सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

Friday, March 31, 2017

जैन आणि हिंदू

-महावीर सांगलीकर
samdolian@gmail.com 

हिंदू समाजातील बरेच लोक जैन म्हणजे कुणी परके लोक समजतात. परके म्हणजे परप्रांतीय आणि परधर्मीय. दुसरीकडे जैन समाजातले बरेच लोक हिंदू म्हणजे कुणीतरी वेगळे लोक असून आपण हिंदू नाही असे मानतात. या दोन्ही प्रकारच्या लोकांमध्ये धर्म, इतिहास आणि समाज यांच्याविषयी प्रचंड अज्ञान आहे आणि त्यातूनच त्यांच्यात एकमेकांविषयी परकेपणाची भावना आलेली आहे.
 
खरं म्हणजे जैन आणि हिंदू हे कांही वेगवेगळ्या वंशांचे लोक नाहीत. ते एकाच रक्ताचे लोक आहेत. उदाहरण म्हणजे हिंदू समाजातील राजपूत आणि जैन समाजातील ओसवाल हे एकच लोक आहेत. त्यांच्या मूळ कुळ्या समान आहेत. तीच गोष्ट जैन समाजातील खंडेलवाल, पोरवाल, हुमड अशा अनेक जातींची. हे आणि राजपूत लोक मुळात एकच आहेत. त्याचा लिखित इतिहासही उपलब्ध आहे. राजस्थानमधील जवळपास प्रत्येक किल्ल्यावर राजघराण्याशी संबंधित जैन आणि शिवमंदिरे आहेत. याचं कारण म्हणजे बहुतेक सर्व राजपूत घराण्यांमध्ये जैन आणि शैव हे दोन्ही धर्म पाळले जायचे. महाराष्ट्रातही राष्ट्र्कूट, चालुक्य, शिलाहार, यादव या राजघराण्यात जैन आणि शैव हे दोन्ही धर्म पाळले जायचे.

अगदी महाभारतकाळात जायचं तर कृष्ण आणि जैन धर्मियांचे 22वे तीर्थंकर नेमिनाथ हे सख्खे चुलतभाऊ होते. जैन धर्मात, साहित्यात कृष्णाला मोठे स्थान आहे. तसेच महत्वाचे स्थान रामालाही आहे.

महाराष्ट्रातील मराठा, लिंगायत आणि इथल्या चतुर्थ, पंचम या जैन जातींचाही जवळचा संबंध आहे. दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक या भागात जैन समाजात चतुर्थ आणि पंचम या जाती आहेत तशाच त्या लिंगायत समाजातही आहेत. जैन चतुर्थ आणि लिंगायत चतुर्थ, जैन पंचम आणि लिंगायत पंचम हे मुळचे एकच आहेत. त्यांच्या वंशावळी तपासल्या तर ही गोष्ट स्पष्टपणे दिसून येते.

इथं मी तुम्हाला एक मोठं उदाहरण देतो. महाराष्ट्रातल्या खेडोपाडी ज्यांनी शिक्षण नेलं, ते कर्मवीर भाऊराव पाटील हे जैन होते. सांगली जिल्ह्यातलं ऐतवडे हे त्यांचं गाव. भाऊराव पाटलांची जी वंशावळ उपलब्ध आहे त्यातून हे स्पष्ट दिसतं की त्यांचे पूर्वज कर्नाटकातल्या विजापूर जिल्ह्यातनं कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा इथं आले. ते एका वतनदार जैन धर्मीय देसाई घराण्यातले तीन भाऊ होते. त्यांच्यापैकी मोठ्या भावाने पन्हाळा इथली पाटीलकी मिळवली. मधला भाऊ सांगली जिल्ह्यातल्या ऐतवडे इथं आला आणि त्यानं तिथली पाटीलकी मिळवली. तिसरा भाऊ सातारा जिल्ह्यातल्या कराडजवळील येळगाव इथं आला आणि त्याला तिथली पाटीलकी मिळाली. आज भाऊरावांचे पन्हाळा इथले भाऊबंद लिंगायत आहेत, ऐतवडे इथले जैन आहेत, तर येळगावचे भाऊबंद मराठा आहेत. हे कांही एकमेव उदाहरण नाही. वंशावळी सांगणाऱ्या हेळव्यांच्या रेकॉर्डमध्ये अशी अनेक उदाहरणे सापडतात.

दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात जैनांचं लिंगायत होणं आणि लिंगायतांचं जैन होणं ही प्रक्रिया  13 व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत चालू होती. एकाच घरात एक भाऊ जैन आणि दुसरा भाऊ लिंगायत हा प्रकार 19व्या शतकाच्या शेवटापर्यंत दिसून येई. उत्तरेत आगरवाल समाजाच्या बाबतीतही असंच घडलं. आगरवाल समाजात जैन आणि हिंदू (वैष्णव) हे दोन भेद आहेत आणि त्यांच्यात आजही सर्रास लग्नसंबंध होत असतात.

महाराष्ट्रातलं आणखी एक उदाहरण म्हणजे कासार समाज. महाराष्ट्रात कासार समाजात त्वष्टा कासार, जैन कासार आणि सोमवंशी क्षत्रिय कासार हे तीन प्रकार आहेत. यातील त्वष्टा कासार व सो. क्ष. कासार हे हिंदू धर्मीय आहेत, तर जैन कासार हे जैन धर्मीय आहेत.  जैन कासार आणि सोमवंशी क्षत्रिय कासार यांच्यात धर्म वेगळे असूनही सर्रास लग्नसंबंध होतात. पण विशेष म्हणजे त्वष्टा कासार व सो. क्ष. कासार हे एकाच धर्माचे असूनही त्यांच्यात लग्नसंबंध होत नाहीत.

आज जैन धर्मियांचे भारतभरात किमान 20 हजार मुनी, साधू आहेत. त्यांच्यात जन्मानं हिंदू असणाऱ्या आणि जैन मुनिदिक्षा घेतलेल्या साधूंची संख्या प्रचंड मोठी आहे. यात अगदी नेपाळमधले साधूही आहेत. पंजाब, हरियाना, राजस्थान, उत्तर प्रदेश या भागात मोठ्या संख्येनं असलेल्या जाट आणि खत्री समाजातून जैन धर्माचे अनेक महान साधू झालेले आहेत. जन्मानं हिंदू असणाऱ्या पण जैन मुनी दीक्षा घेतलेल्या अनेक साधूंचे जैन धर्म प्रसारातलं योगदानही मोठं आहे. दुसरीकडं वैष्णव साधूंमध्ये जन्मानं जैन असलेले अनेक साधू आहेत.  

आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जैन आणि हिंदू या दोन्ही धर्मांचा एकमेकांवर मोठा प्रभाव आहे. आणि महत्वाचं म्हणजे या दोन्ही धर्मांचे अनुयायी मुळात एकमेकांचे भाऊबंदच आहेत. त्यांची संस्कृती एकाच आहे. त्यांचा इतिहास एकमेकांशी निगडीत आहे, अनेक ठिकाणी तो एकच आहे.

हेही वाचा:

No comments:

माझे नवीन लेख मिळवण्यासाठी आपली इमेल नोंद करा..

शोध आणि बोध LATEST

कृपया हे पेज लाईक करावे