सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.
बौद्ध धर्म लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बौद्ध धर्म लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २५ जानेवारी, २०१८

सम्राट अशोक आणि त्याचे बौद्ध धर्मांतर

-महावीर सांगलीकर

(हा लेख वाचताना वाचकांचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. मी मांडलेली मते अशोक नावाचा राजा होऊन गेला, असा राजा झालाच नाही, अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला, त्याने बौद्ध धर्म स्वीकारलाच नाही अशा परस्परविरोधी मतांवर आधारित आहे, हे लक्षात घेतले तर असा गोंधळ होणार नाही).  

सम्राट अशोक हा मौर्य घराण्यातील तिसरा सम्राट. तो मौर्य घराण्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याचा नातू आणि सम्राट बिंदुसाराचा मुलगा होता. 

अशोकाने शेजारच्या कलिंग देशावर आक्रमण केले. त्या युद्धात दोन्ही बाजूंचे लाखो सैनिक मारले गेले. त्यामुळे अशोकाला हिंसेचा प्रचंड तिटकारा आला आणि त्याने बौद्ध धर्म स्वीकारला असे मानले जाते.

पण कलिंगच्या युद्धाचा तिटकारा येऊन अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला ही माहिती केवळ बौध्द ग्रंथातच येते. याला अनुषंगिक असे इतर ऐतिहासिक पुरावे नाहीत. 

अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला हे सांगताना तो त्या अगोदर कोणता धर्म पाळत असे हे मात्र सांगितले जात नाही. अनेकांचा असा समज होवू शकतो की त्याने हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला. पण अशोकाच्या वेळी हिंदू नावाचा धर्मच अस्तित्वात नव्हता. मगध साम्राज्यातील त्यावेळचे धर्म म्हणजे जैन, बौद्ध, आजीवक, वैदिक वगैरे. अशोक अगोदर वैदिक असण्याचा प्रश्नच येत नाही, कारण मौर्य घराण्यातील एकाही सम्राटाने वैदिक धर्माला आपल्या वैयक्तिक जीवनात थारा दिल्याचे दिसत नाही. त्यामुळे बौद्ध धर्म स्वीकारण्याअगोदर अशोक जैन किंवा आजीवक या दोनपैकी एका धर्माचा अनुयायी होता असेच म्हणावे लागते.

पण माझे वरील मत अशोक हा राजा होवून गेला या मतानुसार आहे. प्रत्यक्षात अशोक नावाचा राजा होवून गेला आणि त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता याला बौद्ध साहित्याशिवाय दुसरा आधार नाही. ज्यांना अशोकाचे शिलालेख म्हंटले जाते, त्यापैकी एकाही शिलालेखात अशोक हे नाव येत नाही. त्या शिलालेखांनुसार ज्याने हे शिलालेख लिहिले त्या राजाचे नाव ‘देवानाम पियं पियदस्सी’ असे येते. आता जो धर्म देवच मानत नाही त्या धर्माचा अनुयायी स्वत:ला 'देवानाम पियं' असे कशाला म्हणवून घेईल? तरीही जे लोक पियदस्सीलाच अशोक मानतात, त्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की पियदस्सीच्या एकाही शिलालेखावरून त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता असे सिद्ध करता येत नाही.

शिवाय अशोकाचे म्हणून मानले जाणारे सगळेच शिलालेख एकाच काळातील व एकाच व्यक्तीने लिहिलेले आहेत असे मानायला आधुनिक इतिहासकार तयार नाहीत.

समकालीन आणि नंतरच्या जैन आणि वैदिक साहित्यात, तसेच समकालीन परदेशी प्रवाशांच्या प्रवास वर्णनात अशोकाचा उल्लेख येत नाही. अशोकाची कथा सर्वात आधी अशोकवदन या दुसऱ्या शतकात म्हणजे ‘मानलेल्या अशोकाच्या मानलेल्या काळाच्या’ 500वर्षानंतर लिहिलेल्या बौद्ध ग्रंथात येते. त्यानंतर ती 4थ्या शतकातील महावंश आणि 5व्या शतकातील दीपवंश या बौद्ध ग्रंथात येते.  हे ग्रंथ समकालीन नसल्याने आणि त्यातील माहितीला बाह्य पुरावे नसल्याने त्यावर विश्वास ठेवता येत नाही.

समकालीन अथवा नजीकच्या प्राचीन जैन व वैदिक साहित्यात अशोकाचा उल्लेख येत नाही. तत्कालीन ग्रीक स्रोत देखील सम्राट अशोकाचा उल्लेख करत नाहीत. 

अशोकाचे मानले गेलेल्या शिलालेखांमध्ये बौद्ध धम्म ऐवजी नुसताच धम्म हा मोघम शब्द का वापरला आहे? या शिलालेखांमध्ये धर्म, तत्वज्ञान या विषयी जे उल्लेख आहेत, ते बौद्ध धर्मापेक्षा जैन धर्माला जवळचे का आहेत?

माझ्यासारख्या अभ्यासकांना हे उलटे-सुलटे पडणारे गहन प्रश्न आहेत. त्याची उत्तरे व्यक्तिपूजा, धार्मिक अस्मिता यांना बळी पडलेले लोक देऊ शकत नाहीत. वाचकांनीच ठरवायचे आहे की काय खरे असावे आणि काय खोटे असावे!




हेही वाचा: 

शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१३

शैव आणि जैन संबध: एक अवलोकन

-महावीर सांगलीकर 


प्राचीन भारतातील जैन, बौद्ध, शैव, वैष्णव हे सगळेच धर्म अनेकदा एकमेकांच्या विरोधात ठाकले होते. म्हणजे यातील कोणत्याही एका धर्माच्या विरोधात बाकीचे तीन धर्म बहुतेकदा असायचे. पण कधी-कधी यातील एखाद्या धर्माच्या विरोधात इतरांची कधी-कधी युतीही व्हायची. भारतातून बौद्ध धर्म हद्दपार होण्यात त्या धर्मातील अंतर्गत कारणे तर आहेतच, पण बौद्ध धर्माच्या विरोधात शैव आणि जैन यांनी केलेले कार्य हेही एक महत्वाचे कारण आहे.

