सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

Wednesday, July 18, 2012

बौद्ध धर्मातील ब्राम्हण

-महावीर सांगलीकर

बौद्ध धर्म हा बहुजनांचा धर्म आहे असे मानले जाते. पण यातील बहुजन या शब्दाचा अर्थ आजचे बहुजनवादी घेतात तसा 'ब्राम्हणेतर' असा नाही, तर बहुतांश लोक असा आहे. त्यामुळे गौतम बुद्धांच्या शिष्यांमध्ये ब्राम्हण शिष्यही होते. त्यांची संख्या समाजातील त्यांच्या संख्येच्या टक्केवारीपेक्षा खूपच जास्त होती.

बौद्ध धर्मात गेल्या अडीच हजार वर्षात जे महान भिक्कू आणि विद्वान झाले, त्यात ब्राम्हणांची संख्या मोठी आहे, किंबहुना महान आणि विद्वान बौद्ध भिक्कुंमध्ये ब्राम्हणेतरांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. या लेखात मी अशा कांही ब्राम्हण भिक्कू आणि विद्वानांची थोडक्यात माहिती देत आहे. हे लोक जन्माने वैदिक ब्राम्हण होते, पण त्यांना बौद्ध तत्वज्ञान पटल्यामुळे बौद्ध भिक्कू झाले.

सारीपुत्र: हे गौतम बुद्ध यांच्या पट्टशिष्यांपैकी एक होते. हे जन्माने ब्राम्हण होते आणि त्यांनी संन्यास धर्म स्वीकारला होता. अश्वजीत या भिक्कूकडून त्यांनी गौतम बुद्धांच्या बद्दल ऐकले आणि ते बुद्धांचे शिष्य झाले. सारीपुत्र अतिशय बुद्धिमान होते. त्यांनी गौतम बुद्ध यांचा चुलत भाऊ देवदत्त याने बुद्धांच्या विरोधात केलेले बंड मोडून काढले. गौतम बुद्ध यांच्या उपदेशांचा खूप मोठा प्रचार केल्यामुळे त्यांना 'धम्मसेनापती' ही पदवी देण्यात आली. त्यांनी आपल्या आईलाही बुद्धांचा उपदेश देवून बौद्ध धर्म स्वीकारायला लावला होता. सारीपुत्राचे परीनिर्वाण गौतम बुद्ध यांच्याही आधी झाले.

महाकश्यप : महाकश्यप हेही गौतम बुद्ध यांच्या पट्टशिष्यांपैकी एक होते. त्यांचा जन्म मगधेतील एका ब्राम्हण कुटुंबात झाला होता. हे नेहमी बुद्धांच्या सानिध्यात असत. त्यांचे आचरण अतिशय कडक होते. बौद्ध धर्माची पहिली संगती (council ) भरवण्याचे महत्वाचे काम महाकश्यप यांनी केले. बुद्धांचा सर्वाधिक विश्वास महाकश्यप यांच्यावर होता.

मोग्गलायन: बुद्धांच्या पट्टशिष्यांपैकी हे आणखी एक. यांचा जन्म कोलीता येथील एका ब्राम्हण कुटुंबात झाला होता. त्यांना विविध प्रकारच्या विद्या येत होत्या. यांचे परीनिर्वाण बुद्धांच्यांही अगोदर सहा महिने, आणि सारीपुत्रानंतर पंधरवड्यात झाले.

गौतम बुद्ध यांच्या संघात वरील प्रमुख ब्राम्हण शिष्यांशिवाय इतरही अनेक ब्राम्हण शिष्य होते. गौतम बुद्ध यांच्या परीनिर्वाणानंतरही बौद्ध धर्मात अनेक महान बौद्ध भिक्कू, आचार्य व विद्वान झाले. त्यातील कांही प्रमुखांचा परिचय मी पुढे देत आहे:

नागार्जुन: यांचा जन्म दक्षिण भारतात एका ब्राम्हण कुटुंबात झाला (इ.स. १५०). हे सातवहान राजा सातकर्णी याचे सल्लागार होते. नागार्जुन यांनी बौद्ध तत्वज्ञानावर अनेक ग्रंथ लिहिले. हे आयुर्वेदाचेही तज्ञ होते. आयुर्वेदातील 'भस्म' प्रकारच्या औषधांचा शोध नागार्जुन यांनी लावला.

