सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

Monday, October 29, 2012

राजपुतांच्या कांही कुळ्यांचे दक्खनी मूळ

-महावीर सांगलीकर

मराठा समाजात शहाण्णव कुळ्या आहेत हे आपणाला माहीत आहेच. त्यापैकी कांही कुळ्यांचे मूळ राजस्थानात आहे असे मानले जाते. हे कांही प्रमाणात खरे असले तरी प्रत्यक्षात  मराठ्यांच्या वेगवेगळ्या कुळ्यांचे मूळ भारताच्या वेगवेगळ्या भागात आहे. अगदी तसेच राजपुतांच्या वेगवेगळ्या कुळ्यांचे मूळ देशाच्या वेगवेगळ्या भागात आहे. एवढेच नव्हे तर राजपुतांच्या अनेक कुळ्यांचे मूळ दक्खनेत आहे. या लेखात मी राजपुतांच्या अशा कांही दक्खनी कुळ्यांसंबंधात लिहिणार आहे.

आधी आपण मराठा आणि राजपूत समाजात कोणकोणत्या कुळ्या समान आहेत हे बघू. अशा समान कुळ्यांची  यादी पुढे दिली आहे:


मराठा कुळ्या
राजपूत कुळ्या

राठोड
राठोड
चव्हाण
चौहान
सिसोदे/सिसोदिया
सिसोदिया
जाधव
जादोन
साळुंखे
सोलंकी/ सोळंकी
शिलाहार/ शेलार
सिलार
राणे
राणा
मोरे
मोरी
पवार
पंवार- परमार

वरील कुळ्यांपैकी फक्त सिसोदिया/सिसोदे, राणा/राणे आणि चौहान/चव्हाण याच कुळ्यांचे मूळ राजस्थानात आहे. तर मोरे कुळीचे मूळ मगध आणि काश्मीर येथे, जाधव कुळीचे मूळ मथुरा (उत्तर प्रदेश) आणि द्वारका (गुजरात) येथे,  पवार कुळीचे मूळ धार, मध्य प्रदेश येथे आहे. आता राहिल्या राठोड, साळुंखे/सोळंकी  आणि सिलार/शिलाहार या तीन कुळ्या . या  कुळ्यांचे मूळ दक्खनेत आहे, तेही महाराष्ट्र-कर्नाटकात. ते कसे ते पाहू.

राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक या तीन प्रदेशातील लोकांचे, विशेषत: राज्यकर्ते, सैनिक आणि व्यापा-यांचे प्राचीन काळापासून एकमेकांच्या प्रदेशात स्थलांतर होत राहिले आहे. महाराष्ट्र व कर्नाटक हे प्रदेश आज राजकीय दृष्ट्या वेगवेगळे असले तरी पूर्वी ते ब-याच वेळा एकछत्री अमलाखाली असायचे. हे दोन्ही प्रदेश भौगोलिक दृष्ट्या सलग असल्याने हे त्या काळातील अनेक राजघराण्यांना ते शक्य झाले.

महाराष्ट्राचे पहिले राजघराणे (इ.स. पूर्व 230 ते इ.स. 220 ) मानले गेलेल्या सातवहानांचे राज्य महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या विस्तृत प्रदेशावर पसरले होते. या सातवाहनांचे मूळ आंध्र प्रदेशातील धरणीकोटा  व अमरावती येथे आहे. महाराष्ट्रात त्यांची महत्वाची ठिकाणे म्हणजे पैठण आणि जुन्नर. सातवहान हे अगोदर मौर्यांचे मांडलिक होते, पण अशोकाच्या मृत्यूनंतर ते स्वतंत्र झाले.

मराठा समाजामध्ये वेगवेगळ्या राजघराण्यांशी संबंधीत कुळ्या दिसतात, पण सातवहान या राजघराण्याशी संबंधीत कुळी दिसत नाही. तशीच ती रजपूतांमध्ये ही  दिसत नाही. 

सातवहानांनंतरच्या काळात झालेली दोन प्रसिद्ध व बलाढ्य राजघराणी म्हणजे चालुक्य व राष्ट्रकूट ही होत.

सोळंकी कुळी
चालुक्यांच्या एकूण तीन शाखांनी कर्नाटक, गोवा, महाराष्ट्, आंध्र आणि गुजरात या प्रदेशांवर, तसेच मध्य प्रदेशच्या दक्षिण भागावर राज्य केले. त्यांची प्रसिद्ध राजधानी कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील बदामी येथे होती, पण त्या आधी ती महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे होती.