जैन आणि शैव यांनी एकत्र येण्याचे कारण म्हणजे त्यांचे धर्म वेगळे असले तरी समाज म्हणून ते एक होते. बहुतेक राज्यकर्त्यांच्या घरात जैन आणि शैव हे दोन्ही धर्म असत. म्हणजे राजा शैव तर राणी जैन, राजा जैन तर राणी शैव. सेनापतीचा धर्म देखील या दोन पैकी एक असे, कारण तो एकतर राणीचा भाऊ असे अथवा राजाचा मामा. कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, चौहाण,  यादव, सिसोदिया अशा अनेक घराण्यांच्या बाबतीत हे दिसून येते. हे केवळ गृहस्थधर्माच्या बाबतीत नसून वरील घराण्यातून मोठमोठे जैन साधू व आचार्य होवून गेलेले दिसतात. उदाहरणार्थ, जैन धर्माचे ख्यातनाम आचार्य समंतभद्र हे कदंब घराण्यातील राजपुत्र होते. प्रसिद्ध राष्ट्रकूट सम्राट अमोघवर्ष हा देखील आयुष्याच्या शेवटच्या काळात जैन साधू झाला होता.

राजपुतान्यातील प्रत्येक किल्ल्यावर, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक येथील अनेक किल्ल्यांवर अनेक जैन मंदिरे दिसतात, त्याचे कारण त्या-त्या राज घराण्यात जैन धर्म होता हेच आहे.

याउलट या घराण्यांमध्ये बौद्ध धर्म असलेला अजिबात दिसत नाही. क्वचित कुणी बौद्ध लेण्यांना दान दिल्याची उदाहरणे दिसतात, पण त्यावरून त्या घराण्यात बौद्ध धर्म होता असे म्हणता येत नाही. या घराण्यांमधून बौद्ध साधू झाल्याचे उदाहरण दिसत नाही.

राजपुतांमध्ये जी अग्निकुळे म्हणून ओळखली जातात त्या चौहान, परमार, सोलंकी कुळात अगदी  आजही जैन आणि शैव हे दोन्ही धर्म दिसतात. अग्निकुळे ही ब्राम्हणांनी बौद्ध धर्माचा नाश करण्यासाठी निर्माण केलेली नवी क्षत्रिय कुळे होती अशी एक कथा आहे. ही भाकडकथा असली तरी या कुळांमध्ये बौद्ध धर्म नसणे आणि शैव, जैन हे दोन्ही धर्म असणे याला बराच कांही अर्थ आहे. 

जी गोष्ट राजघराण्यांची, तीच जनतेची. एकाच घरात जैन आणि शैव हे दोन्ही धर्म सुखाने रहात होते असे दिसते. उदाहरणासाठी, दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील जैन आणि वीरशैव लिंगायत  समाजातील चतुर्थ, पंचम या नावाने ओळखले जाणारे लोक हे मुळचे एकच आहेत. जैन पंचम आणि लिंगायत पंचम, जैन चतुर्थ आणि लिंगायत चतुर्थ  यांच्यात अगदी शंभर वर्षांपूर्वी पर्यंत लग्नसंबंध होत असत. तेराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत एक भाऊ जैन तर दुसरा लिंगायत असा प्रकार सर्रास दिसत असे.जैनाचे लिंगायत होणे किंवा लिंगायताचे  जैन होणेयात विशेष कांही नव्हते. हेळव्यांकडील रेकॉर्ड वरून दिसून येते कि या भागातील अनेक जैन पाटील आणि लिंगायत पाटील (कांही ठिकाणी मराठा पाटीलही) हे एकमेकांचे भाउबंद लागतात.

हा प्रकार केवळ उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्र यांच्यापुरता मर्यादित नाही. संपूर्ण दक्षिण भारतात तेराव्या शतकाच्याही  पूर्वी समाजात हीच गोष्ट दिसत असे. राजपुतान्यातील तर राजपूत आणि ओसवाल जैन हे एकाच रक्ताचे लोक आहेत.

यावरून असे दिसते कि बौद्ध धर्माच्या विरोधात शैव आणि जैन यांची छुपी किंवा  उघड युती झाली असावी. या संदर्भात इतिहास संशोधकांनी संशोधन करणे गरजेचे आहे.

शिवशंकर आणि जैन धर्म
बौद्ध धर्माने शिवाला नाकारले आहे. पण जैन धर्म शिवाला अजिबात नाकारत नाही. जैन धर्माचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव आणि शिव ही एकच व्यक्ती आहे असे जैन मानतात. शिव आणि ऋषभदेव यांच्यात आश्चर्यकारक साम्य स्थळे आहेत, त्याविषयी एक वेगळा लेख लिहावा लागेल. जैन स्तोत्र साहित्यात अनेक ठिकाणी शिवाची स्तुती केलेली दिसते.

शैव आणि जैन यांच्या सलोख्याचे एक मोठे उदाहरण म्हणजे कर्नाटकातील मेंगलोर जवळील धर्मस्थळ हे प्रसिद्ध शैव तीर्थक्षेत्र. येथे शिवाचे एक रूप असणा-या मंजुनाथाचे मंदिर आहे. हे शैव मंदिर असले तरी गेली कित्येक शतके या मंदिराचे धर्माधिकारी परंपरेने हेगडे या जैन घराण्यातील असतात. सध्याचे धर्माधिकारी पद्मभूषण डॉक्टर डी. वीरेंद्र हेगडे हे आहेत. हे ज्या बंट समाजातील आहेत, त्यात आजही शैव आणि जैन हे दोन्ही धर्म दिसतात. (हा बंट समाज आपण महाराष्ट्रात शेट्टी समाज म्हणून ओळखतो).

