आत्मा परमावस्थेला पोहोचला तरी तो ‘ब्रह्मा’त लोप पावत नाही, ‘ईश्वरा’ची कृपा प्राप्त करून घेत नाही, वा ह्या ‘लोका’च्या पल्याडही जात नाही. तो या लोकाच्या परिसीमेपाशी पोहोचून तिला थटून रहातो. परमावस्थेचे वर्णन जैनांनी ‘अनंतज्ञान, अनंतसुख आणि अनंतवीर्य(कर्तृत्व)’ असे केले आहे. परिसीमा सांगताना जरी ‘अंनत’ हा शब्द आला असला, तरी या प्रवासातल्या उत्कर्षाचा ‘सांत’ अर्थ स्पष्टपणे सूचित होतो. बंध घटवत न्यायचा आहे. ज्ञान, सुख आणि कर्तृत्व वाढवत न्यायचे आहे आणि तेही आपापल्या खासियतीनुसार! प्रागतिक म्हणजे याहून काय हवे?

या लेखाचा संदर्भ म्हणूनच फक्त नव्हे, तर भारतीय संस्कृतीचा ‘प्रामाणिक आदर’ करणाऱ्या प्रत्येकाने प्रा. श्रीनिवास दीक्षित यांचे ‘भारतीय तत्त्वज्ञान’ फडके प्रकाशन, कोल्हापूर, हे पुस्तक वाचलेच पाहिजे. दर्शनांची ओळख करून घेण्याचा याहून सोपा मार्ग मला तरी माहीत नाही.

हेही वाचा:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular Posts

कृपया हे पेज लाईक करावे