सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.
बौद्ध धर्मांतर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बौद्ध धर्मांतर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१२

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला?

-महावीर सांगलीकर


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्याच्या शेवटी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांना हिंदू धर्म सोडायचाच  होता, पण इतके सगळे धर्म अस्तित्वात असताना त्यांनी बौद्ध धर्मच का निवडला असा प्रश्न पडतो. बौद्ध धर्म इतर कोणत्याही धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, तो मानवतावादी आहे, त्यात जातीभेद आणि अस्पृश्यता या गोष्टी नाहीत आणि त्यामुळेच बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला का?.  नाही, कारण बौद्ध धर्म हा त्यांच्यासाठी पहिला पर्याय नव्हता, तर तो शेवटचा पर्याय होता. बौद्ध धर्म स्वीकारण्याअगोदर  त्यांनी शीख आणि जैन या दोन धर्मांचा विचार केला होता. पण शेवटी बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा पर्याय निवडला.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जेंव्हा लक्षात आले की प्रस्थापित हिंदू धर्मात दलितांना बरोबरीचे स्थान मिळणे शक्य नाही, तेंव्हा त्यांनी धर्मांतराचा निर्णय घेतला. 13 ऑक्टोबर 1935 रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे केलेल्या भाषणात 'मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही' अशी घोषणा केली. पण त्यावेळी ते नक्की कोणता धर्म स्वीकारणार आहेत हे त्यांनी सांगितले नाही. आपल्या घोषणेनंतर तब्बल 21 वर्षांनी त्यांनी नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला.  पण बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी धर्मांतराच्या संदर्भात आणखीही कांही घडामोडी झाल्या होत्या, त्याविषयी थोडी माहिती घेणे या विषयाच्या अभ्यासकांना उपयोगी पडू शकते.

येवला येथील 1935 मधील आपल्या भाषणाच्या अगोदरच १९२९ साली त्यांनी आपल्या अनुयायांना सल्ला दिला होता की ' तुम्हाला सन्मान देईल असा कोणताही धर्म स्वीकारायला हरकत नाही'. त्यांच्या या वाक्यातील 'कोणताही धर्म' हे शब्द महत्वाचे आहेत. त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या कांही अनुयायांनी इस्लाम स्वीकारला होता.

१९३६ साली अमृतसर येथे झालेल्या शीख मिशन परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले. 'हे भाषण मी हिंदू म्हणून करणार असलेले शेवटचे भाषण असेल' असे बाबासाहेबांनी अगोदर जाहीर केले होते. या परिषदेत केरळून आलेल्या थिय्या या दलित समाजाच्या पाच कार्यकर्त्यांनी त्यांचे नेते डॉक्टर कुट्टीर यांच्यासह शीख धर्म स्वीकारला.  त्याचवेळी उत्तर प्रदेशातून आलेल्या ५० दलित कार्यकर्त्यांनीही शीख धर्म स्वीकारला.

त्यानंतर शीख धर्माबद्दल असलेली आपली आपुलकी व्यक्त करण्यासाठी बाबासाहेबांनी आपला मुलगा व पुतण्या या दोघांनाही हरमिंदर साहिब येथे पाठवले होते. हे दोघेही तेथे दीड महिन्यांहून जास्त काळ राहिले होते.  जून १९३६ मध्ये बाबासाहेबांनी शीख धर्म स्वीकारण्याचा  निर्णय घेतला. त्यानंतर ते शीख मिशनच्या संपर्कात सतत राहू लागले. मुंबई येथे धर्मांतरीत शीख विद्यार्थ्यांसाठी एक कॉलेज काढण्यावरही विचार झाला.  बाबासाहेबांनी आपल्या 13 अनुयायांना शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी अमृतसर येथे पाठवले. पण विशेष म्हणजे 'फक्त अभ्यास करण्यासाठी' पाठवलेले या तेराही अनुयायांनी प्रत्यक्षात शीख धर्म स्वीकारला.

याच काळात पटियालाचे  महाराज भूपिंदर सिंग यांनी आपल्या बहिणीचे लग्न बाबासाहेबांच्या कुटुंबातील एखाद्या तरुणाशी लावण्याची तयारी दाखवली. यामागे त्यांचा उद्देश दलित समाजातील न्यूनगंड दूर करून अभिमान तयार करणे हा होता.

पण..........

डॉक्टर बाबासाहेबांच्या आणि त्यांच्या अनुयायांच्या धर्मांतराबाबत त्या काळातील अकाली दलामध्ये गंभीरपणे विचार करण्यात आला आणि अकाली दलाने एकमुखाने अशा प्रकारच्या सामूहिक धर्मांतरास विरोध केला. यामागे कोणते कारण होते, काय राजकारण होते हे कळत नाही. ते कांहीही असले तरी यामुळे दलितांनी मोठ्या प्रमाणावर शीख धर्म स्वीकारण्यासाठी  बाबासाहेबांनी चालवलेले प्रयत्न वाया गेले.