सतराव्या शतकात कर्नाटकात होवून गेलेली अब्बक्का ही राणी याच समाजाची होती. ती ज्या चौता घराण्यात जन्माला आली ते घराणे जैन होते, पण त्या घराण्याचे कुलदैवत हे सोमेश्वर (शंकर) हे होते. (या राणीच्या थक्क करणा-या पराक्रमाविषयी पोर्तुगीजांना हरवणारी पराक्रमी अब्बक्का राणी येथे वाचा). 

जैन-शैव संघर्ष
जैन आणि शैव सामाजिक दृष्ट्या एक असले तरी धार्मिक दृष्ट्या वेगळे होते. त्यामुळे कांही वेळा विशेषत: दक्षिण भारतात जैन आणि शैव यांचा अनेकदा संघर्ष झालेला दिसतो. पण या संघर्षाला शैव-वैष्णव, जैन-वैष्णव  किंवा शैव-बौद्ध संघर्षाएवढी धार नव्हती. शैव आणि बौद्ध हे सामाजिक दृष्ट्या पूर्ण वेगळे होते, तर शैव-वैष्णव संघर्ष हा प्र्रामुख्याने क्षत्रिय-ब्राम्हण संघर्ष होता. याउलट शैव-जैन संघर्ष हा अंतर्गत, भाऊबंदकी स्वरूपाचा होता.

पुढे जैन धर्म मागे पडल्यावर अनेक जैन मंदिरांचे रुपांतर जास्त करून  शैव मंदिरांमध्येच झाले याचे कारण देव आणि धर्म बदलला तरी लोक तेच होते हे आहे. 



हेही वाचा:
ज्यांचा-त्यांचा राम आणि रामायण
राजपुतांच्या कांही कुळ्यांचे दक्खनी मूळ
वीरगळ, जैनाचा धोंडा आणि असाही इतिहास

गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१३

सम्राट अशोक आणि त्याचे बौद्ध धर्मांतर


-महावीर सांगलीकर 

सम्राट अशोक हा मौर्य घराण्यातील तिसरा सम्राट. तो मौर्य घराण्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याचा नातू होता. अशोकाने शेजारच्या कलिंग देशावर आक्रमण केले. त्या युद्धात दोन्ही बाजूंचे लाखो सैनिक मारले गेले. त्यामुळे अशोकाला हिंसेचा प्रचंड तिटकारा आला आणि त्याने बौद्ध धर्म स्वीकारला असे मानले जाते.

अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला हे सांगताना तो त्या अगोदर कोणता धर्म पाळत असे हे मात्र सांगितले जात नाही. अनेकांचा असा समज होवू शकतो की त्याने हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला. पण अशोकाच्या वेळी हिंदू नावाचा धर्मच अस्तित्वात नव्हता. मगध साम्राज्यातील त्यावेळचे धर्म म्हणजे जैन, बौद्ध, आजीवक, वैदिक वगैरे. अशोक अगोदर वैदिक असण्याचा प्रश्नच येत नाही, कारण मौर्य घराण्यातील एकाही सम्राटाने वैदिक धर्माला आपल्या वैयक्तिक जीवनात थारा दिल्याचे दिसत नाही. त्यामुळे बौद्ध धर्म स्वीकारण्याअगोदर अशोक जैन किंवा आजीवक या दोनपैकी एका धर्माचा अनुयायी होता असेच म्हणावे लागते.

पण माझे वरील मत अशोक हा राजा होवून गेला या मतावर आहे. प्रत्यक्षात अशोक नावाचा राजा होवून गेला आणि त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता याला बौद्ध साहित्याशिवाय दुसरा आधार नाही. ज्यांना अशोकाचे शिलालेख म्हंटले जाते, त्यापैकी एकाही शिलालेखात अशोक हे नाव येत नाही. त्या शिलालेखांनुसार ज्याने हे शिलालेख लिहिले त्या राजाचे नाव उपाधी म्हणून देवानाम पियं पियदस्सी असे येते. आता जो धर्म देवच मानत नाही त्या धर्माचा अनुयायी स्वत:ला 'देवानाम पियं' असे कशाला म्हणवून घेईल? तरीही जे लोक पियदस्सीलाच अशोक मानतात, त्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की पियदस्सीच्या एकाही शिलालेखावरून तो बौद्ध होता असे सिद्ध करता येत नाही.

शिवाय अशोकाचे म्हणून मानले जाणारे सगळेच शिलालेख एकाच काळातील व एकाच व्यक्तीने लिहिलेले आहेत असे मानायला आधुनिक इतिहासकार तयार नाहीत.

समकालीन आणि नंतरच्या जैन आणि वैदिक साहित्यात, तसेच समकालीन परदेशी प्रवाशांच्या प्रवास वर्णनात अशोकाचा उल्लेख येत नाही. अशोकाची कथा सर्वात आधी अशोकवदन या दुस-या शतकात म्हणजे मानलेल्या अशोकाच्या मानलेल्या काळाच्या 500वर्षानंतर लिहिलेल्या बौद्ध ग्रंथात येते. त्यानंतर ती 4थ्या शतकातील महावंश आणि 5व्या शतकातील दीपवंश या बौद्ध ग्रंथात येते.  हे ग्रंथ समकालीन नसल्याने आणि त्यातील माहितीला बाह्य पुरावे नसल्याने त्यावर विश्वास ठेवता येत नाही.

हेही वाचा:

बौद्ध धर्मातील ब्राम्हण
ज्यांचा-त्यांचा राम आणि रामायण
भारतीयांचा इतिहासबोध

रविवार, २५ नोव्हेंबर, २०१२

जैन आणि बौद्ध धर्माचे मूळ श्रमण परंपरेत

-महावीर सांगलीकर

जैन आणि बौद्ध हे दोन्ही धर्म वैदिक धर्माच्या विरोधासाठी निर्माण झाले असा कित्येकांचा समज आहे. पण जैन धर्माचे मूळ सिंधू संस्कृतीत असल्याने तो वैदिक धर्माच्या ही आधी अस्तित्वात होता, आणि सिंधू संकृती ही वैदिकांचा सर्वात प्राचीन ग्रंथ ऋग्वेदाच्या रचनेच्या आधीपासून अस्तित्वात असल्याने  वैदिक धर्माच्या विरोधासाठी जैन धर्माचा जन्म झाला असे म्हणणे चुकीचे ठरते. तीच गोष्ट बौद्ध धर्माची. बौद्ध धर्माची स्थापना गौतम बुद्ध यांनी वैदिक विरोधात केली असे कोणत्याही बौद्ध ग्रंथात, बुद्धचरित्रात लिहिलेले नाही.

