सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

गुरुवार, २८ डिसेंबर, २०१७

वेगळा धर्म स्वीकारायचा(च) असेल तर........

-महावीर सांगलीकर 
jainway@gmail.com


गेल्या अनेक वर्षांपासून मला भारताच्या कानाकोपऱ्यातून आणि इतर देशांतूनही ‘जैन धर्म स्वीकारण्याची काय विधी आहे’ या प्रकारची विचारणा करणा-या इमेल्स येतात. इतर देशातून येणाऱ्या इमेल्स मुख्य करून अमेरिका, कॅनडा, युरोप येथील असतात. आत्तापर्यंत आलेल्या अशा इमेल्सची संख्या हजारभर आहे. तुम्हाला प्रश्न पडेल की अशा इमेल्स मला येण्याचं कारण काय?  मी कांही जैन धर्म प्रचारक नाही आणि जैन साधूही नाही. तर यामागचं रहस्य माझा इंटरनेटवर प्रसिद्ध झालेला एक इंग्रजी लेख How to Become a Jain  हे आहे. जैन धर्म स्वीकारण्याची इच्छा असणारे या विषयाशी संबधीत माहिती इंटरनेटवर शोधत असताना माझ्या या लेखापर्यंत पोहोचतात. तो लेख वाचून त्यांना योग्य ती माहिती मिळते, आणखी कांही माहिती पाहिजे असल्यास ते मला इमेल पाठवतात. असो.

येथे मी स्पष्ट करतो की माझा सामूहिक धर्मांतर या प्रकारास पूर्ण विरोध आहे. सामुहिक धर्मांतर हे केवळ समाजकारण आणि राजकारण असते. त्यामुळेच सामुहिक धर्मांतर करणारे लोक ‘धार्मिक’ झाल्याचे दिसून येत नाही.

धर्म ही वैयक्तिक बाब आहे आणि ती वैयक्तिकच राहिली पाहिजे. तसेच आपण केवळ एखाद्या समाजात जन्मलो म्हणून त्या समाजाचा धर्म आपणास चिकटवून घेणे हे चुकीचे आहे. खरं म्हणजे कोणत्याही व्यक्तीला कोणताही धर्म पाळण्याची मुभा पाहिजे. ज्यानं-त्यानं आपल्याला आवडेल, पटेल तो धर्म स्वीकारावा. हा स्वीकारलेला धर्म कसा चांगला आहे हे इतरांना सांगत बसण्याचा प्रकार अजिबात करू नये. इतर धर्म कसे चुकीचे आहेत हे सांगत बसणे म्हणजे मूर्खपणाच आहे. आपल्याला आवडलेल्या धर्माचे आपल्या कुवतीनुसार पालन करणे हीच गोष्ट महत्वाची आहे. खरी धार्मिकता आपल्या धर्माचे पालन करणे आणि इतर धर्मांविषयी आदर बाळगणे यातच आहे.

धर्मांतर हे आर्थिक अथवा भौतिक आमिषामुळे, तसेच एखाद्या धर्माच्या द्वेषातून करणे हेही चुकीचे आहे.

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण एकापेक्षा अधिक भाषा बोलू शकतो, म्हणजे बहुभाषिक असतो, त्याच धर्तीवर आपण ‘बहुधार्मिक’ असायला काय हरकत आहे? म्हणजे जसं एखादा माणूस मराठी बोलतो, हिंदीही बोलतो आणि इंग्रजीही बोलतो, तसं एखाद्या व्यक्तीचा धर्म हिंदूही आहे, मुस्लिमही आहे आणि ख्रिस्तीही आहे असं व्हायला काय हरकत आहे? याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीने रोज मंदिरात, मशिदीत आणि चर्चमध्ये जायला पाहिजे. धार्मिक असण्यासाठी तुम्ही प्रार्थना स्थळाला भेट द्यायलाच पाहिजे असे कांही नाही. (खरं म्हणजे आपण आपल्यावर इतर धर्मांचाही, इतर संस्कृतींचा  मोठा प्रभाव असतो, पण प्रभाव आहे असं आपण मान्य करत नाही .... उदा. हिंदू लोक ख्रिस्ती आणि मुस्लीम धर्मात असणाऱ्या अनेक गोष्टींचं पालन करतात, भारतीय मुस्लीम आणि ख्रिस्ती लोकांवर हिंदू धर्माचा मोठा प्रभाव आहे). 

वर म्हंटल्याप्रमाणे धर्म ही वैयक्तिक बाब आहे आणि ती वैयक्तिकच राहिली पाहिजे. तरी देखील संघटीत धर्म अर्थात त्या धर्माचे अनुयायी कांही चांगले काम करत असतील (शैक्षणिक, आरोग्य विषयक, सेवा, सामाजिक कामे वगैरे) तर त्यात तन-मन-धनाने सहभाग घ्यायला पाहिजे.

कोणताही धर्म स्वीकारायचा असेल तर आपण पुढील गोष्टी करायला पाहिजेत:

त्या धर्माच्या तत्वज्ञानाची अधिकृत माहिती देणा-या पुस्तकांचे वाचन
त्या धर्माच्या आचरण विषयक नियमांचे पालन
धर्म हा प्रार्थना स्थळ आणि कर्मकांड यात नसतो हे जाणून घेवून त्या गोष्टींपासून दूर रहाणे
पुरोहित, मध्यस्थ, धर्माचे ठेकेदार यांच्यापासून जाणीवपूर्वक दूर रहाणे
आपली वेशभूषा वगैरे गोष्टीतून आपण अमुक धर्माचे आहोत याचं प्रदर्शन न करणे

कांही लोक म्हणतील की धर्माची गरजच काय? तर याचे उत्तर असे आहे की ज्यांना धर्माची गरज नाही त्यांनी कोणताच धर्म स्वीकारू नये, पण ज्यांना धर्माची गरज आहे, त्यांना अडवण्याचा ‘अधार्मिकांना’ कसलाच अधिकार नाही. (त्याचप्रमाणे धार्मिक लोकांनाही धर्म न पाळणाऱ्या लोकांवर टीका करण्याचा अधिकार नाही).


हेही वाचा:
बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला?
संत तुकाराम आणि जैन धर्म
मातंग समाज आणि जैन धर्म


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular Posts

कृपया हे पेज लाईक करावे