सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

Wednesday, October 24, 2012

मातंग वंश आणि जैन धर्म

-महावीर सांगलीकर 


मातंग समाजाला फार प्राचीन इतिहास आहे., पण त्यांच्या इतिहासावर फारसे संशोधन झालेले नाही. जे झाले आहे ते बौद्ध साहित्यावर आधारीत आहे. अर्थातच, मातंगांचा  इतिहास लिहिताना जैन साहित्यातील मातंगांची माहिती फारशी कोणी विचारात घेतली नाही.  

जैन साहित्यात मातंगांचे  उल्लेख वारंवार येतात. त्यांचा संबध सरळ सरळ जैन धर्माचे पहिले तीर्थंकर रिषभ उर्फ आदिनाथ यांच्यापर्यंत जातो. अर्थातच हा संबंध इतिहासपूर्व काळातील आहे.

रिषभ हे मानवी संस्कृतीचे निर्माते होते. त्यांनी मानवाला शेती, शस्त्रविद्या, लिखाण आणि उपजीविकेचे अनेक उद्योग शिकवले. जैन साहित्य आणि पुराण साहित्य या दोन्हींत रिषभांना एकमुखाने सर्व क्षत्रियांचे पूर्वज आणि सर्व क्षत्रियांकडून पूजित मानले आहे. 

या रिषभांना  नमी आणि विनमी असे दोन नातू होते. विनमीला मातंग नावाचा मुलगा होता. त्याच्यापासून मातंग वंशाची सुरवात झाली. मातंगवंशीयांना वेगवेगळ्या विद्या अवगत होत्या, म्हणून त्यांना विद्याधर असेही म्हंटले जाई. पुढे मातंग वंशाच्या सात शाखा झाल्या. त्यातील एक शाखा म्हणजे वार्क्ष मुलिक वंश होय. या वार्क्ष मुलिक वंशाची  खूण सापाचे चिन्ह असलेले दागिने ही होती.  हाच वंश पुढे नागवंश म्हणून ओळखला जावू लागला.  या वार्क्ष मूलक उर्फ नाग वंशात पुढे जैन धर्माचे सातवे तीर्थंकर सुपार्श्वनाथ हे झाले. जैन परंपरेत सर्व चोवीस तीर्थंकरांना वेगवेगळी चिन्हे आहेत. यातील अपवाद वगळता बहुतेक चिन्हे ही प्राण्यांची आहेत. सुपार्श्वनाथांचे चिन्ह स्वस्तिक हे आहे, पण त्याचबरोबर  त्यांचे दुसरे चिन्ह फणाधारी साप  हे आहे. यातील स्वस्तिक हे चिन्ह सिंधू संस्कृतीशी संबंधित आहे, तर फणाधारी साप हे चिन्ह नागवंशाशी संबंधीत आहे. 

विशेष म्हणजे सुपार्श्वनाथ यांचा यक्ष मातंग आहे, त्याच प्रमाणे जैन धर्माचे शेवटचे तीर्थंकर महावीर यांचा यक्षही मातंग आहे. अर्थातच मातंग वंशाची सुरवात ज्याच्यापासून झाली तो विनमी पुत्र मातंग, सुपार्श्वनाथ यांचा यक्ष मातंग आणि महावीर यांचा यक्ष मातंग असे एकूण तीन महान मातंग जैन परंपरेत होवून गेले.  

जैन साहित्यातील मातंगांच्या वरील उल्लेखांवरून  असा निष्कर्ष निघतो की नागवंश ही मातंग वंशाची एक शाखा आहे. म्हणजेच नागवंशी हेही मूळचे मातंगवंशीच आहेत. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की आज कांही लोक नागवंशाचा संबंध बौद्ध धर्माशी जोडत असले तरी नागवंशात प्रामुख्याने जैन धर्मच होता. इतकेच नाही तर जैन धर्माचे 24 पैकी किमान तीन तीर्थंकर हे नागवंशी होते, ते म्हणजे सुपार्श्वनाथ (7वे तीर्थंकर), पार्श्वनाथ (23वे तीर्थंकर) आणि महावीर (24वे तीर्थंकर). याउलट बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध हे कांही नागवंशी नव्हते, कारण ते ज्या कुळात जन्माला आले ते शाक्य कुळ हे कांही नागवंशी नव्हते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महावीर ज्या कुळात जन्माला आले ते नाथ कुळ आणि  महावीरांच्या आईचे लिच्छवी कुळ ही दोन्हीही कुळे नागवंशी होती. महावीरांच्या चार मावश्यांचे लग्न ज्या राजांशी झाले तेही नागवंशी होते. या सगळ्या कुळांमध्ये परंपरेने  जैन धर्म होताच, शिवाय हे राजे पुढे महावीरांचे शिष्य झाले. महावीरांचा  एक काका (मावशीचा  पती)  प्रसेनजीत हा  कांही काळ गौतम बुद्धांचा शिष्य झाला होता, पण शाक्यांनी प्रसेनजिताची घोर फसवणूक केल्याने  तो बुद्धांच्या पासून  दूर झाला आणि पुन्हा आपल्या मूळ धर्माकडे वळला.