वैदिक धर्मातील यज्ञामध्ये होणारी पशुहिंसा जैन आणि बौद्ध या दोन्ही धर्मास मान्य नव्हती. त्यामुळे या दोन्ही धर्माच्या आचार्यांनी यज्ञातील पशुहिंसेला प्रचंड विरोध केला. पण याचा अर्थ असा होत नाही की जैन आणि बौद्ध हे धर्म वैदिक धर्माच्या विरोधातून जन्माला आले.

जैन आणि बौद्ध हे धर्म वैदिक धर्माच्या विरोधातील बंडातून जन्माला आले असे म्हणणे म्हणजे या दोन्ही धर्माचे मूळ वैदिक धर्मात आहे असे म्हणण्यासारखे आहे. पण वैदिक धर्म अस्तित्वात यायच्या अगोदर पासून या देशात श्रमण परंपरा अस्तित्वात होती आणि जैन आणि बौद्ध हे दोन्ही धर्म त्या श्रमण परंपरेच्या शाखा आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

जैन, बौद्ध आणि वैदिकांच्या कोणत्याही ग्रंथात महावीर व गौतम बुद्ध आधी वैदिक असल्याचा उल्लेख नाही. जैन ग्रंथात महावीरांचे आई-वडील हे पार्श्वनाथाच्या चातुर्याम धर्माचे अनुयायी असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. गौतम बुद्धांचे आई-वडील हे देखील याच परंपरेतील होते. (पहा: पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म, लेखक डॉ. धर्मानंद कोसंबी). पार्श्वनाथ हे श्रमण परंपरेतील एक महान व्यक्तीमत्व होते. ही श्रमण परंपरा महावीरांनी, गौतम बुद्धांनी किंवा पार्श्वनाथांनी सुरू केली नव्हती, तर ती या देशातील मूळ परंपरा आहे.

महावीर हे जैन धर्माचे २४वे तीर्थंकर होते. त्यांच्या आधी २३ तीर्थंकर होवून गेले, तर गौतम बुद्धांच्या अगोदर २४ बुद्ध होवून गेले. तीर्थंकर, बुद्ध, जिन, अर्हत, अरिहंत ही व्यक्तींची नावे नसून पदांची नावे आहेत. या सगळ्या शब्दांना ऋग्वेदाच्या अगोदर पासूनचा इतिहास आहे. वैदिक परंपरेतही २४ अवतारांची संकल्पना आहे, पण ती पुराणांतील संकल्पना आहे. पुराणे ही महावीर व गौतम बुद्ध यांच्या नंतर शेकडो वर्षांने लिहिली गेली आहेत (पहा: ब्राम्हणी साहित्य, लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर). यावरून २४ अवतार ही संकल्पना सरळ सरळ २४ तीर्थंकर व २४ बुद्ध यावरून नंतर उचलेली आहे हे स्पष्ट दिसते. अशोक चक्रातही २४ आरे असतात, हा केवळ योगायोग नव्हे. अशोकाच्या काळात वैदिक परंपरेत २४ अवतार ही संकल्पना नव्हती.

त्यामुळे जैन आणि बौद्ध धर्म हे वैदिक धर्माच्या विरोधातून तयार झाले असे म्हणणे हे पूर्ण चुकीचे आहे. वैदिकांनी तसे म्हणणे स्वाभाविक आहे, कारण त्यांना त्यातून आपली प्राचीनता दाखवायची असते. पण सध्या अनेक बौद्ध विद्वान देखील वैदिकांच्या या म्हणण्याला उघड किंवा मूक पाठिंबा देत आहेत, ही खेदाची गोष्ट आहे.

हेही वाचा:
भारतीय इतिहासाची जैन साधने: भाग 1: जैन शिलालेख
भारतीयांचा इतिहासबोध
राजपुतांच्या कांही कुळ्यांचे दक्खनी मूळ
वारकरी संप्रदायाचे मूळ कोठे आहे?

गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१२

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला?

-महावीर सांगलीकर


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्याच्या शेवटी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांना हिंदू धर्म सोडायचाच  होता, पण इतके सगळे धर्म अस्तित्वात असताना त्यांनी बौद्ध धर्मच का निवडला असा प्रश्न पडतो. बौद्ध धर्म इतर कोणत्याही धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, तो मानवतावादी आहे, त्यात जातीभेद आणि अस्पृश्यता या गोष्टी नाहीत आणि त्यामुळेच बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला का?.  नाही, कारण बौद्ध धर्म हा त्यांच्यासाठी पहिला पर्याय नव्हता, तर तो शेवटचा पर्याय होता. बौद्ध धर्म स्वीकारण्याअगोदर  त्यांनी शीख आणि जैन या दोन धर्मांचा विचार केला होता. पण शेवटी बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा पर्याय निवडला.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जेंव्हा लक्षात आले की प्रस्थापित हिंदू धर्मात दलितांना बरोबरीचे स्थान मिळणे शक्य नाही, तेंव्हा त्यांनी धर्मांतराचा निर्णय घेतला. 13 ऑक्टोबर 1935 रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे केलेल्या भाषणात 'मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही' अशी घोषणा केली. पण त्यावेळी ते नक्की कोणता धर्म स्वीकारणार आहेत हे त्यांनी सांगितले नाही. आपल्या घोषणेनंतर तब्बल 21 वर्षांनी त्यांनी नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला.  पण बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी धर्मांतराच्या संदर्भात आणखीही कांही घडामोडी झाल्या होत्या, त्याविषयी थोडी माहिती घेणे या विषयाच्या अभ्यासकांना उपयोगी पडू शकते.