बदामीचे चालुक्य पराक्रमी होते. त्यांच्यापैकी पुलकेशी दुसरा या राजाने उत्तर भारतावर स्वारी केली. तेथे त्याचा सामना सम्राट हर्षवर्धनाबरोबर झाला. त्या युद्धात हर्षवर्धनाचा  पराभव झाला. 

चालुक्यांच्या एका शाखेने गुजरात मधील अनहीलवाड  येथून इ.स. 942 ते 1244 या काळात राज्य केले. तेथे ते सोळंकी या नावाने ओळखले गेले. या घराण्यात मूळराज पहिला, कुमारपाल आणि त्रिभुवनमल्ल हे प्रमुख आणि प्रसिद्ध राजे झाले. आजच्या गुजरात आणि राजस्थान मधील मधील राजपुतांमध्ये तसेच जाट समाजात सोळंकी ही एक प्रसिद्ध कुळी आहे. 

राठोड कुळी
राष्ट्रकुटांचे (इ.स. 753 ते 982 ) साम्राज्य दक्षिण समुद्रापासून उत्तरेत कनोज पर्यंत पसरले होते. त्यांची पहिली राजधानी आजचे कंधार (नांदेड) ही होती, नंतर ती गुलबर्ग्याजवळ मलखेड येथे नेण्यात आली. पुढे कनोजच्या राष्ट्रकुटांच्या विविध शाखांनी राजपुताना, मालवा, पश्चिम उत्तर प्रदेश, गुजरात अशा अनेक भागांवर राज्य केले. ही सर्व राजघराणी राठोड या नावाने ओळखली जातात. राष्ट्रकुटांचे मूळ नाव रट्टउड असे आहे, त्याचाच अपभ्रंश राठोड हे नाव होय. राष्ट्रकूट हा मूळ मरहट्टी  भाषेतील रट्टउड या शब्दाचा अपभ्रंश आहे.  उत्तरेत राठोडांच्या एकूण 24 शाखा असून राठोड कुळीच्या राजपुतांना खूपच प्रतिष्ठा आहे.

सिलाहार कुळी
राजपुतांच्या कुल्यांच्या यादीत सिलाहार/ सिलार हे एक नाव आहे. या कुळीचे मूळ महाराष्ट्रातील शिलाहार राजघराण्यात आहे. शिलाहार घराण्याच्या  महाराष्ट्रात सहा शाखा होत्या, त्यातील कोल्हापूर, दक्षिण कोकण आणि उत्तर कोकणाचे शिलाहार ही घराणी प्रसिद्ध होती. सगळ्या शिलाहारांचे मूळ धाराशिव (जिल्हा उस्मानाबाद, महाराष्ट्र) येथे आहे. महाराष्ट्रातील शिलाहार राजपुतान्यात कसे गेले याची फारशी माहिती उपलब्ध होत नाही.

या संदर्भात राजपुतांच्या कुल्यांचे एक अभ्यासक प्रोफेसर यशवंत मलैय्या (कोलोराडो विद्यापीठ, अमेरिका ) म्हणतात,
"Some of the Rajput clans originated from Maharashtra/Karnataka region with absolute certainty. Some of the others are, to the best of my knowledge, branches of clans that originated from Maharashtra/Karnataka. We should note that emergence of Rajputs coincides with expansion of Rashtrakutas and Chalukyas into western/northern India." (Maharashtra/Karnataka: Original Center of several Rajputs clans? )

दक्खनच्या लोकांचे उत्तरेत स्थलांतर  
दक्खनवरील  राजघराण्यांनी राज्य विस्तारासाठी उत्तरेवर स्वारी केल्यावर त्यांच्या बरोबर कांही लोकांचे स्थलांतर होणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. चालुक्य आणि राष्ट्रकूट यांनी जेंव्हा माळवा, राजपुताना, गुजरात या भागावर स्वारी करून तेथे आपले बस्तान बसवले, तेंव्हा दक्खने वरील अनेक लोकांनी तिकडे स्थलांतर केल्याचे दिसते. याचे अनेक भाषिक, सांस्कृतिक आणि धार्मिक पुरावे सापडतात.

पहिला म्हणजे राजस्थानी, मारवाडी, मेवाडी, माळवी वगैरे भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा 'आई' हा शब्द. हा शब्द तेथे मुख्यत्वे देवीसाठी वापरला जात असला तरी तो 'आई' (Mother, माता) या अर्थानेच वापरला जातो.  'आई'  प्रमाणेच 'बाई'  हा शब्दही वरील भाषांमध्ये वापरला जातो.  हे दोनही शब्द मराठी आहेत, आणि या प्रकारचे महत्वाचे शब्द एखाद्या भाषेत रुळायला ते शब्द वापरणा-यांचे स्थलांतर हेच महत्वाचे कारण असू शकते.

