सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

Sunday, June 23, 2013

पुस्तक परिचय :जैन आणि हिंदु

-मधुकर जाधव


आपल्या देशातील काही विशिष्ट लोक स्वातंत्र्यापूर्वी व नंतरही आजअखेर आपल्या भारत देशाला ‘हिंदुस्तान’ म्हणतात. इस्लाम व ख्रिश्चनधर्मीय वगळून इतर सारे हिंदुधर्मीय आणि म्हणून ‘हिंदूंचा तो हिंदुस्तान’ असा
प्रचार-प्रसार करतात .स्वतःला  ‘हिंदुत्ववादी’ म्हणवून घेतात. वास्तवात मात्र ते कट्टर वैदिकवादी असतात. हिंदुत्वाच्या आडून ते वैदिकवाद जोपासतात. अनेक विचारवंत, समाजसुधारक, लेखकांनी वैदिकवाद्यांच्या या
कट-कारस्थानांचा वेळोवेळी खरपूस समाचार घेतलेला  आहे.

सावरकरांनी फेब्रुवारी १९३६ च्या किर्लोस्कर मासिकात “जैन हे हिंदूच आहेत,पण कोणत्या अर्थी?” या मथळ्याखाली लेख लिहून ‘जैन हे हिंदूच आहेत’, असे  भासविण्याचा प्रयत्न केला होता. सावरकरांचा हा लेख, हिंदु महासभा व त्यावेळच्या वैदिकवाद्यांच्या प्रचाराला प्रत्युत्तर म्हणून ‘आत्ताचे हिंदू हेच एकेकाळी जैन कसे होते’, हा इतिहास सांगण्यासाठी ब्राम्हणेतर चळवळीतील सुप्रसिद्ध लेखक तात्या केशव चोपडे यांनी ‘जैन आणि हिंदु’ हे पुस्तक लिहिले होते. हे दुर्मिळ पुस्तक नुकतेच मला वाचायला मिळाले.

लेखकाने या  पुस्तकात वैदिकांवर प्रचंड टीका केलेली आहे.‘हिंदु म्हणजे वैदिक आणि वैदिक म्हणजे ब्राह्मण अशी एक सांगड आहे म्हटल्यास अतिशयोक्ती होत नाही’. (पान ४) असा खुलासा देवून, वैदिक व इतर हिंदु असा भेद करून, केलेल्या टीकेबद्दल विचारी हिंदु दोष देणार नाहीत अशी अपेक्षा बाळगली आहे. प्रास्ताविकात धर्मदृष्ट्या जैन व वैदिक हे पूर्णतः वेगळे असून त्यांच्यात प्रकाश आणि अंधार किंवा आकाश आणि पाताळ  इतका फरक असल्याचे स्पष्ट केले आहे. वैदिकांनी भूतकाळात केलेला जैनांचा छळ व रक्तपात ऐतिहासिक दाखले देवून सांगितला आहे व जैन हे स्वत:ला कधीही हिंदु म्हणवून घेणार नाहीत, असा इशारा दिला आहे.

लेखकाने जैन व अवैदिक हिंदु यांचे एकत्व स्पष्ट  करताना मराठे क्षत्रिय, रजपूत क्षत्रिय, लिंगाईत, गुजराथी हिंदु,  गंगादिकार, महानुभाव, हिंदु कलार, सराक, हिंदु लाड, हिंदु भावसार, हिंदु नागर, हिंदु अग्रवाल, हिंदु सादरु, रडडी हिंदु, हिंदु कासार, हिंदु वाणी, हिंदु श्रीमाळी,चौधरी, नैनार, साळी, विसनवी(वैष्णव), वंजारी, भाटे, लुणावा, वाणिया, मणियार इत्यादी अनेक जाती-पोटजातीचे, पंथांचे  लोक  हे मूळचे जैन असल्याचे उपलब्ध पुराव्यांच्या आधारे लिहिले आहे. तसेच ब्राह्मण हे ही एकेकाळी जैन होते दाखवले आहे.