येवला येथील 1935 मधील आपल्या भाषणाच्या अगोदरच १९२९ साली त्यांनी आपल्या अनुयायांना सल्ला दिला होता की ' तुम्हाला सन्मान देईल असा कोणताही धर्म स्वीकारायला हरकत नाही'. त्यांच्या या वाक्यातील 'कोणताही धर्म' हे शब्द महत्वाचे आहेत. त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या कांही अनुयायांनी इस्लाम स्वीकारला होता.

१९३६ साली अमृतसर येथे झालेल्या शीख मिशन परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले. 'हे भाषण मी हिंदू म्हणून करणार असलेले शेवटचे भाषण असेल' असे बाबासाहेबांनी अगोदर जाहीर केले होते. या परिषदेत केरळून आलेल्या थिय्या या दलित समाजाच्या पाच कार्यकर्त्यांनी त्यांचे नेते डॉक्टर कुट्टीर यांच्यासह शीख धर्म स्वीकारला.  त्याचवेळी उत्तर प्रदेशातून आलेल्या ५० दलित कार्यकर्त्यांनीही शीख धर्म स्वीकारला.

त्यानंतर शीख धर्माबद्दल असलेली आपली आपुलकी व्यक्त करण्यासाठी बाबासाहेबांनी आपला मुलगा व पुतण्या या दोघांनाही हरमिंदर साहिब येथे पाठवले होते. हे दोघेही तेथे दीड महिन्यांहून जास्त काळ राहिले होते.  जून १९३६ मध्ये बाबासाहेबांनी शीख धर्म स्वीकारण्याचा  निर्णय घेतला. त्यानंतर ते शीख मिशनच्या संपर्कात सतत राहू लागले. मुंबई येथे धर्मांतरीत शीख विद्यार्थ्यांसाठी एक कॉलेज काढण्यावरही विचार झाला.  बाबासाहेबांनी आपल्या 13 अनुयायांना शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी अमृतसर येथे पाठवले. पण विशेष म्हणजे 'फक्त अभ्यास करण्यासाठी' पाठवलेले या तेराही अनुयायांनी प्रत्यक्षात शीख धर्म स्वीकारला.

याच काळात पटियालाचे  महाराज भूपिंदर सिंग यांनी आपल्या बहिणीचे लग्न बाबासाहेबांच्या कुटुंबातील एखाद्या तरुणाशी लावण्याची तयारी दाखवली. यामागे त्यांचा उद्देश दलित समाजातील न्यूनगंड दूर करून अभिमान तयार करणे हा होता.

पण..........

डॉक्टर बाबासाहेबांच्या आणि त्यांच्या अनुयायांच्या धर्मांतराबाबत त्या काळातील अकाली दलामध्ये गंभीरपणे विचार करण्यात आला आणि अकाली दलाने एकमुखाने अशा प्रकारच्या सामूहिक धर्मांतरास विरोध केला. यामागे कोणते कारण होते, काय राजकारण होते हे कळत नाही. ते कांहीही असले तरी यामुळे दलितांनी मोठ्या प्रमाणावर शीख धर्म स्वीकारण्यासाठी  बाबासाहेबांनी चालवलेले प्रयत्न वाया गेले.

धर्मांतराच्या बाबतीत बाबासाहेबांनी जैन धर्माचाही विचार केला होता. पण शीख धर्माबाबत ते जेवढे गंभीर होते, तेवढे जैन धर्माबाबत नव्हते. धर्मांतराच्या  बाबतीत त्यांनी प्रसिद्ध जैन आचार्य शांतीसागर यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. पण शांतीसागर यांनी अशा प्रकारच्या धर्मांतरास नकार दिला. पण याच काळात दुसरे कांही जैन साधू दलित समाजात जैन धर्माचा प्रचार करत होते, आणि त्यांनी अनेक दलितांना जैन धर्मात प्रवेशही दिला होता. विशेषत: मध्य प्रदेश, राजस्थान या भागात अनेक दलितांनी जैन धर्म स्वीकारला होता. महाराष्ट्रातही अहमदनगर जिल्ह्यात एका जैन मुनींच्या प्रयत्नामुळे कांही दलितांनी जैन धर्म स्वीकारला होता. पण बाबासाहेब जैन धर्माबाबत फारसे गंभीर नव्हते असे दिसते. 

बौद्ध धर्म स्वीकारण्या मागची कारणे
बाबासाहेबांवर मुंजे, कुर्तकोटी शंकराचार्य वगैरेंच्या कडून आणि एकूणच हिंदू समाजाकडून धर्मांतराच्या बाबतीत खूप मोठे दडपण होते. बाबासाहेबांनी हिंदू धर्म अवश्य सोडावा, पण त्यांनी इस्लाम किंवा ख्रिस्ती हे धर्म स्वीकारू नयेत अशी त्यांची इच्छा होती. बाबासाहेबांचीही या दोन धर्मांच्या बाबतीत नकारात्मक भूमिका होती. त्यामुळे भारतात जन्मलेले जैन, बौद्ध, शीख धर्म हेच त्यांचे पर्याय होते. त्यांनी पहिला पर्याय म्हणून शीख धर्मच निवडला होता. तिथे  सुरवातीला त्यांचे स्वागत झाले होते, पण पुढे अकाली दलाने एकमुखाने अशा धर्मांतरास नकार दिला. बहुधा असा अनुभव पुन्हा येवू नये म्हणूनच बाबासाहेबांनी जैन धर्माचा पर्याय सोडून दिला असावा.

अशा परिस्थितीत धर्मांतरासाठी बौद्ध धर्म हाच एकमेव पर्याय उरला होता. या धर्माच्या बाबतीत पथ्यावर पडलेली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे बौद्ध  धर्मात यायला त्यांना विरोध करायला,  नकार द्यायला कोणीच शिल्लक नव्हते, कारण त्यावेळी भारतात बौद्ध धर्माचे अस्तित्व जवळ जवळ नव्हतेच. (कोणत्याही प्रस्थापित धर्मात त्याचे अनुयायी नवीन लोकांना प्रवेश द्यायला विरोध करण्याची शक्यता असते. अर्थात याला  अपवाद आहेतच).