मातंग जैन मुनी  
जैन धर्मात मुनी परंपरेला फार महत्व आहे. जैन साहित्यात प्राचीन काळातील अनेक जैन मुनींची माहिती अगदी त्यांचा जन्म कोणत्या कुळात अथवा समाजात झाला यासह येते.  या संदर्भात अभ्यास केल्यावर असे दिसून येते की आज जशी जैन मुनी दीक्षा घ्यायची मुभा कोणत्याही जातीच्या व्यक्तीला आहे, तशीच ती प्राचीन काळीही होती. जैन साहित्यातील उल्लेखानुसार सगळ्या वर्णांचे आणि त्या काळातील कोणत्याही वंशाचे/ समाजाचे लोक जैन मुनीदीक्षा घेत असत.

 मातंग लोकही याला अपवाद नव्हते. मातंग व्यक्तीने जैन मुनी दीक्षा घेतल्याची व पुढे अगदी 'आचार्य' झाल्याची बरीच उदाहरणे आहेत. हरीकेशी, चित्त, संभूत, मेतार्य ही त्यांच्यापैकी कांही नावे.

यातील चित्त आणि संभूत हे दोघे भाऊ होते. त्यांची माहिती उत्तराध्ययन सूत्र या प्राचीन जैन ग्रंथात येते. मातंग समाजात जन्मलेले हे दोघे भाऊ जैन मुनी झाल्यावर एका यज्ञाच्या ठिकाणी जातात आणि त्या याज्ञिक ब्राम्हणांना यज्ञ करणे, त्यात बळी देणे कसे चुकीचे आहे सांगतात. त्यांचे म्हणणे पटून ते ब्राम्हण यज्ञ-याग वगैरे सोडून देतात आणि महावीरांचे शिष्य बनतात, अशा स्वरूपाची एक सविस्तर कथा या ग्रंथात आली आहे.  याज्ञिक ब्राम्हणांना मातंग मुनींनी उपदेश करणे आणि त्यांचे मतपरिवर्तन करणे ही क्रांतीकारक घटना वाटते.

उत्तराध्ययन सूत्र हा ग्रंथ फार महत्वाचा आहे, कारण तो प्राचीन तर आहेच, पण त्याच बरोबर यात वर्धमान महावीर यांच्या आयुष्यातील शेवटच्या काळातील उपदेशांचे सार आहे.

जैन रामायण 
 वाल्मिकी रामायणात हनुमान, वाली, सुग्रीव, नल, नील, अंगद  यांना वानर, अस्वल वगैरे  मानले आहे. कांही ठिकाणी ते मातंग होते असेही म्हंटले आहे. पण जैन रामायणात त्यांना विद्याधर आणि मानवच मानले आहे. ते मानव असले तरी त्यांचे पूर्वज ज्या बेटावर रहात तेथे मोठ्या प्रमाणात वानर होते, त्यामुळे या विद्याधरांनी आपल्या ध्वजावर वानर हे चिन्ह वापरण्यास सुरवात केली असे स्पष्टीकरण जैन रामायण देते. मातंगाना विविध विद्या अवगत असल्याने त्यांना विद्याधर म्हणून ओळखले जात असे हे मी या लेखाच्या सुरवातीस म्हंटलेच आहे.

वाल्मिकी रामायणात हनुमानाला रामाचा दास दाखवले आहे, याउलट जैन रामायणात हनुमान हा विद्याधर आणि राजा असल्याचे आणि रामाचा मदतकर्ता मित्र असल्याचे दाखवले आहे.

जैन धर्म मोक्ष मानतो. मोक्ष हा केवळ मानवासच मिळतो असे जैन तत्वज्ञान सांगते. जैन धर्मात हनुमान, सुग्रीव, नल, नील वगैरे मोक्षास गेले असे मानले आहे. यावरूनही ते मानवच होते असे दिसते.
***

मातंग वंश आणि जैन धर्म या विषयावर मी येथे थोडक्यात माहिती दिली आहे.  यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे, आणि ते मुख्य करून मातंग संशोधकांनी केले पाहिजे असे मला वाटते. 


संदर्भ:
प्राकृत साहित्य का इतिहास: डॉक्टर जगदीश चंद्र जैन
जैन धर्म का मौलिक इतिहास:  आचार्य हस्तीमलजी महाराज
उत्तराध्ययन सूत्र , जैन सूत्र ग्रंथ
महापुराण: आचार्य जिनसेन
जैन रामायण: आचार्य विमलसुरी 

भारतवर्ष नामकरण: डॉक्टर जिनेन्द्र भोमाज 

हेही वाचा:  
संत तुकाराम आणि जैन धर्म
उपेक्षितांसाठी जैन धर्मच जास्त योग्य 
दलित-आदिवासींचे जैन धर्मांतर 
बामसेफने दलितांच्या धर्मांतराविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी
ओ.बी.सी. आणि जैन धर्म 
महाराष्ट्र आणि जैन धर्म


No comments:

माझे नवीन लेख मिळवण्यासाठी आपली इमेल नोंद करा..

शोध आणि बोध LATEST

कृपया हे पेज लाईक करावे