सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

मंगळवार, २ ऑगस्ट, २०१६

महाराष्ट्र आणि जैन धर्म

-महावीर सांगलीकर 

अलीकडे जैन धर्म आणि जैन तत्वज्ञानाची दखल अमेरिका, कनडा आणि युरोपिअन देशात मोठ्या प्रमाणावर घेतली जाऊ लागली आहे. अमेरिकेतील किमान 20 विद्यापीठांमध्ये जैन तत्वज्ञान या विषयाचे स्वतंत्र विभाग (Department of Jainism) अथवा अध्यासने (Jain Chairs) आहेत. सध्या जगभर चालू असलेल्या दहशतवादावर चर्चा होत असताना जैन धर्माचा अवश्य उल्लेख होत असतो. पन्नास वर्षांपूर्वी फारसा कुणाला माहीत नसलेला जैन धर्म पश्चिमी देशात अगदी मिडियासाठी देखील आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे.

अमेरिकेत अनेक हिंदू आश्रम आहेत. तिथंही जैन तत्वज्ञानावर नेहमी चर्चा आणि प्रवचने होत असतात.

पण आपल्या इथं, खास करून महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे? माझा स्पष्ट आरोप आहे की महाराष्ट्रातली विद्यापीठे, मराठी स्कॉलर्स, लेखक, मराठी मेडिया आणि सामान्य लोकही जैन धर्म आणि तत्वज्ञान यांच्या बाबतीत दुजाभाव करतात. महाराष्ट्रातल्या विद्यापीठांमध्ये एखादा अपवाद वगळता ‘जैन तत्वज्ञान’ Department of Jainism’ विभाग नसतातच, आणि जैन अध्यासने ‘बंद’ पाडण्याचे उद्योग केले जातात. एक विद्यापीठ तर जन अध्यासन चालवण्यासाठी जैन समाजाकडूनच देणग्या मागत असते. अशा देणग्या मिळूनही त्या विद्यापीठाच्या या विभागात भरीव कांही होत नाही.

अशा गोष्टी होण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. त्यावर चर्चा होणे आवश्यक आहे.

प्राचिन काळी जैन धर्माचा प्रचार करण्यात वैदिक धर्मातल्या ज्ञानकांडी ब्राम्हणांनी नेहमीच पुढाकार घेतला होता. पण या समाजातल्या कर्मकांडी पुरोहितांचा जैन धर्माला नेहमीच विरोध राहिला आहे. त्यामुळं त्यांनी संपूर्ण हिंदू समाजात जैन धर्म आणि जैन तत्वज्ञानाविषयी गैरसमज पसरवण्याचे काम केलं. धार्मिक ग्रंथ, पोथ्या यांच्यात जैन विरोधी बराच मजकूर असतो. अशा ग्रंथांचे मोठ्या प्रमाणात वाचन होत असल्याने आणि त्यांना तत्वज्ञान या विषयात रस नसल्याने ‘श्रद्दाळू’ वाचकांच्या मनात आपोआपच जैन धर्मविरोधी मत तयार होते.

दुसरीकडे तथाकथित बहुजन समाज वैदिक ब्राम्हणांच्या सरसकट विरोधात असतो, पण त्यालाही जैन धर्म आणि तत्वज्ञान नकोसे असते. बहुजनवाद हा साम्यवाद आणि तथाकथित पुरोगामीपणा यांना बळी पडलेला आहे, त्यामुळं या लोकांना ‘धर्म’ ही संकल्पनाच मान्य नाही. त्यांच्यासाठी ‘सब घोडे बारा टक्के’ सारखं सगळेच धर्म त्याज्य असतात आणि त्यामुळं ते धर्मांच्या विरोधात बोलत असतात. (पण गम्मत त्यांना बौद्ध धर्म ‘आपला’ वाटतो).

महाराष्ट्रातील बहुतांश लोकांना लोकांना जैन धर्म म्हणजे गुजराती-मारवाडी व्यापाऱ्यांचा धर्म वाटतो. हे म्हणजे सगळ्या दक्षिण भारतीयांना मद्रासी म्हणण्यासारखेच आहे. असो. त्यांच्या दृष्टीने गुजराती-मारवाडी हे परप्रांतीय असल्याने जैन धर्म हा परप्रांतीयांचा धर्म असेही त्यांना वाटत असणार. त्यामुळे परप्रांतीयांचा द्वेष करणारे जैन धर्माचाही द्वेष करतात. ( गुजराती-मारवाडी समाजास आणखी किती काळ परप्रांतीय समजणार हाही एक मोठा प्रश्नच आहे).

उत्तर भारतातील ब्राम्हण, रजपूत, जाट, खत्री, गुर्जर, यादव या समाजात जैन धर्माबद्दल जो आदर आहे तो महाराष्ट्रात दिसत नाही.

खरं म्हणजे महाराष्ट्र आणि जैन धर्म यांचा संबंध प्राचिन काळापासून आहे. महाराष्ट्रातला पहिला शिलालेख पुणे जिल्ह्यातील कामशेत जवळच्या पाले या गावाजवळ आहे. प्राकृत भाषेतला हा जैन शिलालेख  किमान 2 हजार वर्षे जुना आहे. मराठी भाषेतला पहिला शिलालेख हाही एक जैन शिलालेख आहे, जो ई.स. 981 मध्ये लिहिला गेला. हा शिलालेख कर्नाटकातल्या श्रवणबेळगोळ येथे आहे. प्राचिन मराठी साहित्य (मरहट्टी भाषा) हे बहुतांशी जैन साहित्य आहे. (प्राचिन काळी वैदिकांनी आणि बौद्धांनीही मरहट्टी भाषेत लिहिले नाही, ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे). त्यामुळं मराठीपणाचा पहिला मान जैन धर्मियांकडेच जातो.

महाराष्ट्रात लोकप्रिय असणाऱ्या वारकरी आणि महानुभाव या दोन्ही संप्रदायांवर जैन धर्माचा मोठा प्रभाव आहे.
महाराष्ट्रावर प्राचिन काळापासून 13-14 व्या शतकापर्यंत ज्या सातवाहन, कलचुरी, कदंब, चालुक्य, शिलाहार, रट्ट, यादव वगैरे राजघराण्यांनी राज्य केले त्या सर्व राजघराण्यांवर जैन धर्माचा मोठा प्रभाव होता. या प्रत्येक राजघराण्याच्या इतिहास वाचल्यास तो प्रभाव स्पष्ट दिसून येतो.

असे असताना केवळ पूर्व गृहीत दृष्टीकोणातून जैन धर्माबद्दल परकेपण ठेवणे योग्य नाही.

माझ्या एका विद्वान मित्राने माझ्याशी बोलताना जैन धर्माचा उल्लेख ‘तुमचा जैन धर्म’ असा केला. मी त्याला म्हणालो, ‘आमचा? तो आमचा नाही, तुमचाच आहे. तुम्हाला तो सांभाळता आला नाही आणि सांभाळायचा नाही म्हणून सध्या तो आम्ही सांभाळतो’

असो.

हेही वाचा:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular Posts

कृपया हे पेज लाईक करावे