धर्मांतराच्या बाबतीत बाबासाहेबांनी जैन धर्माचाही विचार केला होता. पण शीख धर्माबाबत ते जेवढे गंभीर होते, तेवढे जैन धर्माबाबत नव्हते. धर्मांतराच्या  बाबतीत त्यांनी प्रसिद्ध जैन आचार्य शांतीसागर यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. पण शांतीसागर यांनी अशा प्रकारच्या धर्मांतरास नकार दिला. पण याच काळात दुसरे कांही जैन साधू दलित समाजात जैन धर्माचा प्रचार करत होते, आणि त्यांनी अनेक दलितांना जैन धर्मात प्रवेशही दिला होता. विशेषत: मध्य प्रदेश, राजस्थान या भागात अनेक दलितांनी जैन धर्म स्वीकारला होता. महाराष्ट्रातही अहमदनगर जिल्ह्यात एका जैन मुनींच्या प्रयत्नामुळे कांही दलितांनी जैन धर्म स्वीकारला होता. पण बाबासाहेब जैन धर्माबाबत फारसे गंभीर नव्हते असे दिसते. 

बौद्ध धर्म स्वीकारण्या मागची कारणे
बाबासाहेबांवर मुंजे, कुर्तकोटी शंकराचार्य वगैरेंच्या कडून आणि एकूणच हिंदू समाजाकडून धर्मांतराच्या बाबतीत खूप मोठे दडपण होते. बाबासाहेबांनी हिंदू धर्म अवश्य सोडावा, पण त्यांनी इस्लाम किंवा ख्रिस्ती हे धर्म स्वीकारू नयेत अशी त्यांची इच्छा होती. बाबासाहेबांचीही या दोन धर्मांच्या बाबतीत नकारात्मक भूमिका होती. त्यामुळे भारतात जन्मलेले जैन, बौद्ध, शीख धर्म हेच त्यांचे पर्याय होते. त्यांनी पहिला पर्याय म्हणून शीख धर्मच निवडला होता. तिथे  सुरवातीला त्यांचे स्वागत झाले होते, पण पुढे अकाली दलाने एकमुखाने अशा धर्मांतरास नकार दिला. बहुधा असा अनुभव पुन्हा येवू नये म्हणूनच बाबासाहेबांनी जैन धर्माचा पर्याय सोडून दिला असावा.

अशा परिस्थितीत धर्मांतरासाठी बौद्ध धर्म हाच एकमेव पर्याय उरला होता. या धर्माच्या बाबतीत पथ्यावर पडलेली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे बौद्ध  धर्मात यायला त्यांना विरोध करायला,  नकार द्यायला कोणीच शिल्लक नव्हते, कारण त्यावेळी भारतात बौद्ध धर्माचे अस्तित्व जवळ जवळ नव्हतेच. (कोणत्याही प्रस्थापित धर्मात त्याचे अनुयायी नवीन लोकांना प्रवेश द्यायला विरोध करण्याची शक्यता असते. अर्थात याला  अपवाद आहेतच).

पण शेवटी कांही प्रश्नांची उत्तरे मिळतच नाही:

1. बाबासाहेबांनी शीख धर्म स्वीकारण्याचा  निर्णय 1936 साली घेतला, 1937 साली अकाली दलाने त्याला विरोध केला. त्यानंतर त्यांनी 19 वर्षांनी बौद्ध धर्म स्वीकारला. बौद्ध धर्म स्वीकारायला एवढा वेळ का लागला?

2. अकाली दलाने विरोध केला असला तरी बाबासाहेबांना इतर मार्गाने शीख धर्म स्वीकारणे शक्य होते, त्याचा विचार त्यांनी का केला नाही?

3. बाबासाहेबांनी इस्लाम धर्मास नकार देणे हे एकवेळ आपण समजू शकतो, पण त्यांनी ख्रिस्ती धर्मास नकार का द्यावा हे कळत नाही. बाबासाहेब आणि त्यांच्या अनुयायांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला नसला तरी वास्तविक पहाता आज भारतात दलित-ख्रिश्चनांची संख्या दलित-बौद्धांपेक्षा जास्त आहे.


 हेही वाचा: 
उपेक्षितांसाठी जैन धर्मच जास्त योग्य 
दलित-आदिवासींचे जैन धर्मांतर 
मातंग वंश  आणि जैन धर्म
बामसेफने दलितांच्या धर्मांतराविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी
ओ.बी.सी. आणि जैन धर्म  
महाराष्ट्र आणि जैन धर्म

Popular Posts

कृपया हे पेज लाईक करावे