सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१३

शैव आणि जैन संबध: एक अवलोकन

-महावीर सांगलीकर 


प्राचीन भारतातील जैन, बौद्ध, शैव, वैष्णव हे सगळेच धर्म अनेकदा एकमेकांच्या विरोधात ठाकले होते. म्हणजे यातील कोणत्याही एका धर्माच्या विरोधात बाकीचे तीन धर्म बहुतेकदा असायचे. पण कधी-कधी यातील एखाद्या धर्माच्या विरोधात इतरांची कधी-कधी युतीही व्हायची. भारतातून बौद्ध धर्म हद्दपार होण्यात त्या धर्मातील अंतर्गत कारणे तर आहेतच, पण बौद्ध धर्माच्या विरोधात शैव आणि जैन यांनी केलेले कार्य हेही एक महत्वाचे कारण आहे.

जैन आणि शैव यांनी एकत्र येण्याचे कारण म्हणजे त्यांचे धर्म वेगळे असले तरी समाज म्हणून ते एक होते. बहुतेक राज्यकर्त्यांच्या घरात जैन आणि शैव हे दोन्ही धर्म असत. म्हणजे राजा शैव तर राणी जैन, राजा जैन तर राणी शैव. सेनापतीचा धर्म देखील या दोन पैकी एक असे, कारण तो एकतर राणीचा भाऊ असे अथवा राजाचा मामा. कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, चौहाण,  यादव, सिसोदिया अशा अनेक घराण्यांच्या बाबतीत हे दिसून येते. हे केवळ गृहस्थधर्माच्या बाबतीत नसून वरील घराण्यातून मोठमोठे जैन साधू व आचार्य होवून गेलेले दिसतात. उदाहरणार्थ, जैन धर्माचे ख्यातनाम आचार्य समंतभद्र हे कदंब घराण्यातील राजपुत्र होते. प्रसिद्ध राष्ट्रकूट सम्राट अमोघवर्ष हा देखील आयुष्याच्या शेवटच्या काळात जैन साधू झाला होता.

राजपुतान्यातील प्रत्येक किल्ल्यावर, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक येथील अनेक किल्ल्यांवर अनेक जैन मंदिरे दिसतात, त्याचे कारण त्या-त्या राज घराण्यात जैन धर्म होता हेच आहे.

याउलट या घराण्यांमध्ये बौद्ध धर्म असलेला अजिबात दिसत नाही. क्वचित कुणी बौद्ध लेण्यांना दान दिल्याची उदाहरणे दिसतात, पण त्यावरून त्या घराण्यात बौद्ध धर्म होता असे म्हणता येत नाही. या घराण्यांमधून बौद्ध साधू झाल्याचे उदाहरण दिसत नाही.

राजपुतांमध्ये जी अग्निकुळे म्हणून ओळखली जातात त्या चौहान, परमार, सोलंकी कुळात अगदी  आजही जैन आणि शैव हे दोन्ही धर्म दिसतात. अग्निकुळे ही ब्राम्हणांनी बौद्ध धर्माचा नाश करण्यासाठी निर्माण केलेली नवी क्षत्रिय कुळे होती अशी एक कथा आहे. ही भाकडकथा असली तरी या कुळांमध्ये बौद्ध धर्म नसणे आणि शैव, जैन हे दोन्ही धर्म असणे याला बराच कांही अर्थ आहे. 

जी गोष्ट राजघराण्यांची, तीच जनतेची. एकाच घरात जैन आणि शैव हे दोन्ही धर्म सुखाने रहात होते असे दिसते. उदाहरणासाठी, दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील जैन आणि वीरशैव लिंगायत  समाजातील चतुर्थ, पंचम या नावाने ओळखले जाणारे लोक हे मुळचे एकच आहेत. जैन पंचम आणि लिंगायत पंचम, जैन चतुर्थ आणि लिंगायत चतुर्थ  यांच्यात अगदी शंभर वर्षांपूर्वी पर्यंत लग्नसंबंध होत असत. तेराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत एक भाऊ जैन तर दुसरा लिंगायत असा प्रकार सर्रास दिसत असे.जैनाचे लिंगायत होणे किंवा लिंगायताचे  जैन होणेयात विशेष कांही नव्हते. हेळव्यांकडील रेकॉर्ड वरून दिसून येते कि या भागातील अनेक जैन पाटील आणि लिंगायत पाटील (कांही ठिकाणी मराठा पाटीलही) हे एकमेकांचे भाउबंद लागतात.