वरील दोन शब्दांप्रमाणेच 'वाड', 'वाडा' आणि 'वाडी'  हे तिन्ही मराठी-कानडी शब्द  राजस्थानी, मारवाडी, मेवाडी, माळवी वगैरे भाषांमध्ये आढळतात. गुजरात-राजस्थान मधील 'अनहीलवाड', मारवाड, भिलवाडा ही स्थळनावे पहा. दक्खनवरचे असेच नाव म्हणजे 'धारवाड'. राजस्थान मधील अनेक छोट्या वस्त्यांना 'वाडी' हा शब्द वापरला जातो. विशेष म्हणजे हे शब्द हिंदी वगैरे भाषेत दिसत नाहीत.

वरील शब्दांप्रमाणेच 'ळ' हे अक्षर कन्नड, मराठी, गुजराती, राजस्थानी, माळवी, मेवाडी, मारवाडी या सगळ्या भाषांमध्ये दिसून  येते. हे अक्षर हिंदी, बंगाली वगैरे भाषांमध्ये नाही, आणि याचे मूळ द्रविडी भाषांमध्ये आहे, अर्थातच हे अक्षर  राजस्थान-गुजरातमध्ये दक्षिणेतूनच गेले आहे.  

मावली (माऊली), उकळ, सगळा, पाळी, पोळी, पावना (मराठी पाहुणा), लावणी (पिकाची लावणी), काळजो (काळीज), फळी, बामण, बंगडी (बांगडी), आंबो (आंबा), तोरण, उबो (उभा), उघाडो (उघडा), ढुंगा(ढुंगण), धिंगाणो (धिंगाणा),  फुगो (फुगा), घाल (घालणे), ग्याबन (गाभण), जलम (जल्म), कागद, कुण (कोण), पेटी, उकाळ (उकळणे)  असे कितीतरी शब्द मराठी आणि राजस्थानी, माळवी, मेवाडी, मारवाडी वगैरे भाषांमध्ये समान दिसतात, पण हे शब्द हिंदी भाषेत नाहीत.

ही भाषिक समानता बरेच कांही सांगून जाते. ही समानता केवळ शब्दांपुरती मर्यादित नाही, तर वाक्यरचना  आणि कांही प्रमाणात व्याकरण यातही ती दिसून येते.

मारवाडी लोक  मराठी भाषा इतरांच्या मानाने चटकन शिकतात याचे कारण मराठी आणि मारवाडी या दोन भाषेत असणारा सारखेपणा हेच आहे. 

राजस्थान-गुजरात या दोन प्रदेशात जैन धर्म प्राचीन काळापासून असला तरी चालुक्य आणि राष्ट्रकूट यांच्या काळात या दोन्ही प्रदेशात हा धर्म भरभराटीला    आला, कारण ही दोन्ही राज घराणी जैन धर्माचे आश्रयदाते होते. यांच्या काळात कर्नाटकमधील अनेक जैन भट्टारक पीठांच्या शाखा वरील दोन प्रदेशात स्थापन झाल्या. या दोन प्रदेशात जी जैन मंदिरे बांधली जात त्यातील जैन मूर्त्या त्या काळात कर्नाटकातून मागवल्या जात असत. इथे जैन मंदिरांना 'वसही' म्हंटले जाते. 'वसही' हा शब्द 'बसदी' या कन्नड शब्दाचा अपभ्रंश आहे. त्याच प्रमाणे जैन आचार्यांच्या स्मृतीसाठी बांधलेल्या मंदिरास येथे 'दादावाडी' म्हणतात, यातील वाडी या शब्दाचे मूळ मी वर दिलेलेच आहे.

या काळात वरील प्रदेशातील राजांच्या राण्या, राजघराण्यातील इतर पुरुषांच्या बायका अनेकदा कर्नाटकी असत, याचे अनेक उल्लेख त्या काळातील साहित्यात मिळतात.

यावरून असे दिसते की राजस्थान, माळवा, गुजरात येथील लोकांपैकी अनेकांचे पूर्वज हे दक्खनवरचे, विशेषत: उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्र या भागातील होते.

हेही वाचा:
 मातंग समाज आणि जैन धर्म
शिलाहार राजा भोज दुसरा आणि त्याने बांधलेले किल्ले
वारकरी संप्रदायाचे मूळ कोठे आहे?
पुस्तक परीक्षण: शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव
पुस्तक परीक्षण: शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव

No comments:

माझे नवीन लेख मिळवण्यासाठी आपली इमेल नोंद करा..

शोध आणि बोध LATEST

कृपया हे पेज लाईक करावे