पण शेवटी कांही प्रश्नांची उत्तरे मिळतच नाही:

1. बाबासाहेबांनी शीख धर्म स्वीकारण्याचा  निर्णय 1936 साली घेतला, 1937 साली अकाली दलाने त्याला विरोध केला. त्यानंतर त्यांनी 19 वर्षांनी बौद्ध धर्म स्वीकारला. बौद्ध धर्म स्वीकारायला एवढा वेळ का लागला?

2. अकाली दलाने विरोध केला असला तरी बाबासाहेबांना इतर मार्गाने शीख धर्म स्वीकारणे शक्य होते, त्याचा विचार त्यांनी का केला नाही?

3. बाबासाहेबांनी इस्लाम धर्मास नकार देणे हे एकवेळ आपण समजू शकतो, पण त्यांनी ख्रिस्ती धर्मास नकार का द्यावा हे कळत नाही. बाबासाहेब आणि त्यांच्या अनुयायांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला नसला तरी वास्तविक पहाता आज भारतात दलित-ख्रिश्चनांची संख्या दलित-बौद्धांपेक्षा जास्त आहे.


 हेही वाचा: 
उपेक्षितांसाठी जैन धर्मच जास्त योग्य 
दलित-आदिवासींचे जैन धर्मांतर 
मातंग वंश  आणि जैन धर्म
बामसेफने दलितांच्या धर्मांतराविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी
ओ.बी.सी. आणि जैन धर्म  
महाराष्ट्र आणि जैन धर्म

रविवार, २४ जून, २०१२

वारकरी संप्रदायाचे मूळ कोठे आहे?

-महावीर सांगलीकर

सध्या कांही लोकांकडून वारकरी संप्रदाय आणि बौद्ध धर्म यांचा ओढून ताणून संबंध जोडण्याचा प्रकार चालू आहे. विठ्ठलाला बुद्ध ठरवणे, संत तुकारामांवर बौद्ध धर्माचा कसा प्रभाव होता हे दाखवण्याचा खटाटोप करणे इत्यादी गोष्टी होत आहेत. यामागे सत्यशोधन नसून कांही राजकीय, सामाजिक व आर्थिकही गणिते आहेत. (आर्थिक गणिते विशेषत: लेखक-प्रकाशक यांना लागू पडतात). असो.

आज वारकरी संप्रदाय प्रामुख्याने मराठा, कुणबी, माळी, अलुतेदार-बलुतेदार जाती यांच्यात दिसतो. या सगळ्या समाजात तेराव्या शतकापर्यंत आणि त्यानंतरही जैन धर्माचे अस्तित्व होते हे अनेक शिलालेखीय व साहित्यिक पुराव्यावरून सिद्ध करता येते. पण या जातींपैकी कुठल्याच जातीत बौद्ध धर्म अस्तित्वात होता याचा कसलाच पुरावा नाही. वारकरी संप्रदायावर बौद्ध धर्माचा कसलाच प्रभाव नाही, उलट हा संप्रदाय जैन धर्माचे झालेले रुपांतर आहे. वारकरी संप्रदायातील अनेक गोष्टी या जैन धर्माशी मेळ खातात, बौद्ध धर्माशी नाही. कसे ते पहा:

* जैन धर्म आत्म्याचे अस्तित्व मानतो, तसेच वारकरी संप्रदायात देखील आत्म्याचे अस्तित्व मानले गेले आहे. याउलट बौद्ध धर्म आत्म्याचे अस्तित्व अजिबातच नाकारतो. आत्म्याचे अस्तित्व न मानणा-या बौद्ध धर्मात वारकरी संप्रदायाचे मूळ असू शकत नाही.

* जैन धर्मात मोक्ष ही संकल्पना आहे, तशीच ती वारकरी संप्रदायातही आहे. बौद्ध धर्मात मोक्षाची वेगळी संकल्पना आहे आणि तिथे तिला निर्वाण म्हंटले जाते. मोक्ष ही संकल्पना वारकरी संप्रदायात जैन धर्मातूनच आली आहे. ती जर बौद्ध धर्मातून आली असती तर तिला निर्वाण असे म्हंटले गेले असते, मोक्ष नव्हे.

* जैन धर्मात मंदिरे आणि मूर्तीपूजा आहे. वारकरी संप्रदाय देखील मूर्ती व मंदिरे यांना मानतो. याउलट भारतातील  बौद्ध धर्मात पूजा हा प्रकार नाही, पण जैन धर्मात प्राचीन काळापासून आहे. किंबहुना पूजा ह्या प्रकाराचे मूळ जैन धर्मातच आहे, कारण वैदिक धर्मात यज्ञ हा प्रकार असायचा, तेथे पूजा नव्हती. अर्थातच वारकरी संप्रदायात पूजा करण्याची प्रथा जैन धर्मातून आली आहे.

* जैन धर्मात शाकाहाराला अतिशय महत्व आहे, तसेच शाकाहाराचे महत्व वारकरी संप्रदायातही आहे. याउलट बौद्ध धर्मात शाकाहाराला महत्व नाही. गौतम बुद्ध यांनी दुस-याने मारलेल्या जनावराचे मांस खायला हरकत नाही असे सांगितले आहे. पण वारकरी तर कट्टर शाकाहारी. याचाच अर्थ असा की वारक-यांचा शाकाहार जैन धर्मातून आला आहे, तेथे बौद्ध धर्माचा कसलाच संबंध नाही.

* जैन धर्मात उपवासाला अतिशय महत्व आहे, तसेच महत्व वारकरी संप्रदायात देखील आहे. याउलट गौतम बुद्ध यांनी उपवासाचा निषेध केला आहे. त्यामुळे उपवास करण्याची प्रथा वारकरी संप्रदायात बौद्ध धर्मातून नव्हे तर जैन धर्मातून आली आहे.