हा प्रकार केवळ उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्र यांच्यापुरता मर्यादित नाही. संपूर्ण दक्षिण भारतात तेराव्या शतकाच्याही  पूर्वी समाजात हीच गोष्ट दिसत असे. राजपुतान्यातील तर राजपूत आणि ओसवाल जैन हे एकाच रक्ताचे लोक आहेत.

यावरून असे दिसते कि बौद्ध धर्माच्या विरोधात शैव आणि जैन यांची छुपी किंवा  उघड युती झाली असावी. या संदर्भात इतिहास संशोधकांनी संशोधन करणे गरजेचे आहे.

शिवशंकर आणि जैन धर्म
बौद्ध धर्माने शिवाला नाकारले आहे. पण जैन धर्म शिवाला अजिबात नाकारत नाही. जैन धर्माचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव आणि शिव ही एकच व्यक्ती आहे असे जैन मानतात. शिव आणि ऋषभदेव यांच्यात आश्चर्यकारक साम्य स्थळे आहेत, त्याविषयी एक वेगळा लेख लिहावा लागेल. जैन स्तोत्र साहित्यात अनेक ठिकाणी शिवाची स्तुती केलेली दिसते.

शैव आणि जैन यांच्या सलोख्याचे एक मोठे उदाहरण म्हणजे कर्नाटकातील मेंगलोर जवळील धर्मस्थळ हे प्रसिद्ध शैव तीर्थक्षेत्र. येथे शिवाचे एक रूप असणा-या मंजुनाथाचे मंदिर आहे. हे शैव मंदिर असले तरी गेली कित्येक शतके या मंदिराचे धर्माधिकारी परंपरेने हेगडे या जैन घराण्यातील असतात. सध्याचे धर्माधिकारी पद्मभूषण डॉक्टर डी. वीरेंद्र हेगडे हे आहेत. हे ज्या बंट समाजातील आहेत, त्यात आजही शैव आणि जैन हे दोन्ही धर्म दिसतात. (हा बंट समाज आपण महाराष्ट्रात शेट्टी समाज म्हणून ओळखतो).

सतराव्या शतकात कर्नाटकात होवून गेलेली अब्बक्का ही राणी याच समाजाची होती. ती ज्या चौता घराण्यात जन्माला आली ते घराणे जैन होते, पण त्या घराण्याचे कुलदैवत हे सोमेश्वर (शंकर) हे होते. (या राणीच्या थक्क करणा-या पराक्रमाविषयी पोर्तुगीजांना हरवणारी पराक्रमी अब्बक्का राणी येथे वाचा). 

जैन-शैव संघर्ष
जैन आणि शैव सामाजिक दृष्ट्या एक असले तरी धार्मिक दृष्ट्या वेगळे होते. त्यामुळे कांही वेळा विशेषत: दक्षिण भारतात जैन आणि शैव यांचा अनेकदा संघर्ष झालेला दिसतो. पण या संघर्षाला शैव-वैष्णव, जैन-वैष्णव  किंवा शैव-बौद्ध संघर्षाएवढी धार नव्हती. शैव आणि बौद्ध हे सामाजिक दृष्ट्या पूर्ण वेगळे होते, तर शैव-वैष्णव संघर्ष हा प्र्रामुख्याने क्षत्रिय-ब्राम्हण संघर्ष होता. याउलट शैव-जैन संघर्ष हा अंतर्गत, भाऊबंदकी स्वरूपाचा होता.

पुढे जैन धर्म मागे पडल्यावर अनेक जैन मंदिरांचे रुपांतर जास्त करून  शैव मंदिरांमध्येच झाले याचे कारण देव आणि धर्म बदलला तरी लोक तेच होते हे आहे. 



हेही वाचा:
ज्यांचा-त्यांचा राम आणि रामायण
राजपुतांच्या कांही कुळ्यांचे दक्खनी मूळ
वीरगळ, जैनाचा धोंडा आणि असाही इतिहास

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular Posts

कृपया हे पेज लाईक करावे