सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

गुरुवार, १८ सप्टेंबर, २०१४

मदुराईचे हत्याकांड

-महावीर सांगलीकर


आजच्याप्रमाणे प्राचीन भारतातही  धार्मिक कारणावरून हिंसक संघर्ष घडत असत. या संघर्षाला जैन-बौद्ध, शैव-बौद्ध, शैव-जैन, शैव-वैष्णव, जैन-वैष्णव असे अनेक पदर असत.

ब-याचदा या संघर्षाची सुरवात तात्विक चर्चेतून होत असे. दोन धर्माच्या आचार्यांमध्ये धर्मचर्चा, वाद होत असे, आणि ज्या धर्माचे आचार्य त्यात हरायचे, त्यांना आपला धर्म सोडून जिंकणा-या आचार्यांचा धर्म स्वीकारावा लागे. तोही एकट्याने नाही, तर आपल्या अनुयायांसकट. जर त्यांनी तो धर्म स्वीकारायला नकार दिला तर त्यांना तो प्रदेश सोडून जावा लागे.

अशा संघर्षातून कित्येकदा हरणा-या आचार्यांच्या धर्माच्या अनुयायांची हत्याकांडे होत. अशा हत्याकांडामध्ये  तमिळनाडूतील मदुराई येथे सातव्या शतकात शैवांनी केलेले जैनांचे हत्याकांड हे एक भयानक हत्याकांड मानले जाते.

जैन धर्माने इसवी सन पूर्व 3-या शतकात दक्षिण भारतात प्रवेश केला आली कांही शतकातच तो कर्नाटक आणि तमिळनाडूचा मुख्य धर्म बनला. तमिळनाडूत इसवी सनाच्या सातव्या शतकापर्यंत जैन धर्म लोकधर्म आणि आणि अनेक राजघराण्यांचा धर्म होता.   

सातव्या शतकात तमिळनाडूच्या राजकीय, आर्थिक आणि सांकृतिक क्षेत्रात जैन धर्माचे वर्चस्व स्थापित झाले होते. याच शतकातील शैव राजा कून पांडियन याने शैव धर्माचा त्याग करून जैन धर्म स्वीकारला. या घटनेने त्याची राणी मंगाईअरक्करसी आणि राजाचा मंत्री कुलचिराई नयनार हे दोघेही अस्वस्थ झाले. ते दोघे कट्टर शैव होते. जैन धर्माच्या वाढत्या प्रभावाला शह देण्यासाठी त्या दोघांनी संबदर या प्रसिद्ध शैव आचार्यांना मदुराईत बोलावून घेतले. संबंदर हे फारच प्रभावी शैव आचार्य होते. तमिळनाडूतून बौद्ध धर्म संपवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता.

संबंदर यांनी चमत्कारांचा उपयोग करत शैव धर्म जैन धर्मापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे राजा कून पांडियन याला दाखवून दिले. त्यामुळे कून पांडियन याने जैन धर्माचा त्याग केला आणि तो पुन्हा शैव झाला. त्याच बरोबरोबर त्याने मदुराई येथील जैनांना शैव होण्याचा आदेश दिला. त्यावेळी मदुराई येथे आठ हजार जैन रहात होते. त्यांनी शैव होण्यास नकार दिल्याने राजाने त्यांचे हत्याकांड करण्याचा आदेश दिला. त्यानुसार मदुराईतील सगळ्या जैनांना ठार करण्यात आले.

या हत्याकांडाची आठवण म्हणून मदुराईच्या मंदिरात हत्याकांडाची चित्रे कोरण्यात आली आहेत. या मंदिरात दरवर्षी हत्याकांडाचा सणही साजरा केला जातो.

हे हत्याकांड खरेच घडले काय?
पण असे हत्याकांड खरेच घडले काय? बहुतेक सगळे इतिहास संशोधक असे हत्याकांड झालेच नाही या मताचे आहेत. त्याचे कारण म्हणजे सातव्या शतकात घडलेल्या या कथित हत्याकांडाचे वर्णन पहिल्यांदा
12व्या शतकातल्या पेरियपुराणम या शैव पुराणात येते. त्यानंतर लिहिल्या गेलेल्या कांही शैव पुराणात याच प्रकारचे वर्णन येते. म्हणजे अशा प्रकारचे वर्णन हे कथ्तीत घटनेच्या नंतर तब्बल 500 वर्षांनी आणि त्यानंतर लिहिले गेले आहे. या हत्याकांडाला कोणताही समकालीन साहित्यिक किंवा शिलालेखीय पुरावा नाही. तसेच या घटनेला दुजोरा देणारे वर्णन जैनांच्या किंवा वैष्णवांच्या समकालीन किंवा उत्तरकालीन साहित्यात सापडत नाही. असे हत्याकांड, तेही राजाच्या आदेशाने होणेही शक्य नव्हते. कारण त्याकाळी धर्म म्हणजे बंदिस्त समाज झालेले नव्हते, आणि एकाच घरात वेग वेगळ्या धर्माचे अनुयायी असत आणि ते गुण्या गोविंदाने रहात असत.

पुराणे फारसा विश्वास ठेवण्याजोगी नसतात. त्यात एखाद्या घटनेचे अतिरंजित वर्णन केले गेलेले असते, आणि आपल्या पंथाला श्रेष्ठ ठरवण्यासाठी, दुस-या धर्माचा द्वेष करण्यासाठी, त्या धर्मावर राग काढण्यासाठी अनेक काल्पनिक कथा लिहिल्या जातात. त्यात शत्रूचे, म्हणजे दुस-या धर्माचे वाईट चित्र रंगवले जाते, आणि कोणीतरी अवतार घेऊन शत्रूचा कसा नायनाट केला याचे रसभरीत वर्णन केले जाते. यामागचा मुख्य उद्देश आपले अनुयायी दुस-या धर्माकडे वळू नयेत हाच असतो. बहुतेक सगळी पुराणे याच प्रकारची असतात.

आपला धर्म श्रेष्ठ ठरवण्यासाठी अशा प्रकारचे साहित्य केवळ शैवानीच लिहिलेले नाही, तर वैष्णव, जैन आणि बौद्ध यांनीही काल्पनिक घटनांचा आधार घेऊन या प्रकारच्या कथा लिहिलेल्या दिसतात.

माझी ‘दिशाची गोष्ट’ या दीर्घ कथेमध्ये दक्षिण भारतातील शैव-जैन-वैष्णव यांच्यातील धार्मिक संघर्षाचे वर्णन विस्ताराने आले आहे. त्याकाळची धार्मिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे आकलन होण्यासाठी त्या कथेचे पुढील दोन भाग वाचावेत:

दिशाचा पहिला जन्म 
राणी निर्भयाचे संघर्षमय जीवन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular Posts

कृपया हे पेज लाईक करावे