* जैन धर्म व वारकरी संप्रदाय या दोन्हीत चातुर्मासाला महत्व आहे. प्राचीन काळी बौद्ध धर्मात चातुर्मास पाळला जात असला तरी तेथे त्याला जैन धर्माइतके महत्व नव्हते. म्हणजे चातुर्मास मानण्याची प्रथा वारकरी संप्रदायात जैन धर्मातूनच येवू शकते, बौद्ध धर्मातून नव्हे.

* अनेक ओ.बी.सी. व बलुतेदार जातीत परंपरेने जैन धर्माचे पालन करणारे लोक दिसतात. उदाहरणार्थ शिंपी, कासार, कोष्टी, सुतार, गुरव, परीट, न्हावी वगैरे. परंतु अशा एकाही जातीत बौद्ध धर्माचे पारंपारिक अनुयायी दिसत नाहीत. महाराष्ट्रात एकाच जातीत जैन, वारकरी आणि महानुभाव अनुयायी असल्याचे दिसते, पण अशा जातीत बौद्ध धर्माचे अनुयायी का नसतात, याचाही या संदर्भात विचार करायला पाहिजे. 

याशिवाय वारकरी घालत असलेले साधे पांढरे कपडे, पायी यात्रा करणे वगैरे गोष्टी जैन धर्माचे अवशेष (Remains) आहेत.

अगदी अलीकडेपर्यंत या संप्रदायात गंभीर आजारी पडल्यास अन्न-पाणी यांचा त्याग करून मरण पत्करण्याची प्रथा होती. ही प्रथा सरळ सरळ जैन धर्मात असलेल्या सल्लेखना किंवा संथारा या प्रथेचा वारकरी संप्रदायावरील प्रभाव होता. बौद्ध धर्मात अशी प्रथा फारशी नव्हती, जी होती ती फक्त प्राचीन काळातच होती.

वारकरी संप्रदाय महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि तेलंगणा या भागात पसरलेला आहे. या संप्रदायाची सुरवात १३व्या शतकात झाली. याच भागात साधारण याच काळापर्यंत जैन धर्माचे अस्तित्व होते, पण तिथे या काळात बौद्ध धर्म अजिबात अस्तित्वात नव्हता. किंबहुना सातव्या-आठव्या शतकापर्यंत या भागातून बौद्ध धर्म पूर्णपणे संपला होता. याउलट जैन धर्म शिलाहारांच्या राजवटीपर्यंत म्हणजे तेराव्या शतकापर्यंत इथे टिकून होता. आता वारकरी संप्रदायाचा जन्म जेंव्हा झाला तेंव्हा अस्तित्वात नसलेल्या बौद्ध धर्माचा प्रभाव त्या संप्रदायावर कसा काय पडणार?

केवळ तुकाराम महाराज भंडा-याच्या डोंगरावरील बौद्ध गुफेत जायचे यावरून त्यांच्यावर किंवा वारकरी संप्रदायावर बौद्ध धर्माचा प्रभाव होता असे म्हणणे चुकीचे आहे. त्या गुफेत जाण्याचा त्यांचा हेतू चिंतन-मननासाठी एकांत मिळवणे हाच असू शकतो.

एकोणीसाव्या शतकातील एडवर्ड थॉमस हे इतिहास संशोधक आणि रॉयल एशियाटिक सोसायटीचे फेलो होते. आपल्या The Early Faith of Asoka या ग्रंथात त्यांनी अशी तक्रार केली आहे की इतिहास संशोधकांनी जैन धर्माकडे दुर्लक्ष करून बौद्ध आणि ब्राम्हणी धर्माला अवाजवी महत्व दिले आहे. आपल्या या ग्रंथात त्यांनी डॉक्टर स्टीवनसन या संशोधकाची मते देत सांगितले आहे की पंढरपूरच्या विठोबाची मूळ मूर्ती ही जैन तीर्थंकर नेमीनाथ यांची मूर्ती होती. पुढील काळात पंढरपूरचे मंदिर ब्राम्हणांच्या ताब्यात गेले आणि त्यांनी हळूहळू मूळ मूर्तीचे आपल्या स्वार्थासाठी रुपांतर केले.

विठ्ठलाचे मंदिर आज ब्राम्हणांच्या ताब्यात असले तरी या मंदिराची कायदेशीर वहिवाट अगदी अलीकडेपर्यंत विठ्ठलदास या जैन घराण्याकडे होती.

याचा अर्थ असा होतो की विठ्ठल, वारकरी संप्रदाय, जैन धर्म यांचा जवळचा संबंध आहे.

या मंदिराचे रुपांतर कसे कसे होत गेले या विषयावर तात्या केशव चोपडे यांनी पंढरपूरचा विठोबा हे पुस्तक लिहिले होते. हे दुर्मिळ पुस्तक माझ्याकडे असून लवकरच मी ते इंटरनेटवर अपलोड करत आहे.

हेही वाचा:   
संत तुकाराम आणि जैन धर्म
बौद्ध धर्म, जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता
भारतीय इतिहासाची जैन साधने: भाग 1: जैन शिलालेख
 बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला?

बौद्ध धर्म, जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता

-महावीर सांगलीकर

भारतातील जातीवाद आणि अस्पृश्यता याबद्दल हिंदू धर्माला जबाबदार धरण्यात येते. ब्राम्हणांनी जाती तयार केल्या व कांही जातींना अस्पृश्य ठरवले असा ब्राम्हण विरोधकांचा एक लाडका सिद्धांत आहे. पण प्रत्यक्षात जाती बनण्याची अनेक वेगवेगळी कारणे आहेत. अगदी सिंधू संस्कृतीत सुद्धा जाती आणि उच्चनीचता होती. फार तर असे म्हणता येईल की समाजातील या जातीवादाचा ब्राम्हणांनी आपल्या स्वार्थासाठी फायदा करून घेतला.