 'हिंदुस्तानातील दोन महत्वाच्या जाती राजपूत आणि मराठे. आणि दहाव्या शतकापर्यंत तरी या दोन्ही जाती पूर्ण जैन धर्मीय होत्या असे अनेक ऐतिहासिक पुरावे मिळतात' असे लेखकाने या पुस्तकात लिहिले आहे, आणि या दोन्ही जातींच्या जैनत्वाची विस्ताराने चर्चा केली आहे. मराठे हे मूळचे जैनधर्मीय असल्याचे इश्वाकू (सूर्यवंशी), यदु(यादव), कदंब (कदम), परमार (पवार), चौहान (चव्हाण), छिन्द्रक (शिंदे), शिलाहार (शेलार) इ. राजकुळे व सध्याची आडनावे यांच्या आधारे दाखवून दिलेले आहे. ना.भास्करराव जाधव, रामशास्त्री भागवत, बिर्जे, धर्मानंद कोसंबी, सरदेसाई व इतरांच्या संदर्भावरून मराठे जैन असल्याचे मांडले आहे. लिंगायत व जैन यांचा सोयरसंबंध ही पाटील, देसाई, देशमुख, मगदूम, खोत,चौगुले इ. वतनदारांच्या पाहुणपणावरून दाखविला आहे. दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील मराठा, लिंगायत, जैन हे मूळचे एकच आहेत असे लेखकाने हेळव्यांचे (वंशावळी सांगणारे लोक) दाखले देवून दाखवून दिले आहे. येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे उदाहरण आपल्यापुढे आहे. कर्मवीरांचे काही भाऊबंद मराठा, काही भाऊबंद लिंगायत तर काही भाऊबंद जैन असल्याचे बा.ग. पवार यांनीही कर्मवीरांच्या चरित्रात लिहिलेले आहेच.

या पुस्तकाचे सर्वात मोठे यश म्हणजे लेखकाने पुराव्यांच्या आधारे आत्ताचे हिंदु एकेकाळी जैन होते, याची आक्रमकपणे केलेली  मांडणी  हे होय. अनेक कारणांनी भारताचा इतिहास एकांगी लिहिला गेला आहे. संशोधकांनी अजूनही ऐतिहासिक लेखन करताना अपवाद वगळता जैन ऐतिहासिक पुराव्यांची दखल घेतलेली नाही, हे अनाकलनीय आहे. ज्या कोणाला बहुजन हिंदुंचा मूळ धर्म  आणि भारताचा खरा इतिहास जाणून घ्यायचा आहे, त्यांनी तरी जैन साहित्याचा गांभीर्याने  अभ्यास करावा असे मला  वाटते.     

सदर पुस्तक वैदिकांच्या विरोधात लिहिले असले तरीही  वैदिक वगळून इतर हिंदुंचा मूळ धर्म जैन असल्याचे सांगण्यात लेखक यशस्वी झालेला आहे असे मला वाटते. हे पुस्तक प्रतिक्रियात्मक होते, पण यात मांडलेले मुद्दे आजही विचार करण्यासारखे आहेत. त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे. या निमित्ताने संशोधकांनी जैन धर्माचा इतिहासाच्या अंगाने अभ्यास केला पाहिजे.  विशेषतः मराठ्यांच्या शिवपूर्वकालीन इतिहासाचा अभ्यास करताना जैन ग्रंथांमध्ये, शिलालेखांमध्ये  विपुल संदर्भ सापडतील याचा मला विश्वास आहे. त्यासाठी सदरचे पुस्तक अभ्यासकांनी नक्की वाचावे असे मला वाटते.

(या दुर्मिळ पुस्तकाची झेरॉक्स कॉपी महावीर सांगलीकर यांच्याकडे उपलब्ध आहे, ज्या अभ्यासकांना हे पुस्तक पाहिजे असेल त्यांनी सांगलीकर यांच्याशी  jainway@gmail.com येथे संपर्क साधावा). 

जैन आणि हिंदु
लेखक: कीर्तनसम्राट तात्या केशव चोपडे.
प्रकाशक: श्रीवीर ग्रंथमाला, सांगली.
संपादक: आ.भा.मगदुम
दुसरी आवृत्ती १९४५


हेही वाचा:

ओ.बी.सी. आणि जैन धर्म
वारकरी संप्रदायाचे मूळ कोठे आहे?
राजपुतांच्या कांही कुळ्यांचे दक्खनी मूळ
मातंग समाज आणि जैन धर्म 

1 comment:

. said...

Jainavar atyachar zala yala manyach karat nahi vedik kiman online tari.

kadhi kadhi tar vay zaleli gruhasta mothya toryane jain(ani baudhahi) kase hin ahe, tyanna kase marale ani te barobar hote ase mothya kotukane bolat astat.

soft copy milel ka pustkachi?

dhanywad

माझे नवीन लेख मिळवण्यासाठी आपली इमेल नोंद करा..

शोध आणि बोध LATEST

कृपया हे पेज लाईक करावे