मधुकर जगन्नाथ जाधव, पुणे.
Phone: 8412831025
Phone: 8412831025
जैन आगमानुसार जैन धर्म अनादी आहे. सर्वच धर्म मानवाच्या ऐहिक आणि पारलौकिक सुखासाठीच विचार करतात. जगातील सर्व धर्मांचा तटस्थपणे आणि तुलनात्मक अभ्यास केला असता असे दिसून येते की, जैन धर्माचे तत्वज्ञान इतर धर्मांशी, त्यांच्या तत्वज्ञानाशी तुलना करता अधिक सखोल, वैज्ञानिक आणि समतोल आहे. खऱ्या अर्थाने जगात शांती,अहिंसा, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवता आणू शकेल, असा विश्व धर्म आहे. त्यामुळे जैन धर्मियांनी व जैन तत्वज्ञान मानणाऱ्यांनी इतर धर्म, महापुरुष व जैन धर्म यांच्यातील साम्याचा अनेकांत दृष्टीने अभ्यास करणे गरजेचे आहे.
प्रस्तुत लेखात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांच्या माध्यमातून त्यांनी मांडलेल्या विचारातील जैन दृष्टीने साम्य पाहण्याचा अल्पसा प्रयत्न केलेला आहे.
“जे का रंजले गांजले । त्यांसि म्हणे जो आपुले॥ तोचि साधु ओळखावा। देव तेथेंचि जाणावा॥” अशा प्रकारची अभंग रचना करून आणि कीर्तन करून विठ्ठलाची भक्ती करणारे अशी संत तुकारामांची आपल्याला ओळख आहे. तसेच, “वेदाचा तो अर्थ आम्हांसीच ठावा। येरांनी वाहवा भार माथा ॥” म्हणत वैदिकांच्या/ब्राह्मणांच्या विरोधात बंड करणारे ‘विद्रोही संत’ अशीही मांडणी काही लेखक-संशोधकांनी केलेली आहे. एकाच संत तुकारामांच्या अशा दोन भिन्न प्रतिमा लेखकांनी त्यांच्या अभंगाच्या सहाय्याने रंगविल्या आहेत. काही अंशी ते बरोबरही आहे. परंतु, त्याच्याही पलीकडे संत तुकारामांचे महात्म्य आहे.
तुकारामांची गाथा वाचत असताना आणि त्याआधारे संत तुकारामांच्या भावविश्वाला समजून घेत असताना जरी संत तुकाराम व त्यांची अभंगांची रचना वेद, वेदांत, पुराणे, भागवत धर्म आणि वारकरी संप्रदाय यांच्याशी संबंधित असली तरी ‘जैन धर्म आणि तत्वज्ञानाशी’ असणारे साम्यही वारंवार दिसून येते. ‘संत तुकाराम व जैन धर्म ’ हा एका स्वतंत्र ग्रंथाचा विषय आहे, तरीही अत्यंत थोडक्यात दोन्हीतील साम्य स्थळे इथे मांडत आहे.
जैन तत्वज्ञानाचे/धर्माचे सर्वात महत्वाचे आणि प्रमुख वैशिष्ठ्य म्हणजे सृष्टीचा निर्माता, पालन-पोषण करणारा आणि संहारक म्हणून ईश्वर मान्य नाही. संत तुकाराम तर निस्सीम विठ्ठल भक्त ! वारकरी संप्रदायात
विठ्ठलास सृष्टीचा निर्माता, पालनकर्ता आणि मोक्षदाता मानले जाते. संत तुकारामांच्या हजारो अभंगात विठ्ठलास ईश्वर मानून भजलेले आहे. परंतु, तुकारामांच्याही पुढील अभंगात इतका स्पष्ट उल्लेख आहे की, त्यावर वेगळे भाष्य करायची गरज नाही. तो पुढीलप्रमाणे...
“आहे असा देव वदवावी वाणी । नाहीं ऐसा मनीं अनुभवावा ॥”
कर्मसिद्धांत व पुनर्जन्म:- प्रत्येक जीव आपापल्या तन मन आणि वाचेने केलेल्या कर्मास अनुसरून बंधनात पडतो व कर्मबंधनानुसार त्याचे फळ भोगतो. ८४ लक्ष योनींमध्ये जन्म घेतो. सुख-दुखः भोगतो. जीव कर्मातून
मुक्त होऊन मोक्षास जाईपर्यंत पुनर्जन्म घेतो. कर्मसिद्धांत व पुनर्जन्मावर जैन तत्वज्ञान उभे आहे. संत तुकाराम म्हणतात,
“ऋण वैर हत्या । हें तो न चुके न देतां ॥
म्हणजेच ऋण, वैर व हत्या यांची फेड केल्याशिवाय म्हणजेच कर्माचे फळ भोगल्याशिवाय सुटका होत नाही.