अस्पृश्यता हा मानवतेला लागलेला एक कलंक आहे असे महात्मा गांधी म्हणायचे. अस्पृश्यता ही ब्राम्हणांची देणगी आहे असे सर्वसाधारण मत आहे. ते खरे असेल नसेल, पण बौद्ध धर्मात जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता होती आणि आजही आहे हे वाचल्यावर वाचकांना आश्चर्याचा धक्का बसेल. पण हातच्या काकणाला आरसा कशाला? चला आपण वेगवेगळ्या बौद्ध देशांमध्ये बौद्ध लोक कशी जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता पाळतात ते पाहुया.

भारतातील लडाख भागात 'ओरिजिनल' बौद्ध धर्म आणि त्याचे अनुयायी आहेत. त्यांच्यात जातीव्यवस्था तर आहेच पण हे बौद्ध धर्मीय लोक अस्पृश्यतेचे पालनही करतात. विशेष म्हणजे यांच्यातील अस्पृश्य जाती या वेगळ्याच आहेत. त्यात लोहार व वादक या दोन जाती मुख्य आहेत. भारताच्या इतर भागात पूर्वी अस्पृश्यांना जी वागणूक दिली जायची तशी वागणूक या बौद्धबहुल भागात तेथील विशिष्ट जातींना आजही दिली जाते.

लडाखमधील बौद्ध समाज जशी अस्पृश्यता पाळतो अगदी तशीच अस्पृश्यता नेपाळ मधील बौद्ध समाज पाळतो. भारताचा पिटुकला शेजारी भूतान हाही एक बौद्ध देश आहे. यथील बौद्ध समाजात जाती आणि अस्पृश्यता या दोन्ही गोष्टी आहेत.

तिबेट हा बौद्ध धर्माचा बालेकिल्ला मानला जातो. या देशात राग्यापा नावाची अस्पृश्य जमात आहे. त्यांना हीन वागणूक दिली जाते. इतकेच नाही तर तिबेटन बौद्ध धर्मियांचे नेते दलाई लामा यांनी दोन दशकांपूर्वी बौद्धांच्याच एका पंथाला बौद्ध समाजातून बहिष्कृत करून अस्पृश्य ठरवले. त्यांना दवाखान्यात, दुकानांमध्ये, हॉटेल मध्ये आणि मठांमध्ये प्रवेश करायला बंदी घातली.

चला आता आपण जपानला जाऊया. या देशात बुराकुमीन नावाचे अस्पृश्य लोक आहेत. त्यांची संख्या साठ लाखाहून जास्त आहे. याना जपान मधील बौद्ध आणि शिंतो या दोन्ही धर्माचे लोक अस्पृश्य मानतात. पूर्वी यांचा कोणाला स्पर्श झाला तर त्याला बौद्ध साधूकडून शुद्ध होण्यासाठी विधी करून घ्यावी लागत असे. जपानमध्ये पूर्वी अस्पृश्यता नव्हती, पण भारतातून आलेल्या बौद्ध धर्माबरोबर ती तेथे आली असे मानले जाते.

श्रीलंका हा देश बौद्धबहुल आहे. येथील सिंहली लोक हे बौद्ध धर्मीय आहेत. त्यांच्यात जातीव्यवस्था आहे, तसेच अस्पृश्यताही आहे. सिंहली समाजातील रोडी ही जात सर्वात मोठी अस्पृश्य जात आहेत. याशिवाय येथे किन्नराया नावाची एक अस्पृश्य जात आहे. भारताप्रमाणेच येथेही अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांची वस्ती गावाबाहेर असते.

बर्मा किंवा म्यानमार हाही एक बौद्ध बहुल देश आहे. हा जगातील सर्वात भ्रष्ट देशांपैकी एक देश आहे. या देशातही जातीच जाती आहेत, तसेच अस्पृश्यताही आहे. पूर्वी येथील अस्पृश्य जातींचा प्रचंड अभ्यास महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही तेथील अस्पृश जातींचा अभ्यास करण्यासाठी या देशाला दोन वेळा भेट दिली होती. पाराग्यून ही येथील सर्वात मोठी अस्पृश जमात आहे. त्याशिवाय रोहिंग्या ही दुसरी मोठी अस्पृश्य जमात आहे. या देशातील अस्पृश्य लोक मानवाधिकारांपासून देखील वंचित आहेत.

याशिवाय कंबोडिया, विएतनाम, चीन, कोरिया, थायलंड, तैवान, मंगोलिया, होंग कोंग, लाओस हे सगळे देश, जेथे बौद्ध धर्मीयांची संख्या ७५% ते ९५% आहे, तेथे बौद्ध धर्मीयांनी त्यांच्यातीलच कांही जातींना बहिष्कृत करून त्याना अस्पृश्य ठरवले आहे.

आपल्या येथील अनेक लोक मानतात की बौद्ध धर्मात जातीव्यवस्था व अस्पृश्यता नाही. प्रत्यक्षात बौद्ध धर्मात या दोन्ही गोष्टी आहेत हे वरील माहितीवरून दिसून येते. कांही अरब देशांमध्ये, युरोपिअन देशांमध्ये देखील कांही जमातींना अस्पृश्य मानले जाते. त्यामुळे जातीव्यवस्था व अस्पृश्यता यांचे खापर ब्राम्हणांवर फोडणे चुकीचे आहे. खरी गोष्ट ही आहे की जातीव्यवस्था व अस्पृश्यता निर्माण होण्याची खरी कारणे काय आहेत याची आपण चर्चा करत नाही.

भारतातून अस्पृश्यता ब-यापैकी नष्ट झाली, पण बौद्ध देशांमध्ये ती आजही आहे याला काय म्हणावे?

ज्यांना मी दिलेल्या माहितीविषयी शंका वाटते, त्यांनी गुगल सर्च करावे.

जातीव्यवस्था व अस्पृश्यता कशी निर्माण झाली? याची माहिती देणारा माझा लेख नंतर प्रकाशित होईलच.

Popular Posts

कृपया हे पेज लाईक करावे