अश्वघोष: अश्वघोष (इ.स. ८० ते १५०) यांचा जन्म साकेत येथील एका ब्राम्हण कुटुंबात झाला. यांना पहिले संस्कृत नाटककार मानण्यात येते. पण अश्वघोष ब्राम्हण असले तरी ते बौद्ध धर्माचे अनुयायी असल्याने पहिल्या नाटककाराचे श्रेय त्यांना न देता त्यांच्या नंतर सुमारे ३०० वर्षांनी झालेल्या वैदिक ब्राम्हण असलेल्या कालिदासाला देण्यात येते. अश्वघोष यांनी गौतम बुद्ध यांचे चरित्र संस्कृत भाषेत लिहिले, जे संपूर्ण भारतातील नव्हे तर जावा, सुमात्रा, श्री लंका येथील बौद्ध साधूंना उपयोगी पडले. या चरित्राचे चीनी आणि तिबेटी भाषेतही अनुवाद झाले. अश्वघोष यांनी वर्णव्यवस्था आणि जातीवाद यांचे खंडन करणारा वज्रसूची हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला.

बुद्धघोष: बुद्धघोष (इ.स. ५वे शतक) यांनी बौद्ध धर्माच्या थेरवाद या पंथाचे पुनर्जीवन केले. त्यांचा जन्म बोधगयेतील एका ब्राम्हण कुटुंबात झाला होता. श्रीलंकेतील प्रसिद्ध महावंश या ग्रंथात बुद्धघोष यांचे चरित्र विस्ताराने आले आहे. बुद्धघोष हे वैदिक धर्माचे प्रकांड पंडीत होते. रेवत या बौद्ध भिक्षूने त्यांचा वाद-विवादात पराभव केला, त्यामुळे ते बौद्ध भिक्षू बनले. अर्थात हे रेवत देखील ब्राम्हण होते.

याशिवाय तिबेटी बौद्ध धर्माचे संस्थापक पद्मसंभव, झेन बौद्ध धर्माचे संस्थापक शांतिदेव, ग्रीक राजा मेनेंदर उर्फ मिलिंद याला बौद्ध धर्माचे अनुयायी बनवणारे नागसेन, सम्राट अशोकाला बौद्ध धर्माचे अनुयायी बनवणारे राधास्वामी, नालंदा विद्या पीठातील बौद्ध महापंडित आर्यदेव आणि शांतरक्षित हे सगळेजण जन्माने ब्राम्हण होते. ही यादी फारच लांबवता येईल, पण येथे केवळ वानगीदाखल कांही नावे दिली आहेत. अगदी आधुनिक काळातही बौद्ध धर्म स्वीकारून त्याचा प्रचार करणारे महापंडित राहुल सांकृत्यायन आणि डी.डी. कोसंबी हे दोघेही जन्माने ब्राम्हण होते.

पीटर मेस फिल्ड या प्रसिद्ध विद्वानाने लिहिले आहे की प्राचीन काळी बौद्ध धर्मात ब्राम्हण लोकांनाच प्राधान्य दिले गेले. दुसरे एक विद्वान असीम चटर्जी म्हणतात की संकट काळात बौद्ध धर्म वाचवण्याचे काम ब्राम्हनांनीच केले आहे.

ही सगळी माहिती मी मुख्यत्वे विकीपेडियावरील http://en.wikipedia.org/wiki/Buddhist_Brahmins येथून वरून घेतली आहे, व या माहितीचा खरेपणा वेगवेगळ्या विद्यापीठांच्या वेबसाईट्स आणि दापोडी येथील बौद्ध विहारातील अधिकृत बौद्ध ग्रंथातून तपासून घेतला आहे.

भारतातून बौद्ध धर्म संपवायला ब्राम्हण जबाबदार आहेत असे अनेक जण मानतात. पण खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याना हे मत मान्य नाही. त्यांच्या मते बौद्ध धर्माचा -हास भारतावरील परकीय आक्रमणामुळे झाला.

हे खरे आहे की अनेक वैदिक ब्राम्हणांना बौद्ध धर्म नको होता, पण याचा अर्थ सगळेच ब्राम्हण बौद्ध धर्माचे विरोधक होते असा होत नाही. खुद्द गौतम बुद्ध यांच्या संघात त्यांचे सर्वाधिक आणि प्रमुख शिष्य हे ब्राम्हण होते, त्यानंतर क्षत्रिय शिष्यांचा नंबर येतो. या संघात शूद्रांचे स्थान तसे नगण्यच होते. अनेक ब्राम्हणांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि तो वाढवला. बौद्ध धर्म तिबेट, चीन, जपान वगैरे देशात नेण्याचे श्रेय ब्राम्हनांनाच जाते. आजच्या ब्राम्हणविरोधी बौद्ध धर्मियांनी तर ही गोष्ट ध्यानात घ्यायला पाहिजेच पण ब्राम्हणांनी देखील यावर विचार करायला पाहिजे, कारण बहुतेक ब्राम्हणांना वैदिक धर्माच्या पलीकडचा आपला इतिहास माहित नाही. त्यांनी तो माहीत करून घेण्यात त्यांचाच फायदा आहे.