यातून तुकाराम पुनर्जन्म व त्या जन्मातील संचित यामुळे फळ भोगावे लागत असल्याचे सांगून पुनर्जन्म व कर्मसिद्धांत जवळ-जवळ जैन धर्माप्रमाणेच मांडत आहेत.
आचरणात अहिंसा हा जैन धर्माचा आत्मा आहे. संत तुकाराम हे वारकरी असल्याने शाकाहारी होतेच. त्याचबरोबर
“ मांस खातां हाउस करी । जोडोनि वैरी ठेवियेला १॥
कोण त्याची करील कींव । जीवें जीव नेणती २॥
पुढिलासाठीं पाजवी सुरी । आपुली चोरी अंगुळी ३॥
तुका म्हणे पुढें कुटिती हाडें । आपुच्या नाडें रडतील ४॥”
असे सांगून हिंसेमुळे वैरी जोडून पुढे या कर्माच्या परिणामाने पुढे रडतील असा मांसाहाराचा निषेधही व्यक्त करतात.
आणिकांच्या कापिती माना । निष्ठुरपणा पार नाहीं १॥
करिती बेटे उसणवारी । यमपुरी भोगावया २॥
सेंदराचे दैवत केलें । नवस बोले तयासी ३॥
तुका म्हणे नाचती पोरें । सोडितां येरें अंग दुखें ४॥
यातून तुकाराम महाराज हिंसेमुळे माणूस यमपुरी म्हणजे नरक भोगण्याचा कर्मबंध करून ठेवत असल्याचे आणि दगडांच्या देवांचा (जैन धर्मानुसार कुदेव) व त्यांना बोलण्यात येणाऱ्या नवसाचा फोलपणा सांगत आहेत.
संत तुकाराम महाराज दया, क्षमा व शांतीशिवाय म्हणजेच आंतरिक शुद्धतेशिवाय बाह्य गोष्टींना महत्व नाही हे सांगताना म्हणतात,
जावुनियां तीर्था काय तुवां केले । चर्म प्रक्षाळीले वरी वरी ॥
अंतरीचे शुद्ध कासयाने झाले । भूषण त्वां केले आपणया ॥
वृंदावन फळ घोळिले साकरा । भीतरील थारा मोडेचिना ॥
तुका म्हणे नाही शांती क्षमा दया । तोंवरी कासया फुंदा तुम्ही॥
जैन धर्मामध्ये आंतरिक शुद्धतेस अधिक महत्व आहे. वरील अभंग वेगळ्या भाषेत जैन तत्वज्ञानच सांगत नाही काय ?
संत तुकाराम व जैन धर्म- तत्वज्ञान यांच्यातील साम्य पाहत असताना आणखी एक अभंग पाहणे महत्वाचे आहे. संत तुकाराम देहू गावचे राहणारे. गावाच्या जवळच असणाऱ्या भंडारा डोंगरावर ते जप-तप-साधनेस जात असत. तेथे एकांतात चिंतन करत असत. संत तुकाराम उच्च अध्यात्मिक पातळीवर असताना त्यांचा एक अभंग पुढीलप्रमाणे आहे...
पाणीपात्र दिगंबरा । हस्त करा सारखे १।।
आवश्यक देव मनी । चिंतनीच सादर २।।
भिक्षाकामधेनुऐशी । अवकाशी शयन ३।।
पांघरोनि तुका दिशा । केला वास अलक्षी ४।।
या अभंगातील दिगंबर साधूचे वर्णन जैन साधूचे वर्णन आहे ! दिगंबर अवस्थेतील साधूचे हातच भिक्षा व पाण्याचे पात्र असते. आवश्यक देव मनी असतो. ते त्याच्या चिंतनात सादर असतात. कामधेनुप्रमाणे म्हणजे इच्छिल्यावर भिक्षा मिळते. अवकाशी म्हणजे मोकळ्या जागी त्यांचे शयन असते. तुकाराम महाराज म्हणतात "मीही त्याप्रमाणे म्हणजे दिगंबर साधुप्रमाणे दिशा पांघरल्या व अलक्ष परमेश्वराच्या ठिकाणी वास केला..." असा अभंगाचा भावार्थ होतो. म्हणजे दिगंबर साधूला उद्देशूनच हा अभंग आहे. हे वर्णन जैन साधूंनाच लागू होते. या आधारे संत तुकाराम व जैन धर्म आणि तत्वज्ञान यांचा अधिक सखोल अभ्यास व संशोधन आवश्यक आहे, असे मला वाटते.
(मधुकर जाधव हे जैन धर्म, इतिहास आणि संत साहित्य या विषयांचे अभ्यासक आहेत. सध्या ते 'संत तुकाराम आणि जैन धर्म' या विषयावर ग्रंथ लिहित आहेत).
हेही वाचा:
1 टिप्पणी:
Mahaveer proud to be friend
Shree
टिप्पणी पोस्ट करा