पुढील लेखात मी जैन धर्माच्या प्रचार-प्रसारात ब्राम्हणांनी दिलेल्या योगदानाची माहिती देत आहे.

हेही वाचा:
जैन धर्माच्या प्रसारात ब्राह्मणांचे योगदान
बौद्ध धर्म, जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता
बहुजन म्हणजे नक्की कोण हो भाऊ?

5 comments:

Anonymous said...

Shabbash sanglikar!

. said...

ati uttam lekh

Raj Jadhav said...

पूर्वी बौद्धधम्मा मध्ये ब्राह्मण अधिक होते, हे मान्यच आहे, परंतु ब्रह्मनेत्तर समाजाची संख्या देखील नगण्य न्हवती, बौद्धधम्म हा नुसता एक धर्म नसून ती एक जीवन पद्धती आहे, धम्म सर्वसमावेशक आहे, त्यामध्ये सर्व धर्मातील, जातीतील लोकांना सामील होण्याचा अधिकार आहे, त्यामुळे तिथे कोणत्या एक समाजाला बंदी असण्याचे कारण नाही.

बौद्ध धम्म लोप पावण्याची अनेक कारणे आहेत, परकीयांचे आक्रमण, लोप पावलेला राजाश्रय वगैरे वगैरे ………ब्राह्मण लोकांमुळे संकट काळात बौद्ध धम्म वाचला हे खोटे आहे, अनेक वैदिक ब्राम्हणांना बौद्ध धर्म नको होता, हे तुम्हीही मान्य करता, जे ब्राह्मण बौद्ध धम्माला शरण येवून बौद्ध भिक्कू झाले, त्यांनी नक्कीच बौद्धधम्म वाचविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले असतील, आणि ते सर्वांनी मान्य देखील करावयास हवे, परंतु जे बौद्ध भिक्कू बनले, ते ब्राह्मण राहिले नाहीत, त्यामुळे "ब्राह्मण लोकांनी बौद्धधम्म वाचविण्यासाठी प्रयत्न केले हे विधान खोटे ठरते,

<<<<<<<<<<<<>>>>>>>>>> जे ब्राह्मण बौद्ध धम्माला शरण येवून बौद्ध भिक्कू झाले, ते वैदिक ब्राह्मण राहिले नाहीत, त्यामुळे बौद्ध धर्म तिबेट, चीन, जपान वगैरे देशात नेण्याचे श्रेय ब्राम्हनांनाच जाते, हे विधान खोटे ठरते, पाहिजे तर असे म्हणू शकाल, बौद्ध धम्म भारताबाहेर नेण्याचे श्रेय ज्या भिक्कुंना जाते त्यात "पूर्वीचे ब्राह्मण" असलेले भिक्कू देखील होते……!

Raj Jadhav said...

"बौद्ध ग्रंथावरून दिसून येते कि भगवान बुद्धाच्या श्रमण शिष्यामध्ये जवळ जवळ ६० ब्राह्मण होते, ब्राह्मण लोक भगवान बुद्धांशी वादविवाद करण्यासाठी त्यांच्याकडे येत असत व वादविवादात नितुत्तर झाल्यामुळे प्रभावित होऊन सहर्ष त्यांच्या धम्माची दीक्षा घेऊन भगवान बुद्धाबद्दल श्रद्धा बाळगत असत. या श्रमान शिष्यामुळे भगवान बुद्धाचा व त्यांच्या धम्माचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत होता. परंतु बौद्ध धम्मात जातीभेद नसल्यामुळे क्रमश जेव्हा खालच्या जातीतील लोक बुद्धाला शरणांगत होऊन सिद्ध भिक्षु बनू लागले व धानिकाद्वारे व राजद्वारे त्यांची पूजा व सत्कार होऊ लागला तेव्हा हो गोष्ट "ब्राह्मणांना" सहन झाली नाही व बौद्ध धम्माचा उच्छेद करण्याच्या ते मार्गाला लागले."

- वाय. एम. बि. ए. कोलोंबो द्वारा आयोजित "विश्व बौद्ध भ्रातृत्व संमेलनात दि. ६ जून १९५० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले भाषण…!

Muniraj Somkuwar said...

लेखाच शीर्षक थोडं संभ्रमात टाकणार आहे. बाकीची माहिती छान आहे. बौद्ध धम्मात आल्यानंतर कोणी ब्राम्हण, क्षत्रीय किवा शुद्र राहत नाहीत.

जे ब्राम्हण बौद्ध धम्मात आलेत ,त्यांना बौद्ध तत्त्वज्ञान हिंदुपेक्षा अधिक सक्षम वाटले

माझे नवीन लेख मिळवण्यासाठी आपली इमेल नोंद करा..

शोध आणि बोध LATEST

कृपया हे पेज लाईक करावे